अन्न हे पूर्णब्रम्ह :पत्रकार हेमंत जोशी

अन्न हे पूर्णब्रम्ह :पत्रकार हेमंत जोशी 

मी खादाड नाही पण थोड्याथोड्यावेळाने मला थोडे थोडे खायला आवडते. आता वेळ मिळत नाही म्हटल्यापेक्षा अलिकडल्या १५ वर्षात मला स्वयंपाक घरात जायची फारशी गरज पडली नाही. अन्यथा मला आयुष्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर जवळपास २० वर्षे स्वयंपाक करावा लागला कदाचित ती एनर्जी तो वेळ वाचला असता तर मला खूप पुढे जाता आले असते पण जे आज मिळाले त्यातही मी पूर्णतः समाधानी आहे. किंबहुना तुमची पुढली पिढी चांगली निपजणे, कुटूंब धडधाकट निरोगी असणे आणि व्यसनी नसणे तसेच कुटुंब सदस्य दीर्घकाळ सलामत जगणे, हेच अतिशय गरजेचे ठरते बाकीचे सारे झूठ आहे मला वाटते. ज्यांच्या घरात वाम मार्गाने पैसे आले ते आपले कुटुंब सुख मात्र घालवून बसले हेच मला नवश्रीमंतांच्या घरात बहुतेकवेळा बघायला मिळते. ज्या सुखांची मला अपेक्षा होती ती अनेक सुखे माझ्यापासून दुरावलीत का, त्यावर जेव्हा केव्हा किंवा अनेकदा विचार करतो तेव्हा हेच लक्षात येते कि कळत नकळत जी अनेक पापकृत्ये माझ्या हातून घडली त्याचे ते फळ मला देवाने दिले आणि नेमके तेच सत्य आहे, हेच जीवनाचे नेमके सार आहे…

श्रीमान प्रमोद देव नावाचे उत्तम प्रशासकीय अधिकारी होते, आता ते निवृत्तीचे जीवन जगताहेत, त्यांची पत्नी ते नोकरीत असतांना बाहेरच्या देशात कि राज्यात मोठ्या पदावर असल्याने पहेलवान प्रमोद देव घरी स्वतःच्या हाताने बहुतेकवेळा स्वयंपाक करायचे, त्यांनी एकदा मला छान सांगितले कि झटपट आणि तोही चविष्ट स्वयंपाक कसा करायचा, मी तो त्यांच्याकडून शिकलो ज्याचा पुढे मला अतिशय फायदा झाला. पोळ्या मात्र मी कधीच लाटल्या नाहीत पण इतर चारीठाव स्वयंपाक मी आजही केवळ अर्ध्या तासात करून मोकळा होतो. स्वयंपाक करतांना त्यात मन ओतले नाही तर तो चवदार होणे अशक्य. आमच्या स्वयंपाकीणबाई स्वयंपाक करून जातात पण त्यावर तुटून पडावे असे खचित घडते. महत्वाचे म्हणजे स्वयंपाक करतांना जे अव्हेलेबल आहे त्यावर प्रयोग करून तो स्वयंपाक ज्याला रुचकर करता येतो तो खरा उत्तम शेफ असे माझे मत आहे. काल माझ्या घरात चण्याची उसळ उरलेली होती माझे जेवण बाकी होते मग मी काहीही वेगळे केले नाही ती पुन्हा पॅन फ्राय मध्ये टाकली त्यात पाणी टाकले उकळी फुटल्यावर त्यात मॅगी नूडल्स आणि टोमॅटो सॉस टाकला, बेत झक्कास जमला…

जसे भजी विविध प्रकारची करता येतात म्हणजे कांद्याची, वांग्याची, गिलक्याची, मश्रुम किंवा पनीरची, पालकाची, मेथीची, इत्यादी तेच मॅगी नूडलसचे आहे तुम्हाला त्या किमान शंभर प्रकारे बनवून मुलांना किंवा घरातल्याना खुश करता येते. घरातली उरलेली भाजी आणि फ्राय कांदा एकत्र करून त्यात नूडलस टाका, सॉसेस योग्य प्रकारे टाका कि झाल्या त्या झटपट केवळ पाच मिनिटात तयार. कोशिंबिरी असोत कि चटण्या, भाज्या असोत कि विविध प्रकारे पिठले किंवा फोडणीला वरण, तुमच्या फ्रिज मध्ये काय काय आहे ते नीट बघून घ्या, घरातल्यांना उत्तम जेऊ घालायचे आहे, तेवढे मनावर घ्या आणि स्वयंपाकाला लागा, पोळ्या सोडून केवळ अर्ध्या तासात तुम्हाला  उत्तमप्रकारे साऱ्यांना जेऊ घालता येते. मॉर्निंग ब्रेकफास्टचे देखील तसेच, नेमके काय खाऊ घालायचे आहे त्याचे आधी नियोजन केले आणि जे करायचे आहे ते मनापासून, हे ठरविले असॆ कि घरातले सारे सदस्य त्यावर तुटून पडतात पण आळशी आणि चिडचिडी वृत्ती त्यातून अनेक घरातून उत्तमोत्तम खाण्याची वानवा  आहे असते असे माझे ठाम मत आहे, स्त्रियांच्या पाककलेच्या बाबतीत अनेकदा असलेल्या हलकट प्रवृत्तीतूनही अनेक घरातला आनंद हिरावल्या जातो असे माझे ठाम मत आहे.


टीप : माझ्या समस्त स्त्री वाचकांनो माझ्या या लिखाणावर तुमचे विस्तृत मत मला नेमके जाणून घ्यावेसे वाटते….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *