सहज सुचलं म्हणून : पत्रकार हेमंत जोशी

सहज सुचलं म्हणून : पत्रकार हेमंत जोशी 

उद्या पैसे मोजून तुम्ही कदाचित बिपाशा सारख्या एखाद्या महागड्या तारिकेच्या कुशीत पडून तिला तुमच्या केसांवरून बळे बळे हात फिरवायला भाग पाडाल पण अगदी साध्या सरळ  सिम्पल बायकोची सर तिला नक्की येणार नाही कारण बायकोच्या बाहुपाशात प्रेम असते आणि पैसे मोजून करवून घेतलेल्या प्रेमाला केवळ व्यवहाराची जोड असते. आज माझ्याजवळ कितीतरी महागड्या कार्स आहेत पण माझ्या लहानपणी खेड्यातल्या रस्त्यावरून सायकलचे टायर हाताने गोल गोल फिरवितांनाची त्या कार्स मध्ये मजा नाही. आज स्वयंपाकघरात चिंचेचे ढीग पडलेले असतात पण लहानपणी झाडावर दगड मारून पाडलेल्या खाल्लेल्या चिंचांची आज मजा चाखता येत नाही, वयानुपरत्वे आज चिंचांकडे बघितले तरी दात आंबायला होतात. तारुण्यात एका रात्रीतून चार चार वेळा शारीरिक सुख घेणारे जेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी चार दिवसातून एकदाही नाही म्हणतात अशावेळी बायकोचे छद्मी हसणे सहन करण्यापलीकडे हातात काहीही नसते…

ज्या वयात जे मिळायला हवे ते त्या वयात निदान थोडेथोडके तरी मिळायला हवे. आमच्या लहानपणी ऐन महालक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी देखील जेव्हा फटाके फोडायला नसायचे तेव्हा केवळ झुरुन रडणे आमच्या हातात असायचे, आज मात्र मनात आणले तर लाखभर रुपयांचे फटाके फोडणे शक्य असतांनाही इच्छा होत नाही हे तर असे झाले कि जेव्हा उत्तेजक औषधे प्राशन केल्याशिवाय काहीही उपयोगाचे होत नाही, शरीरातली तलवार वार करण्याच्या परिस्थितीत नाही नेमकी एखादी उफाडी तुम्हाला खुणेने जवळ बोलावते आहे. पूर्वी जत्रेत तंबूच्या भोकातून तासन तास उभे राहून सिनेमा बघावा लागे कारण तिकीट काढायला चार आणे देखील खिशात नसायचे, अलीकडे मी न्यूयॉर्क मधल्या थिएटर मध्ये सिनेमा पाहता पाहता ढाराढूर झोपलो होतो. जत्रेतली पत्र्याची शिटी वाजवण्याची मजा काही और असायची, आज दरदिवशी कितीतरी मित्रांचे पंचतारांकित हॉटेलात जेवणाचे निमंत्रण असते पण जाणे होत नाही,  तिथे गेले तरी खाणे होत नाही पण ऐन तारुण्यात वडिलांच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतांना एक दिवसाआड मिळालेले जेवण स्वर्गसुख देऊन जात असे…

मोहोल्ल्यातल्या वर्गातल्या शाळेतल्या मुलींबरोबर लगोऱ्या लंगडी आईबाबा आईबाबा विटी दांडू लपाछपी डॉक्टर डॉक्टर खेळण्यात जी मजा होती आता केवळ आठवणींमध्ये आनंद घ्यावा लागतो, मनात आले, आणले तरी यातले काहीही शक्य नाही, नसते. कोणताही पदार्थ खातांना तोंडाचा मोठ्यांदा आवाज आनंद देऊन जायचा आता मिटक्या मारणे होत नाही कारण खाण्या पिण्याचे वयानुपरत्वे आकर्षण राहिलेले नाही. पूर्वी आवडणाऱ्या मुलीच्या बापाने साधे बघितले तरी चड्डीत मुतायला व्हायचे आज ती वेळ मुलींच्या बापावर येते कारण आमच्यातल्या विकृत पुरुषांची तरुणींच्या बापांना धास्ती असते भीती वाटते. मित्रांनो, पैसे खूप मिळविले पण लहानपणी देवाघरी गेलेली माझी आई, मला पुन्हा कुठेही विकत घेता आली नाही. मित्रांची आई जेव्हा त्यांच्या केसांवरून मायेने हात फिरवते, मन गलबलुन येते. जेव्हा लाल डब्याच्या एसटीतून कुठेतरी जावे वाटे पैशांअभावी ते शक्य नसे, आज जगात कुठेही केव्हाही बिझिनेस क्लासने फिरतो तेव्हा हाच विचार मनात येतो ज्या वयात जे हवे होते ते देवाने मला का नाही दिले जसे वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्र त्यानेच हिरावून नेले, सारे सोसायला आम्हाला एकटे सोडले…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *