भाकरी करपली : पत्रकार हेमंत जोशी

भाकरी करपली : पत्रकार हेमंत जोशी 

शिवसेना भाजपा युतीने भाकरी परतवली फिरवली नाही म्हणून करपली, मी मला वाटते एकमेव कि सेना आणि भाजपा युतीने भाकरी फिरविणे कसे गरजेचे आहे, आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे गेल्या तीन वर्षां पासून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतो, इतर सारी वृत्तपत्रे मंत्री मंडळ विस्तार आणि बदल यावर फेक बातम्या लिहून मोकळे होत होते तेव्हा मी एकमेव, विस्तार होत नाही, होणार नाही, हे देखील तुम्हाला सांगत होतो. हा त्याच्याकडे बघत होता आणि तो यांच्याकडे बघत होता म्हणजे फडणवीस उद्धवजींकडे रोखून बघत होते आणि उद्धवजी फडणवीसांकडे संशयाने पाहत होते, त्यांच्या या एकमेकांकडे पाहण्यात वेळ निघून गेली, दोघांनीही भाकरी परतवली नाही परिणामी भाकरी जळली, करपली…


विदर्भातल्या वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकरांनी थेट शिवसैनिकांसमोर आणि संपर्क नेते गजानन कीर्तिकर यांच्या साक्षीने, उपस्स्थितीत मनात साचलेल्या रागाला अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली, शिवसेनेचे इतर आमदार अद्याप रस्त्यावर उतरलेले नाहीत एवढाच काय तो फरक, पण जी अस्वस्थता आमदार धानोरकरांच्या मनात होती त्यापेक्षा कदाचित कितीतरी अधिक पटीने मनातून अस्वस्थ शिवसेनेचे इतर आमदार आहेत, थेट निवडून न आलेल्या आमदारांना म्हणजे विधान परिषद सदस्यांना उद्धवजींनी मंत्री केले याचे तर प्रचंड अडचणींनवर लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना अतिशय वावगे आहेत, या मुद्दयांवर निवडून आलेले बोलतांना भान सोडून माय बहीण घेतात, हीच वस्तुस्थिती आहे कि मंत्री न करण्यात आलेले पण लोकांमधून थेट निवडून आलेले सेनेतले सारेच आमदार गेल्या तीन वर्षांपासून चिडून आहेत, केवळ राजकीय करिअरची वाट लावणे नको म्हणून विशेषतः शिवसेनेतले आमदार थेट मंचावर येऊन बोलत नाहीत, फक्त आमदार धानोरकरांनी ती काळजी ती चिंता न करता भावनांना वाट मोकळी करून दिली एवढाच काय तो फरक…


www.vikrantjoshi.com


मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार तसेच विविध महामंडळाच्या घोषणा न केल्याने जेवढे शिवसेनेतले आमदार अस्वस्थ आहेत चिडून आहेत डूख धरून आहेत रागावलेले आहेत अशांत आहेत तेवढी गंभीर मनस्थिती भाजपाच्या आमदारांची यासाठी नाही कि एकतर जवळपास सारी महत्वाची खाती भाजपाकडे आहे, जेवढे शिवसेनेचे मंत्री फक्त आपल्या मतदारसंघाचा आणि आपल्या स्वतःचा विचार करून मोकळे होतात तेवढी खालची पातळी भाजपाच्या मंत्र्यांनी न गाठल्याने भाजपा आमदारांची बऱ्यापैकी खाजगी आणि लोकोपयोगी कामे होत आलेली आहेत, हमखास होतात, अत्यंत महत्वाचे म्हणजे जर एखादे काम 

होत नसेल तर भाजपाचे मंत्री त्यांच्या पक्षातल्या अत्यंत प्रभावी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांकडे थेट आपली कैफियत मांडून मोकळे होतात आणि फडणवीस या आमदारांसाठी सदैव काहीही करायला तयार असतात अर्थात जे राज्याच्या किंवा त्या आमदारांच्या मतदारसंघाच्या हिताचे फायद्याचे असते…


अत्यंत महत्वाचे म्हणजे कामे करवून घेण्यासाठी भाजपाच्या आमदारांना अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्यांचे मंत्री मंडळ विस्तार विना फारसे काही अडकलेले किंवा अडलेले नसल्याने त्यांनाही मंत्री मंडळ विस्तार आणि बदल हवा आहे पण अगदी रस्त्यावर उतरून बंड करावे किंवा बाळू धानोरकर होऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी एवढे गंभीर वातावरण भाजपामध्ये नाही पण असेही नाही कि त्यांना बदल नको आहेत, त्यांच्यातल्या देखील अनेक पुरुष आमदारांनी सफारी शिवून ठेवलेल्या आहेत आणि महिला आमदारांनी पैठण्या घेऊन ठेवलेल्या आहेत, जळगाव जामोद च्या आमदाराची सफारी शिवून एवढे दिवस झालेत कि अलीकडे त्यांनी म्हणे ती सफारी किडकिडीत शरीरयष्टी असलेल्या आपल्या अग्रवाल आडनावाच्या ‘ खास ‘ मित्राला देऊन टाकली आहे, म्हणाले तूच ठेव, मी दिल्लीत गेलो कि पुढल्यावेळी तुझ्या शपथविधी साठी ती कामात येईल…


ज्यांना पुढल्या विधान सभा निवडणुकीत शिवसेना सोडायची आहे म्हणजे भाजपा मध्ये प्रवेश करून मोकळे व्हायचे आहे किंवा अन्यत्र कुठल्यातरी पार्टीत निघून जायचे आहे सेनेतले असे काही आमदार थेट देवेंद्र फडणवीसांना भेटून आपली कामे करवून घेतात, मोकळे होतात पण जे आमदार सेनेचे कट्टर आहेत, कडवे शिवसैनिक आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांकडे, भाजपाच्या इतरही मंत्र्यांकडे सार्वजनिक कामे घेऊन जातांना यासाठी अवघडल्यासारखे होते कि थेट उद्धवजी किंवा सामना दैनिकाने दरदिवशी भाजपाची माय बहीण, आय माय काढून ठेवलेली असते, आपल्या नेत्यांनी ज्यांची उतरवून ठेवलेली आहे त्यांच्याचकडे कसे काम घेऊन जायचे असे त्या कट्टर आमदारांना वाटणे स्वाभाविक असल्याने आणि कामे होत नसल्याने शिवसेनेतल्याबहुतेकांचा ‘ बाळू धानोरकर ‘ झालेला आहे, आपणही बोलून बंड करून मोकळे व्हावे, शिवसेनेतल्या अनेकांना ते तसे वाटते आहे…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *