पवारांचे पाप : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे पाप : पत्रकार हेमंत जोशी 

मुख्यमंत्री नशीबवान आहेत असे वाटते एखादी अदृश्य शक्ती त्यांच्या नक्की पाठीशी उभी आहे. उदाहरणार्थ विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि राज्यात चांगला पाऊस पडतो आहे. त्यातून जे काय चांगले घडते ते घडणार आहेच पण या मुख्यमंत्र्याने राज्यातल्या दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची जी कामें सरकारी तिजोरीवर फारसा ताण पडू न देता विविध असंख्य बजाज, अंबानी इत्यादी मोठाल्या कार्पोरेट कंपनांनींकडून त्यांच्याकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या सीएसआर फंडातून दर्जेदार जलयुक्त शिवाराची कामें करवून घेतली, ती तुम्हा आम्हा शहरात राहणाऱ्यांच्या तोंडात बोटे घालायला भाग पाडणारी आहेत…


प्रिया खान नावाच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारी आहेत, त्यांचा इतिहास येथे पाजळत बसत नाही त्याला अनेक कंगोरे आहेत पण सामाजिक भान अति उच्च दर्जाचे ठेवणाऱ्या या शिक्षित महिलेलने बिनबोभाट गाजावाजा न करता हे जलयुक्त शिवराचे काम मोठाल्या कार्पोरेट कंपनींकडून ज्या उत्कृष्ट पद्धतीने, निरलस मनाने सामाजिक कार्य करण्याच्या प्रदीर्घ अनुभवातून जाणिवेतून करवून घेतले, त्यावर येथे प्रिया खान यांचे कौतुक करणे मलाही भाग पडले. या राज्यात जो मराठा समाज आहे त्यातल्या प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराज रुजलेला असतो त्यामुळे आपण एकप्रकारे नेते आहोत राजे आहोत हे त्यांना सतत वाटत असते त्यामुळे होते काय फार मोठ्या प्रमाणात जे मराठा, सरकारी अधिकारी येथे या राज्यात आहेत त्यांना आधी युतीचे विशेषतः फडणवीसांचे काम आवडले, मग त्यांनीच ग्रामस्थांचे ब्रेनवॉश करत शरद पवार आणि काँग्रेस ला मनातून घालविण्याचे मोठे काम या राज्यात केले ज्याचा लोकप्रियता उंचावण्यासाठी मोठा फायदा फडणवीसांना तसेच युतीला नकळत झालेला आहे, वाढणारे मतदान त्यात नक्की या सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग उपयोगी पडला आहे त्यांनी रा. स्व. संघ ज्या खुबीने प्रचार व प्रसार करतो ते तसे काम अधिकाऱ्यांनी केले आहे…


www.vikrantjoshi.com


हीच शरद पवार यांच्या मनातली अस्वस्थता आहे कि मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना राजकीय ताकद देऊनही ते माझे का राहिलेले नाहीत. त्यातली वस्तुस्थिती अशी कि पवारांनी सामान्य मराठ्याला कधी मोठे होऊच दिले नाही त्यांनी पदमसिंह पाटलांसारख्या घराण्यांना मोठे केले कधी खालीही पाडले त्यामुळे सामान्य मराठे तर पवारांवर रागावलेच पण हि घराणी देखील त्यांची राहिलेली नाही. पवारांच्या अतिशय केविलवाण्या राजकीय अवस्थेचे जवलंत उदाहरण म्हणजे सांगली भागातले जयंत राजाराम पाटील. अलीकडे एका सभेत हेच पवार आपल्या घराण्याला स्वतःला बाजूला सारत म्हणालेत कि जयंत पाटील मुख्यमंत्री म्हणून चांगले काम पाहतील. पवार हे म्हणाले आणि त्याच आठवड्यात हेच जयंत पाटील त्या चंद्रकांत पाटलांशी बंद दरवाजाआड चर्चा करून मोकळे झाले. आजपर्यंतचे बहुतेक राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाहेर पडले, जयंत पाटीलांना उशीर का होतोय, नेमके कळत नाही…


अमुक एखाद्याला मोठे करतांना पवारांच्या मनात अनेक आराखडे असतात. महत्वाचे असे कि जेव्हा अमुक एखादा त्यांच्याकडला प्रभावी नेता बाहेर पडणार आहे त्यांना तशी कुणकुण लागते, पवार त्याला वेगळ्या पद्धतीने चुचकारतात. तटकरे बाहेर पडणार त्यांना लक्षात आल्यानंतर याच तटकरेंना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी नेमले तेच टेक्निक जयंत पाटील किंवा अमोल कोल्हे किंवा उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत यादिवसात वापरलेले जाते आहे. या तिघांच्या भरवशावर आमच्या पक्षाचे भवितव्य अशी पवारांनी अजितदादा, सुप्रिया,तो लफडेल पटेल इत्यादी नेहमीच्या चेहऱ्यांना बाजूला ठेवून केली आहे त्यामागचे कारण देखील नेमके हेच कि हेही स्टार जर त्यांच्या पक्षातून बाहेर पडले तर राष्ट्रवादीचे सूत्रे काय एखाद्या लंगड्या गायीच्या हाती सोपवायची ? 


तुम्ही गणपतराव देशमुखांसारख्या देशसेवी मंडळींना आणून राष्ट्रवादी उभी केली असती तर हे आज जे घडते आहे ते घडले नसते पण झटपट यश सत्ता आणि पैसे हे मिळायला उशीर झाला असता, विलंब लागला असता म्हणून पवारांनी मग गोविंदराव आदिक यांच्या सारख्या स्वयंभू नेत्यांना कोपऱ्यात टाकले अक्षरश: अपमानित करून त्यांचा कचरा केला, दत्ता मेघे केला आणि प्रफुल्ल पटेल, गिल्बर्ट मेंडोन्सा खुनी खुनशी पदमसिंह पाटलांसारखे पक्षात मोठे केले घडले काय आज तेच पाप पवारांना अस्वस्थ करते आहे, लोकांना राष्ट्र राज्य पुढे नेणारी मंडळी सत्तेत हवी आहेत अगदी मराठ्यांना देखील केवळ जातीकडे बघून नव्हे तर चांगले नेते सत्तेत हवे आहेत म्हणून साऱ्याच थरातल्या प्रभावी ठरलेल्या मराठ्यांनी देखील मोठ्या मनाने फडणवीसांनाचे नेतृत्व स्वीकारलेले आहे…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *