उद्धव ठाकरे आणि निखिल वागळे : पत्रकार हेमंत जोशी

उद्धव ठाकरे आणि निखिल वागळे : पत्रकार हेमंत जोशी 

उद्धव ठाकरे यांच्याविषयी, इट्स टू अर्ली टू प्रेसडिक्ट, उगाचच त्यांच्याविषयी आत्ताच अंदाज वर्तविणे नक्की चुकीचे ठरणारे आहे. मी तर हेच सांगतोय कि शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र कुटल्या नंतर जे सुपरफाइन रसायन तयार होईल ते म्हणजे उद्धव ठाकरे, ज्यांनी त्यांचा आजवरचा प्रवास अतिशय बारकाईने अभ्यासला असेल तेही माझ्या या सांगण्याशी नक्की सहमत असतील. त्यामुळे अलीकडे विविध समाजमाध्यमांवर पत्रकार निखिल वागळे यांची जी उद्धव यांच्याविषयी दिलेली म्हणाल तर मुलाखत म्हणाल तर प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे बऱ्यापैकी उथळ एकांगी सूडबुद्धीने एकतर्फी वाटते. निखिल म्हणतात, उद्धव ठाकरेंना बाळासाहेब आयुष्यात कधी समजलेच नाहीत कारण उद्धव यांचा स्वभाव बाळासाहेबांसारखा नाही, त्यांचा रडक्या स्वभाव आहे. उद्धव ठाकरे हे मनाने खुजे आहेत त्यांच्यात एकच दिलदार माणूस आहे तो म्हणजे राज ठाकरे. मी त्याच्या दिलदारीचा अनुभव घेतला आहे. मी राज ठाकरेंवर कितीही टीका केली तरी राज दिलदार आहेत, मैत्रीला जागणारा माणूस आहे, रात्री दोन वाजता जरी त्यांना फोन केला तरी तो तुमच्या मदतीला धावून येईल.. राज हा कलाकारांचा मित्र आहे, तोच खरा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. यांचा सतत बाळासाहेब ठाकरेंवर पहारा. एकदा मुलाखतीआधी मी उद्धव यांना म्हणालो कि मला एकांतात मुलाखतीआधी बाळासाहेबांशी बोलू द्या, मी काही अतिरेकी माणूस नाही, मी त्यांना काहीही करणार नाही, शेवटी त्यांनी मला पाच मिनिटे दिली. विशेष म्हणजे राज ठाकरेंविषयी ते जेव्हा बोलले तेव्हा उद्धव ठाकरे यांना दरदरून घाम फुटला होता. उद्धव ठाकरे हा खत्रूड मनाचा माणूस आहे, मी आताही त्यांना फोन केला पण ते फोन घेत नाहीत त्यांच्या माणसाने फोन घेतला. त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा फोन घेतात आणि तुमचा वापर करून घेतात. निस्वार्थीपणा त्यांना माहित नाही ते स्वार्थी आहेत. माझे त्यांच्याविषयी बरे मत नाही. बाळासाहेबांबद्दल माझे मतभेद असले तरी उमदेपणा त्यांच्यासारखा कोणाहीकडे नाही, एवढ्या उमद्या मनाचा एकही नेता मी बघितला नाही….

बाळासाहेब असतांना निखिल वागळे यांनी वरील संभाषण केले आहे. ते नेमके उद्धव ठाकरे सत्तेत आल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर रिपीट करणे त्यामागचा उद्देश नेमका दिसतो, उद्धव नेमके कसे हे लोकांना सांगणे आणि त्यातून त्यांची बदनामी करणे. मला येथे उद्धव यांची अजिबात बाजू घ्यायची नाही किंवा वागळे म्हणालेत ते सारेच खोटे असेही माझे मत नाही पण उद्धव जे कधीकाळी हे जे वागले वागत होते किंवा आजही कधीतरी त्यांचा तो मूळ स्वभाव उफाळून वर येतो ते जर तसे वागले नसते तर मी तुम्हाला अतिशय बारकाईने अभ्यास केल्यानंतर सांगतो कि जर उद्धव तसे वागले नसते तर ठाकरे घराण्याचे शिवसेनेचे आणि बाळासाहेब जिवंत असतांना त्यांचेही त्यांच्या हयातीतच तीन तेरा वाजले असते, शिवसेना भरकटली असती आणि अशा भरकटलेल्या शिवसेनेला हिशेबी राजकारणी व्यवहारी शरद पवारांनी कधीही जवळ घेतले नसते. जे आज राज ठाकरे यांचे पवारांनी मातेरे निदान सध्यातरी करून ठेवले आहे तेच उद्धव यांचे त्यांनी करून ठेवले असते…

बाळासाहेबांच्या वार्धक्यात शिवसेना केवळ आपल्यापुरती असे समजणारे मानणारे वागणारे अनेक नेते जेव्हा बाळासाहेबांच्या सभोवताली गुंडाळा करून होते, जेव्हा शिवसेना आहे आहे त्याच ताठ मानेने जगावी हे दिवाकर रावते यांच्यासारख्या फार कमी नेत्यांना जेव्हा वाटत होते त्यादरम्यान अनेक स्वार्थी आणि संधीसाधू प्रभावी नेते बाळासाहेबांच्या वार्धक्याचा गैरफायदा एकतर घेत होते किंवा तो घेण्यासाठी जेव्हा टपून बसून बसले होते तेव्हा याच उद्धव ठाकरे यांनी अतिशय थंड डोक्याने एकेकाची वाट लावून शिवसेना पुन्हा उभी केली मोठी केली  जिवंत ठेवली, माझ्या एकही वाक्यावर उद्धव यांनी नकार द्यावा मी पत्रकारिता सोडून देईल. जयंत पाटलांकडे धुणी भांडी करायला जाईल…

क्रमश: हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *