वीजदरवाढीचा शॉक : पत्रकार हेमंत जोशी

वीजदरवाढीचा शॉक : पत्रकार हेमंत जोशी 

अंदाज अपना अपना मध्ये जेव्हा जेव्हा अमीर खान हसतो तेव्हा तेव्हा, आज काहीतरी आफत ओढवणार आहे, त्याच्या बापाला देवेन वर्माला वाटत राहते. श्री विश्वास पाठक संघ परिवारातले आहेत पर्यायाने भाजपा परिवारातले आहेतच. जेव्हा केव्हा अमुक एखादया ठिकाणी व्यवस्थित घडी बसवायची असते, पाठक यांना तेथे मुद्दाम पाठविले जाते, पक्के संघ स्वयंसेवक असल्याने आदेश झालेत कि आपल्या उत्तम चाललेल्या व्यवसायाचा गाशा गुंडाळतात आणि क्षणाचाही विलंब न लावता हो सांगून जबाबदारी स्वीकारतात. सुरुवातीचा मुद्दा पुढे करतांना मला नेमके असे सांगायचे आहे कि जेव्व्ह जेव्हा विश्वास पाठक हे आपल्या नेहमीच्या वेगळ्या शैलीत हसायला सुरुवात करतात, का कोण जाणे पण त्यांना जवळून ओळखणारे हेच म्हणतात, काहीतरी नौबत येणार आहे, येथे हे यासाठी सांगितले कि वीज दरवाढ होण्याआधी पाठक यांना ज्या ज्या मंडळींनी पहिले, भेटले त्यांना पाठक सतत हसत असल्याचे जाणवले आणि तेच घडले, वीज दरवाढीचा प्रस्ताव पुढे आला…


नागपुरातले संघाचे मुखपत्र दैनिक तरुण भारत जेव्हा आर्थिक आचके द्यायला लागले, विश्वास पाठक यांना तेथे लगेच बसविण्यात आले. तोपर्यंत पाठक यांचे व्यवसायानिमीत्ते मुंबईत छान बस्तान बसलेले होते, त्यासाठी ते जगभर फिरतीवर असल्याचे. अर्थतज्द्न्य पाठक यांनी मग नागपुरातल्या तरुण भारताला थेट व्हेंटीलेटवरून बाहेर काढले, नव्या जोमाने तरुण भारत पुन्हा एकदा काठी टेकवत टेकवत का होईना बऱ्यापैकी चालायला लागलेले आहे. येथे बूड टेकत नाही तोच नागपूरचे त्यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाले, त्यांनी आपणहून आग्रह करून विश्वास पाठकांना मुंबईत आणले, ऊर्जा मंडळाचे संचालक म्हणून नेमले, पुन्हा एकदा पाठक यांनी हि नवी जबाबदारी स्वीकारली, ऊर्जा खात्याला आणि बावनकुळे यांना कुठेही काळा डाग लागणार नाही याची आता ते डोळ्यात तेल घालून काळजी घेतात, असे दिसते कि त्यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून चंद्रशेखर बावनकुळे यांचे मंत्री म्हणून भले व्हावे, चांगले नाव व्हावे म्हणून पाठक यांनी स्वतःला 

सध्या ऊर्जा खात्यात वाहून घेतलेले आहे…


अलीकडे वीज दरवाढ झाली किंवा होते आहे त्यामुळे वीजखात्याच्या नावाने नव्याने बोंबाबोंब सुरु झालेली आहे, साहजिकच सर्वसामान्यांचा वीज किंवा वीजदरवाढ हा आपुलकीचा विषय, विरोधकांनी दुखती नस नेमकी पकडून सामान्यांना भडकावणे सुरु केले असतांना विश्वास पाठक यांनी त्यावर नेमके कारण सांगून दरवाढ आवश्यक कशी, छान सांगितले आहे, स्पष्ट शब्दात मांडले आहे, ‘ आपल्या या राज्यात सध्या वीज महावितरण कंपनी २ कोटी ४० लाख ग्राहकांना वीज पुरवठा करते. तिच्या ताळेबंदानुसार ती वर्षाला सरासरी ६५ हजार कोटी रुपयांची वीज विक्री करते. त्यापैकी तब्बल ८० टक्के खर्च केवळ वीज खरेदीवर होतो. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य नियामक आयोग हा खरेदी दर ठरवत असतो. उर्वरित २० टक्क्यांपैकी १० टक्के हा वित्तीय खर्च असतो व उर्वरित १० टक्के कर्मचाऱ्यांचे पगार, संचलन व सुव्यवस्थेवर होत असतो. वस्तुस्थिती अशी आहे कि जर वीज दरवाढ केली नाही तर दरवर्षी वाढत गेला वाढत जाणारा खर्च वसूल कसा करायचा, मोठी समस्या वीज वितरण कंपनी समोर उभी ठाकल्याने वीज दरवाढ करण्याशिवाय त्यांच्यासमोर मार्ग नव्हता…


सध्या अतिशय हास्यास्पद आरोप असा केला जातोय कि जी ३० हजार कोटी रुपयांची थकीत वसुली आहे त्यासाठी म्हणजे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी ३५ टक्क्यांनी वीज दरवाढ होणार आहे. हा म्हणाल तर कांगावा आहे म्हणाल तर शुद्ध थाप आहे म्हणाल तर केवळ अफवा पसरवलेली आहे, कारण थकीत वसुलीसाठी दरवाढ हि बाब कोणत्याही कायद्यात बसत नाही. त्यामुळे वीज वसुलीसाठी दरवाढ होणार आहे, असे म्हणणे म्हणजे एकतर अज्ञान आहे किंवा बदनामीचे मोठे षडयंत्र आहे. ‘ वीजदरवाढीची पाठक यांनी सांगितलेली वस्तुस्थिती वरील दोन परिच्छेदात मांडलेली आहे, सांगितलेली आहे, वास्तविक त्यांनी आणखी व्यापक मुद्दे वीज दरवाढी संदर्भात मांडलेले आहेत, सारेच मुद्दे येथे घेणे अशक्य आहे, त्यासाठी तुम्हाला ‘ ऑफ द रेकॉर्ड ‘ चा पुढला अंक वाचावा लागणार आहे. मला तर कधी कधी असे वाटते कि विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा सोडून केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या सदस्यांचे तेवढे मंत्रिमंडळ तयार केले आणि ब्राम्हणेतर मुख्यमंत्री दिला रे दिला कि ना कोणती आंदोलने उभी राहतात, ना कोणाची बदनामी, महाराष्ट्र मग कितीही पोखरला गेला तरी. असे वाटते,हे राज्य केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरते तेवढे मर्यादित आहेत, इतर भागाची अवस्था गुलामांसारखी आहे आणि या गुलामांच्या नेत्यांनी चांगले होण्यासाठी धडपड केली कि त्यांच्यातले नेतृत्व मारून टाकण्यासाठी आकाश पाताळ एक केल्या जाते. उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी या गुलामगिरीतून कधी बाहेर पडायचे, कधी समाधानाचा मोकळा श्वास घ्यायचा…

तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *