महत्वाकांक्षी महाजन ४ : पत्रकार हेमंत जोशी

महत्वाकांक्षी महाजन ४ : पत्रकार हेमंत जोशी 

अटलजी शरीराने तसे १६ तारखेला गेले पण तुमच्या आमच्या विस्मृतीत ते १४ वर्षांपूर्वीच गेलेले होते, आपण भारतीय जन्मदात्यांना किंवा ज्यांचे मीठ खाऊन घडलो, मोठे झालो त्यांना विसरतो, मग अटलजी तर फार दूरचे होते.आपल्याकडे अगदी भाजपावाल्यांनाही वेळ कुठे होता त्यांची आठवण काढायला, ते शरीराने जिवंत आहेत तेवढे मात्र सर्वांना माहित होते पण त्यांचे विचार तर केव्हाच आपल्या दृष्टीने मेलेले होते. एखादा तरी मंत्री या मंत्री मंडळात आहे का जो त्यांच्या विचाराने चालतो, बहुतेकांवर मुंडे महाजन यांच्या विचारांचा पगडा आहे, ज्याला त्याला अटलजी नव्हे फक्त पैशांनी झटपट श्रीमंत व्हायचे आहे. अटलजी तर असे होते ज्यांच्या विचारांनी प्रसंगी प्रत्येक राजकीय नेत्यांनी प्रभावित होऊन काम करायला हवे होते, प्रखर देशभक्ती आणि मोहापासून कोसो दूर. जो तो सांगतोय, मी त्यांना असे जवळून बघितले, तसे जवळून बघितले पण कोणीही हे सांगायला तयार नाही कि आम्ही त्यांचे विचार आचरणात आणले. सारेच सारखे, सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे देखील…


मी माझ्या देशासाठी दिवसभरात कोणते चांगले काम केले, रात्री अंथरुणावर पडल्यानंतर, झोपण्याआधी तुम्ही हे असे कधी आपल्या मनाला विचारलेले आहे का, मी विचारतो आणि तसे वागतोही, म्हणून येथे ज्ञान पाजळतोय. अनेक भेटल्यानंतर मला विचारतात, समोरचा मग कोणीही असो, तुम्ही पंगा घेऊन मोकळे होता, भीती वाटत नाही…मी नाही सांगतो, समाजातले बदमाश वठणीवर आणणे हे अजिबात चुकीचे नाही, जीव काय आजही जाईल किंवा उद्याही…अगदी काल पर्वा तुर्की ला जाऊन आलो. मला जग बघायचे आहे, जवळपास अर्धे बघून झाले, बघूया राहिलेले कसे पूर्ण होते ते. नियोजन करतो मग प्रवासाला निघतो,त्यामुळे फार खर्च येत नाही, शॉपिंग करायचेच नसते. दिवसभरात माझा शक्यतो एकही रुपया खर्च होत नाही, दररोज एक कॉफी घेतो, ती देखील फुकटात प्यायची सोय माझ्या धाकट्या मुलाने करून ठेवलेली आहे, पैसे खर्च होत नाहीत मग न खर्च झालेले पैसे जमा करतो आणि विदेश प्रवासावर खर्च करतो. आपल्याकडे फक्त थोर विचार तेवढे आहेत, आचरणात कोणतेही चांगले विचार आणल्या जात नाहीत. टर्की मध्ये अगदी नागपूर सारखे ऊन असते पण ज्यादा वायफळ वीज खर्च होऊ नये म्हणून त्या देशात कुठेही शक्यतो वातानुकूलित यंत्रणा नाही, विशेष म्हणजे पंखे देखील नाहीत पण त्या लोकांनी हवामानाशी एवढे छान जुळवून घेतले आहे कि त्यांना या ऐषोआरामाची आठवण देखील येत नाही. मी ठिकठिकाणी पंचतारांकित हॉटेल मध्ये उतरलो होतो पण तेथल्या खोल्यांमध्ये देखील सेन्ट्रली वातानुकूलित यंत्रणा फारशी आढळली नाही फारतर भिंतींवर एसी मशिन्स बसविलेले आहेत, आपल्याकडे हे असे कधी घडेल, जो तो स्वतःच्या कुटुंबाचा नव्हे तर देशाचा विचार कधी करतांना दिसेल, कि हे कधी घडणारच नाही, चालायचेच, राजकीय पक्ष मग तो कोणताही असो, त्यांचे आदर्श गणपतराव देशमुख नव्हे जयंत पाटील असतात…


एक काळ असा होता जेव्हा एकनाथ खडसे नेते होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यातले एक गिरीश महाजन होते, बघता बघता सारे बदलले, उद्या हेच गिरीश महाजन राज्याचे प्रमुख झालेत तर एकेकाळी महाजन खडसेंच्या भेटीसाठी रांगेत उभे असायचे, कदाचित आता ते खडसेंच्या बाबतीत घडेल, मुख्यमंत्र्यांनी बोलाविले कि आत जाईन, बाहेर बसलेले खडसे असे शेजारच्यांना सांगू शकतील. महाजनांनी आलेल्या सुवर्ण संधीचा स्वभावाप्रमाणे फायदा घेतला, खडसे पुरावे सोडतात, महाजन चतुर आहेत, त्यांचे पुरावे मिळविणे तसे कठीण काम असते म्हणून ते वेगाने पुढे जाताहेत, आता त्यांनी खडसेंना किंवा सुरेशदादा जैन यांना मागे टाकलेले आहे, उद्या हे असे मागे टाकणे आपल्याबाबतीतही घडू शकते का, कुठेतरी मनात हा विचार फडणवीसांनी 

कोरून ठेवायला हवा…

विविध आरोग्ये शिबिरे भरवून राज्यातल्या लोकांची वाहवा मिळविणाऱ्या गिरीश महाजन यांनी गेल्या चार वर्षात सिंचनासाठी नेमके काय केले, ते त्यांनी जनतेला ऐकवले तर बरे होईल. निर्णय घेणे किंवा घेतलेले निर्णय सांगणे सोपे असते पण निर्णय अमलात आणणे महा कठीण असे काम असते अर्थात हे मी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील म्हणतो आहे कि झाडे लावून तुम्ही चांगले काम केलेले आहे पण ते जगलेत किंवा नाही हे आम्हा पत्रकारांना बघायचे आहे,थोडक्यात रोपट्यांना पाणी घालतांनाचे पत्रकार आम्हाला बघणे तेवढे रुचणार नाही जेवढे वाढलेल्या वृक्षांचे फळे चाखणारे पत्रकार बघतांना आनंद होईल, कारण फार सोपे आहे, वन खात्यातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वृक्ष तोडून ते खाण्याची म्हणजे गु तेवढा खाण्याची वाईट सवय पुरातन काळापासून लागलेली आहे, वृक्ष जागवून फळे चाखणारे वन कर्मचारी अधिकारी अद्याप 

जन्माला यायचे असल्याने ते मुनगंटीवार यांना देखील चुना लावून केव्हा मोकळे होतील सांगा येत नाही, म्हणून भीती वाटते. मध्यंतरी तसे पश्चिम महाराष्ट्रात घडलेही आहे म्हणजे मुनगंटीवार यांनी लावलेले वृक्ष पाणी न दिल्याने जळून खाक झाले होते, पुढे त्या प्रकरणाचे नेमके काय झाले अद्याप कळले नाही..

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *