ज्योती अळवणी कथा विविधा : पत्रकार हेमंत जोशी


ज्योती अळवणी कथा विविधा :  पत्रकार हेमंत जोशी 

ज्योती अळवणी या कोपऱ्यावरच्या उत्तम भेळवाल्यासारख्या मज भासू लागल्या आहेत. आपला नेहमीचा आवडता भेळवाला कसे एकाच स्टीलच्या स्वच्छ भांड्यात पटापट मुरमुरे टाकतो, चिवडा शेंगदाणे टाकतो, तिखट आणि गोड चटणी टाकतो, पाणी शिंपडतो, कोथिंबीर व कांदा घालतो, पापडीचा चुरा कुस्करून टाकतो, सारे काही झटपट टाकूनही तुमच्यासमोर त्यातून उत्तम भेळ मांडतो, तुमच्या तोंडाला आधीच पाणी सुटलेले असते, ती भेळ समोर येताच तुम्ही एकही क्षण न दवडता ती भेळ हादडून मोकळे होता….

ज्योती अळवणी त्यांच्या सतत संपर्कात येणाऱ्या मंडळींना आणि त्यांच्या नवर्याच्या म्हणजे आमदार पराग अळवणी यांच्या विधान सभा परीक्षेत्रातील मतदारांना, आम जनतेला किंवा त्यांच्या स्वतःच्या महापालिका परिक्षेत्रातील सामान्य माणसाला, मतदारांना आपल्यातल्याच एक वाटतात, कोपर्यावरल्या भेळवाल्यासारखे त्यांचे आहे म्हणजे जे काय उत्तमोत्तम असेल ते एकत्र करून कुठेही फजिती गडबड गोंधळ न होऊ देता त्या त्यांच्या मतदारांसमोर पेश होतात म्हणून त्यांना तुमच्या आवडत्या भेळवाल्याची उपमा मी दिली आहे….


www.vikrantjoshi.com

अगदी अलीकडे त्यांचा ‘ कथा विविधा ‘ हा विविध कथांनी नटलेला उत्तम सजलेला कथा संग्रह प्रसिद्ध झाला त्यानिमीत्ते मला हेच सांगावेसे वाटले कि याच त्या ज्योती पराग अळवणी ज्या एकाचवेळी वेळात वेळ काढून लिखाण करतात, नगरसेविका म्हणून महापालिका आणि त्यांचा मतदारसंघ गाजवून मोकळ्या होतात. जगप्रसिद्ध पार्ले महोत्सव दरवर्षी न चुकता दिमाखात साजरा करतात. बरे, असेही नाही कि त्यांचा नवरा कुठेतरी संघाच्या एखाद्या छोट्याशा खाजगी बँकेत कारकुनी करतो आणि संध्याकाळी व सकाळी बायकोला घरी सारी मदत करून मोकळा होतो. असे अजिबात नाही कारण पराग हेही आमदार आहेत वरून ते कार्य आणि कार्यक्रम सम्राट असल्याने त्यांनी घरी कमी बाहेर स्वतःला खूपच जुंपून घेतलेले आहे या अशा अस्ताव्यस्त आणि व्यस्त नवऱ्याला त्या कायम सहकार्य करतात वरून घरातही लक्ष घालून मुलींकडे एक दक्ष आई म्हणून तेवढेच लक्षही ठेवतात, देतात. हे असे सतत ज्योती पराग यांचे सकाळ पासून तर रात्री उशिरापर्यंत अति व्यस्त आयुष्य आहे तेही एक स्त्री असून…

असे देखील नाही कि इतरत्र लक्ष घातल्याने त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यातून त्या हुबेहूब राज्यमंत्री विद्या ठाकूर दिसू लागलेल्या आहेत म्हणजे केवळ स्त्री म्हणून जन्माला आलेल्या आहेत म्हणून त्यांना स्त्री म्हणायचे. नाय, नो, नेव्हर, आजही ज्योती पराग अळवणी यांनी जर जुहूच्या मिठीबाई कॉलेज मध्ये प्रवेश घेतला तर मला खात्री आहे, त्यांच्या मागे शिटी मारणाऱ्यांचे कॉलेज तरुणांचे मोठे टोळके लागेल आणि क्या खूब लागती हो, हे गाणे अनेक तरुण त्यांच्या पाठींपुढे ते गुणगुणतांना दिसतील. म्हणणारे म्हणतात देखील, हाय परागकाका आणि हाय मिस ज्योती, काही तर अशीही हूल उठवून मोकळे झाले आहेत कि पराग यांनी माजी मंत्री दत्ता मेघे यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीशी म्हणजे ज्योती यांना पळवून नेऊन लग्न केलेले आहे, खरे खोटे पराग आणि परमेश्वर जाणे….😜😛

कथा विविधा हा त्यांचा पहिलाच कथा संग्रह आणि कथालेखनाचा देखील हा त्यांचा पहिलाच प्रयत्न पण कथा संग्रह वाचल्यानंतर त्यांनी हे साहित्य क्षेत्रात टाकलेले दमदार पाऊल आहे असे कोणीही म्हणेल. म्हणणे माझे फारसे नक्की आगाऊपणाचे ठरणार नाही पण हेच सांगतो कि व. पु. यांच्या कथा जशा वाचतांना भान हरपून टाकायच्या आणि ऐकतांना तल्लीन करून सोडायच्या सेम तेच कथा लेखिका म्हणून ज्योती अळवणी यांच्या बाबतीत वाटते. कथा विविधा हाती घेतल्या नंतर एका दमात वाचून मोकळे व्हावेसे वाटणारे ओघवत्या शैलीचे दमदार शब्दांचे एक छान पुस्तक आहे, हे मनातून मनापासून मनःपूर्वक तुम्हाला सांगतो. एक डोळस सामाजिक कार्यकर्ती मनात काय काय साठवते साचवते आणि त्यातून ती ताकद असेल तर ते शब्दातून केवढे प्रभावी प्रकट करू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्योती पराग अळवणी यांचे कथा विविधा. नक्की वाचावे तेही विकत घेऊन असे हे विविध कथांचे एकत्रित गुंफण, वाचनीय पुस्तक…

जाणून बुजून अपत्यांची मर्यादित संख्या ठेवून एकत्र जनतेला समाजाला समाज कार्याला वाहून घेतलेले अळवणी दाम्पत्य. राजकीय महत्वाकांक्षा असूनही केवळ त्यामागे न धावता आपणही आपल्या घराचे आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पुढे पुढे धावणारे अळवणी दाम्पत्याचे यशस्वी जीवन, वरून उदरनिर्वाहाचे काहीतरी साधन असावे म्हणून पराग यांचे छुटपूट व्यवसाय, मला वाटते दोघांचे उत्तम नियोजन त्यातून त्यांना यश मिळाले ते यशस्वी ठरले आहेत. पराग म्हणतात ते मनाला तंतोतंत पटते, ‘ नगरसेविका या नात्याने काम करतांना मिळालेल्या अनुभवातून आणि वाचनातून सुरु झालेला हा प्रवास गेल्या सात आठ वर्षात लेखनापर्यंत पोहोचलेला मी पाहिलेला आहे. घर, मुली, मतदारसंघ अशा जबाबदाऱ्या सांभाळत असतांना एखादा विषय मनाला भिडला तर ती जिद्दीने कधी भल्या पहाटे तर कधी दुपारी, तर कधी मध्यरात्री जागून लिहीत असे. आपल्या मनाला भिडलेल्या विषयाला न्याय देण्याच्या तिच्या प्रामाणिपणामुळे अनेक कथा, कविता तिने लिहिल्या. ‘ आमदार अळवणी यांचे हे त्यांच्या पत्नीविषयीचे केलेले कौतुक, मला वाटते प्रत्येक नवऱ्याची पत्नी हि अशीच असावी त्याला स्वाभिमान वाटावा अशी आणि सतत काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द ठेवणारी…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *