समृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी


समृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 


 सतत चार दशके पत्रकारिता, या काळात अनेक प्रकल्प घडतांना किंवा बिघडतांना बघितले पण समृद्धी महामार्ग हा विशेषतः मराठवाडा व विदर्भासाठी खऱ्या अर्थाने समृद्धीची द्वारे खुली करणार असल्याने जसे आपण सारे मुंबई पुणे जलद द्रुतगती महामार्ग पूर्ण होत असतांना कमालीचे भावुक झालो होतो तेच समृद्धी महामार्गाच्या बाबतीत विशेषतः विदर्भ व मराठवाड्याचे होत असल्याने हा पूर्ण झालेला महामार्ग बघण्यासाठी आमचे डोळे आतुर आहेत, मोठी हिम्मत लागते पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रांतीयवादी बदमाश नेत्यांची नाराजी ओढवून विदर्भ व मराठवाड्याचा विकास साधतांना पण हि हिम्मत अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यात पुरेपूर आहे पुरेपूर होती म्हणून त्यांनी म्हणाल तर या जळकुट्या काही नेत्यांच्या नाकावर टिच्चून समृद्धी महामार्ग भव्य प्रकल्प हाती घेतला आणि मार्गी लावला त्यानंतरही म्हणजे महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे पुरून उरले आणि त्यांनी हे काम सुरु ठेवण्यास इतरांना भाग पाडले. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग ‘ फडणवीसांच्या आधी गडकरींच्या ‘ कार्यकाळात अस्तित्वात येऊन पूर्ण झाला आणि बघता बघता पुणे ते मुंबई असा अवाढव्य परिसर प्रचंड प्रगती साधून मोकळा झाला, यापुढे समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नेमके तेच विदर्भ मराठवाड्याचे होणार आहे म्हणजे मुमताज जशी एक्स्ट्रा म्हणून आली पण आघाडीची नायिका म्हणून निवृत्त झाली ते तसेच येथेही घडणार आहे, आमच्या विदर्भाचा देखील बघता बघता ‘ मुमताज ‘ नक्की होणार आहे. वाचकांनो, हा असा प्रगत महाराष्ट्र झपाट्याने घडविण्यासाठी फडणवीस, गडकरी, मनोहर जोशी, प्रमोद महाजन अशांचा देखील सत्तेत हमखास सहभाग आवश्यक आहे असे मी जोशी असल्याने येथे तुम्हाला तसे सूचित करतो आहे… 

समृद्धी महामार्ग पूर्ण होत असतांना अनेक प्रमुखांचे सहकार्य त्यात मिळते आहे पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार आणि सहव्यवस्थापकीय संचालक श्री अनिल गायकवाड या दोघांची हिम्मत व मेहनतीची दाद द्यायलाच हवी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे माझी शेती आहे त्या शेतीवर जाण्या जो तीन किलोमीटर लांबीचा रस्ता मला हवा आहे काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे गेली दहा वर्षे तो रखडला आहे कारण एकदा का ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केली कि ते थेट रस्त्यावर फतकल मारून बसतात आणि तुमचा प्रकल्प उधळून लावतात आणि येथे तर ७०१ किलोमीटर लांबीचा व १२० मीटर रुंदीचा समृद्धी महामार्ग तेही प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन पूर्ण करायचा होता पण एकदा का सरकारी अधिकाऱ्यांनी अमुक एखादे काम फत्ते करायचे ठरविले कि ते किती खतरनाक ठरू शकतात त्यावर उत्कृष्ट ज्वलंत उदाहरण मोपलवार, गायकवाड आणि त्यांच्या प्रत्येक सहकाऱ्यांचे, आम्हीही आधी शेतकऱ्यांचीच मुले आहोत नंतर सरकारी अधिकारी आहोत असे अगदी ठणकावून प्रसंगी बाह्या वर करूनही या अधिकाऱ्यांनी अनेक विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना त्यांच्या टग्या नेत्यांना भर चौकात सुनावले आणि बघता बघता समृद्धीचे काम मार्गी लागले. कोरोना महामारीला देखील अजिबात न जुमानता गायकवाड व मोपलवार दररोज कामावर जात होते शेवटी घडायचे तेच घडले त्या दोघांनाही कोरोना झाला पण बेडवर पडूनही ते काम करत होते अक्षरश: मृत्यूला देखील न जुमानता. येत्या ३० ऑकटोबरला अनिल गायकवाड यांचा वाढदिवस आहे त्या दोघांनाही आपण अगदी मनापासून दीर्घायुष्य चिंतूया पण आणखी एक सांगतो यादिवसात त्या कोरोना नंतर अनिल गायकवाड यांना मोठा अपघात झाला आहे पण हे महाशय थेट बेडवरुन वर्क फ्रॉम होम करताहेत, मला खात्री आहे, माझे आमचे स्वप्न नक्की प्रत्यक्षात उतरणारच आहे…

सुरुवातीला मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग पूर्ण झाला नंतर द्रुतगती महामार्गाचे हे प्रगतीकरण थेट कोल्हापूर बेळगाव गोवा व कोकणापर्यंत पोहोचल्याने या अतिप्रचंड परिसराचा बघता बघता कसा कायापालट अतिशय झपाट्याने झाला हे तुम्ही आम्ही सारेच त्याचे साक्षीदार आहोत. राज्यातील रस्ते वीज व पर्यावरण या तिन्हीचा ज्यादिवशी कायापालट होईल आम्ही मग देशात साऱ्यांना मागे टाकू, दुर्दैवाने भ्रष्टाचार हाच आमचा शिष्टाचार असल्याने नेमके चांगले फार कमी घडते. अनिल गायकवाड म्हणतात, समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते थेट नागपूर दरम्यान प्रवासातील जवळपास सात तास वेळ नक्की वाचणार आहे. या दिवसात रस्त्याने नागपूरपर्यंत गेल्यास माणूस अक्षरश: आजारी पडतो. गायकवाड पुढे म्हणतात, विदर्भ व मराठवाड्यातील सर्वसामान्य माणसाला यातून यशाची दारे खुली होतील त्यांना अगदी सहज ये जा करता येईल, शेतीपूरक व्यवसाय उभे करून त्यांना जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल. ३०-३२ मोठे पूल तसेच ३०-३२ लहान पूल किंवा डोंगरदऱ्यातून बोगदे उभे करणे तसे या भागात प्रचंड कठीण असे काम पण आमचे कंत्राटदार ते आनंदाने करताहेत आणि आम्ही सारे त्यावर अगदी बारकाईने दर्जा बाबत लक्ष ठेवून आहोत. पुढल्या दोन चार महिन्यात कोणत्याही क्षणी शिर्डीपर्यंत हा महामार्ग खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल, खात्री आहे. या महामार्गावर उभी करण्यात येणारी सुविधा केंद्रे किंवा इतर अनेक सुविधा, संपूर्ण राज्याचे रुपडे त्यातून नक्की बदलणार आहे. विकासाचा प्रादेशिक समतोल खऱ्या अर्थाने साधल्या गेला असे समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सारेच नक्की सांगतील. वित्त मंत्री, वित्त सचिव किंवा त्यात्या वेळेचे मुख्यमंत्री यांनी आधार व सहकार्य दिल्याशिवाय हे काम मार्गी लागणे अशक्य होते पण आम्हाला आजतागायत कोणीही आडकाठी आणली नाही विशेष म्हणजे मोपलवार साहेबांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव, मेहनती वृत्ती, काम करून घेण्याची हातोटी, आम्हाला समृद्धी महामार्ग मार्गी लावतांना हे त्यांचे अनुभव मनापासून भावले. या महामार्गाच्या कवेत विदर्भ मराठवाड्यातले येणारे १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ विविध गावे व आसपासची खेडी असा प्रचंड परिसर सामावला जात असल्याने खऱ्या अर्थाने आजवरच्या राज्यातील इतिहासात हा म्हणाल तर देशातील सर्वाधिक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुढे येतो आहे. विदर्भातील आपल्या गावापर्यंत मजेत ड्रायव्हिंग करीत जाण्याचा निर्भेळ आनंद आता अनेकांना लवकरच लुटता येणार आहे… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *