विषय वेगवेगळे : पत्रकार हेमंत जोशी

विषय वेगवेगळे : पत्रकार हेमंत जोशी 


८० च्या दशकापर्यंत जन्माला आलेल्या जन्माला येणाऱ्या पिढीच्या मनातले नेमके ताड़ता येत होते, ८० चे दशक संपल्यानंतर जन्माला आलेल्या जन्माला येणाऱ्या पिढीच्या मनात नेमके काय आहे हे आई वडिलांना काय, साक्षात ब्रम्हदेवाच्याही लक्षात येत नाही, येणार नाही, अनप्रेडिक्टेबल एवढेच काय त्यांचे वर्णन करता येते, करता येईल. आपल्यातले अनेक पैशांनी श्रीमंत झाले पण कौटुंबिक वातावरण अति झपाट्याने गढूळ झाले, त्यात एक किंवा फारतर दोन मुलं, त्यामुळे माय बाप कायम असुरक्षित, आता तर मीच हेच सांगत सुटलोय, तुम्हीही प्रचार करा आणि तमाम मराठींना सांगा, जेवढी अधिक मुले जन्माला घालता येतील, घालून मोकळे व्हा. मराठी माणूस बाहेरच्या संकटांना किंवा अडचणींना घाबरत नाही, तो खचलाय घरातल्या असुरक्षित वातावरणामुळे, आपली मुले किंवा मुली आपल्याला केव्हा कुठल्या गंभीर अडचणीत, दुःखात,संकटात टाकून मोकळे होतील, या भीतीने तो ग्रासलाय,त्रासलाय, घाबरलाय. एक प्रयोग जाणीवपूर्वक आम्ही सुशिक्षित आणि श्रीमंत झालेल्या मराठी कुटुंबांनी पुन्हा एकदा करून बघायला हरकत नाही, एकत्र कुटुंब पद्धत, काळाची गरज आहे, ते करून बघा, त्यासाठी तुम्हाला लोकमत च्या दर्डा कुटुंबाचे उदाहरण देतो…

वास्तविक दर्डा आणि त्यांची चालूगिरी यावर मी नेहमीच टीका करीत आलोय, पण त्यांच्यात असे नक्कीच अनेक चांगले गुण असतील ज्यातून त्यांची तिसरी, चौथी पिढी देखील प्रगतीकडे झेप घेऊन मोकळी होते आहे, अर्थात त्यांच्या या यशाचे बऱ्यापैकी श्रेय देता येईल राजेंद्र आणि विजय दर्डा यांना. त्यांचे आजही वेगवेगळ्या शहरात राहून एकत्र व्यवसाय एकत्र कुटुंब, कुटुंबातल्या सदस्यांची पुढल्या प्रत्येक पिढीची एकमेकांशी बांधिलकी, घरातल्या थोरांविषयी कमालीचा आदर, वडिलांशी अंतर राखून त्यांच्याशी आदराने बोलणे, मला नाही वाटत, त्यांचे यश हिरावून घेण्याची ताकद देवताही असेल. वास्तविक विजय किंवा राजेंद्र दर्डा यांच्या जागी आपली मराठी पिढी असती तर दोन लग्नें करून मोकळ्या होणाऱ्या बापाला मराठी मुलांनी लाथा बुक्क्या मारून घराबाहेर काढले असते पण राजेंद्र आणि विजय दर्डा यांनी त्यांच्या वडिलांचे दुसरे कुटुंब आणि बाबूजींच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलींनाही सख्या बहिणींचा दर्जा देऊन, घरात घेतले, सारे एकत्र नांदले. आणि याचे श्रेय प्रामुख्याने जाते ते विजय दर्डा यांना, ज्यांनी शेवटपर्यंत जवाहरलाल दर्डा घरी किंवा बाहेर अपमानित होणार नाहीत, एकत्र कुटुंब विभक्त होणार नाही, याची काळजी घेतली आणि अमाप व्यावसायिक यश त्यातून ते मिळवीत गेले. हे असे वृत्तपत्रात जी पोतनीस यांच्यासारखी मराठी कुटुंबे होते त्यांना अजिबात जमले नाही आणि ज्यांच्या घरात कुटुंब प्रमुख भलेही पुढल्या पिढीला नालायक वाटत असेल पण त्याला जर मानसन्मान नसेल, कुटुंब प्रमुखाला बसता उठता पुढल्या पिढीकडून फक्त आणि फक्त अपमानित व्हावे लागत असेल तर अशा कोणत्याही मराठी व्यवसायिक कुटुंबाचा त्याच्या धंद्यात दर्डा होणे अशक्य, पुढल्या काही वर्षात हे असे एकमेकांना लाथा बुक्क्या मारणारे मराठी कुटुंब रस्त्यावर आले, हेच तुम्हाला बघायला मिळेल, तुमच्या घराचाही राजा राणी ट्रॅव्हल्स होतांना वेळ लागणार नाही आणि हे मी स्वतःला, माझ्या कुटुंब सदस्यांना देखील सांगतो आहे, ज्यांनी तुम्हाला यश काय असते हे दाखवून दिले आहे, ज्याने तुमच्या घरात सुबत्ता आणली आहे त्या कुटुंब प्रमुखाला जर पुढली पिढी उठता बसता त्याचे जिणे, जगणे मुश्किल करून सोडत असेल तर, त्यालाच नालायक ठरवून मोकळी होत असेल, थोडक्यात बापाला सेक्स करणे शिकवत असेल तर असे घर, अशी व्यवसायिक मराठी कुटुंबे पुन्हा एकदा रस्त्यावर यायला वेळ लागत नाही…

दर्डा कुटुंबात दोन भाऊ दोन वेगवेगळ्या शहरात, एक औरंगाबादला दुसरा नागपूरला, तरीही बाहेरून बघणार्याला वाटते, हे दर्डा सारे आजही जसेच्या तसे एकत्र, अमराठी व्यापारी कुटुंबे हे असे पिढ्यानपिढ्या एकमेकांना घट्ट बिलगून असतात म्हणून ते कधी संचेती असतात तर कधी दर्डा, यश त्यांच्या पायाशी लोळण घेत असते. व्यवसायिक कुटुंबातल्या प्रमुख तरुणाने या घरातले आपण दुर्योधन नव्हे युधिष्ठिरच व्हायचे आहे हे एकदा मनाशी मनापासून ठरविले कि त्या घराचा उत्कर्ष व्हायला फक्त पुढली काही वर्षे लागतात पण त्याच प्रमुख तरुणाने दुर्योधन व्हायचे ठरविले कि असे घर असे कुटुंब पुढल्या वर्षा दोन वर्षात बरबाद होणार आहे हे सांगायला मग कोणत्याही भविष्य सांगणाऱ्याची गरज नसते…

मला एकदा दिवंगत दिग्विजय खानविलकर म्हणाले होते, यश पचविणे मराठी माणसाला कठीण जाते, त्यांच्यात लगेच भाऊबंदकी सुरु होते, अगदी शिवाजी महाराजांपासून हा इतिहास आपल्यासमोर आहे. आणि खरेही आहे ते, यशाची मस्ती डोक्यात गेली, आपण माजलो कि आपले, आपल्या कुटुंबाचे सारे संपले हे ठरलेले आहे. हेमंत जोशी आक्रमक आहे हे वास्तव पण हेमंत जोशी गर्विष्ठ आहे, माजलेला आहे हे माझ्या पश्चातही माझे विरोधक देखील म्हणणार नाहीत. आणि नेमके हेच मी कुटुंब सदस्यांना सांगत असतो, यश टिकून ठेवायचे असेल तर एकमेकांना घट्ट चिटकून राहा, जमिनीवर राहा आणि घरातल्या थोरामोठ्यांचा, आईवडिलांचा कायम आदर करा. अर्थात मी हे आधी केले म्हणून येथे सांगतिले, मी वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही उलटून बोललो नाही आणि आजही सकाळची सुरुवात आईवडिलांच्या फोटोला त्यानंतर देवाला नमस्कार करून पुढल्या कामाला लागतो, जणू दर्डांच्या पावलावर पाऊल…

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *