मोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी

मोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी 

नक्की घडलेला किस्सा येथे सांगतो, तो एक शासकीय सेवेतला अधिकारी होता, जातीच्या भरवशावर आणि शासकीय नोकरीत मोक्याच्या जागेवर, पैशांनी आणि अधिकारांनी भराभर मोठा होत गेला, अशा मराठी माणसांच्या बाबतीत हमखास घडते तेच त्याच्याही बाबतीत घडले म्हणजे नोकरीत लागला तेव्हा तो जेमेतेम पदावर असल्याने त्याला मिळालेली बायकोही काहीशी खेडवळ पण उफाडी, गावरान मिरची होती, त्याकाळी तिचे इंग्रजीचे अर्धवट ज्ञान ऐकून खूप खूप हसायला यायचे, एकदा ती या नवऱ्याला म्हणाली, संध्यकाळी येतांना उन्दिर्स मारायचे औषध घेऊन या…नियम्स, परवडेबल,अचानकली असे मराठीतले अनेक इंग्रजी शब्द तिच्या बोलण्यातून अगदी सहज डोकवायचे…ह्याला या ना त्यानिमीत्ते कायम टूरवर जावे लागे.एकदा तो तिला म्हणाला, उद्यापासून ८/१० दिवस मी नाही, विदर्भात जातोय….त्यावर ती म्हणाली, हरकत नाही, मी पण विचार करतेय, कुठेतरी, एखाद्या नातेवाईकाकडे जाऊन येईन म्हणते..वास्तविक लागोपाठ सुटट्या होत्या म्हणून हे महाशय कार्यालयातल्या खास फटाकडीला घेऊन महाबळेश्वरला गेले, तीन चार दिवसांनी बायकोने फोन करून विचारले, कुठे आहेत, महाशय म्हणाले, अगं हे काय बसलोय काम काढून, पार वैतागलोय, खूप खूप थकलोय, तुझी आठवण येतेय, आणि हे तो बायकोला सांगतांना कुठल्याशा हॉटेलात बसून, त्या फटाकडीच्या केसांवर हात फिरवून फिरवून सांगत होता…आणि हो, तू कुठेय..महाशयांनी विचारले, क्षणाचाही विलंब न लावता, जिला तो गावरान, येडी, भोळी समजत होता, ती म्हणाली, हे काय तुमच्या चार टेबल सोडून मागे बसली आहे, आमच्या गावातला मांगीलाल बिनसाले मला घेऊन आलाय कि…

आणि हे अनेक घरातून खूप कॉमन दृश्य आहे. काळ्या पैशांची रेलचेल आली कि अनेकांच्या घरातून हे असे घडणे आपसूक येते, तू तुझी मजा मार, मी माझे बघतो, नवरा बायकोचे हे असे बिनधास्त वागणे अनेक घरातून घडते. बिनधास्त जीवनशैलीचा मोठा वाईट परिणाम पोटच्या मुला मुलींवर होतो, मात्र हे फार उशिरा त्या बिनधास्त जीवन शैली अंगिकारलेल्या आईवडिलांच्या लक्षात येते, तोपर्यंत त्यांची मुले मोठी होऊन त्यांच्या कितीतरी पावले पुढे गेलेली असतात, बिघडलेली असतात..अत्यंत महत्वाचे म्हणजे, आता आमची मुले मुली मोठी झालेली आहेत हे सांगून जेव्हा असे अर्धवट इंग्रजाळलेले मायबाप त्यांच्या मुलांना आपणहून न समजणाऱ्या पौंगडावस्थेतल्या वयात हमखास ड्रिंक ऑफर करतात किंवा पोटच्या लहान मुलांना घेऊन दारू पार्ट्यांना जातात, असे घर हमखास बिघडले आहे हे नक्की, अशा कुटुंबांचे बारा वाजायला वाजायला पुढले काही वर्षे पुरेशे ठरतात…

मला अतिशय राग येतो अशा मंडळींचा, जे विनाकारण नाकाने कांदे सोलतात, विशेषतः पुढारी, पत्रकार, सरकारी अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार हे असे पदोपदी आढळतात, मी मात्र अशा मंडळींना अगदी ठरवून टार्गेट करतो, स्वतःची नसलेली आदर्श इमेज निर्माण करून लोकांना वरून ज्ञानाचे डोस पाजता काय, थोडे थांबा, बघा तुम्ही नेमके कसे, लोकांना सांगून मोकळे होतो, हे असे मी अनेकदा अनेकांच्या बाबतीत मनातल्या मनात म्हणतो, आणि अगदी ठरवून त्यांची लफडी लोकांना सांगून, लिहून मोकळा होतो. मला आता तो जुना झालेला विषय येथे पुन्हा उगाळायचा नाही पण आम्ही मीडिया पर्सन जेव्हा केव्हा प्रशासकीय अधिकारी असलेल्या जयराज फाटकांना भेटत असू, बाप बाप, हा माणूस आपण कसे साधे आणि सरळ, सांगून सांगून आम्हाला बेजार करीत असे, हे महाशय म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीचे आहेत, आम्हाला, अनेकांना ते ठाऊक होते त्यामुळे जेव्हा त्यांची लफडी बाहेर आलीत, मीडियाने त्यांना असा काही धुतला, तुम्हाला ते आठवतच असेल. अर्थात असे अनेक जयराज  फाटक, किरण कुरुंदकर विविध क्षेत्रात आहेत म्हणजे पुढारी आहेत, पत्रकार आहेत, मंत्री आहेत, समाजसेवक आहेत शासकीय अधिकारी आहेत जे नाकाने कांदे सोलतात, उगाच सभयतेचा आव आणतात, तोंडात विष्ठा असते पण श्रीखंड चघळतोय सांगतात म्हणजे त्यांची वृत्ती हमखास भ्रष्ट असते, त्यामुळे हे असे दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान, पद्धतीचे मोठी धेंडे अलगद जाळ्यात अडकण्याची मी वाट पाहत असतो, एकदा का अशांची परफेक्ट माहिती जमा झाली कि मग मात्र त्यांचा धोबीघाट करतोच करतो…

प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याविषयी मला यापुढे अधिक काही लिहावे वाटत नाही कारण त्यांचे कट्टर दुश्मन आमदार अनिल गोटे यांनी जे काय त्यांच्याविषयी शोधून काढले आहे, अद्याप बाहेर आलेले ते केवळ हिमनगाचे एक टोक आहे, ते दोघे एकमेकांशी टक्कर घ्यायला समर्थ आहेत, मी त्यांच्यासमोर फार लहान माणूस आहे म्हणून मध्ये न पडलेले बरे, किंवा न लिहिलेले बरे. मोपलवार चुकले म्हटल्यापेक्षा ते काही लोकांसमोर झुकले नाहीत म्हणून गोटे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेकांनी मोपालवारंवार चाप ओढला आहे, ओढता आहेत, हि वस्तुस्थिती आहे पण कुरुन्दकरांसारखे जे अनेक मोपालवारांच्या ताकदीवर आर्थिक दृष्ट्या मोठे झाले, त्यातले बहुतेक सारे, जणू आम्ही मोपलवार यांना ओळखतच नाही, पद्धतीने वागू लागले आहेत, त्यांना एकटे पडण्याचा मोठा प्रयत्न सुरु आहे, आम्हाला माफीचे साक्षीदार करा, असे त्यांच्या वरिष्ठांना सांगू लागले आहेत, आमचा समृद्धी महामार्गावर व्यापलेल्या जमिनींशी काडीचाही संबंध नाही असे जर उद्या कल्याणकर यांच्यासारखे अधिकारी सांगून मोकळे होऊ लागले तर हसावे कि रडावे, असे त्यातल्या आमच्यासारख्या जाणकारांना म्हणावे लागेल. एमएसआरडीसी मध्ये मोपलवार यांच्या पाठोपाठ कुरुंदकर यांच्यासारखे त्यांचे जे पाठीराखे तेथे पोस्टिंग घेऊन मोकळे झाले होते हे असे जेव्हा आता बदली करवून घेण्याची भाषा वापरू लागले आहेत, बघून ऐकून हसायला येते, बदली झाली म्हणजे लफड्यांमधून सुटका होणार आहे, अशी कदाचित त्यांची भोळी समजूत असावी. मित्रहो, पळ काढू पाहणाऱ्या मंडळींना सोडून कसे चालेल, हि लढाई आम्ही मेलो तरी आम्हाला लढावीच लागेल, एवढेच याठिकाणी सांगतो…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *