मुंडे के फंडे : पत्रकार हेमंत जोशी


मुंडे के फंडे : पत्रकार हेमंत जोशी 

मन ज्याचे मोठे माणूस तो मोठा, जीवनाला मोठा अर्थ त्याच्या, पद्धतीचे धोरण मुख्यमंत्री या  नात्याने उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याने म्हणजे प्रत्येकाला मोकळीक दिली असल्याने  त्याचा सर्वाधिक फायदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होतो आहे. ते ज्या पद्धतीने निर्णय  घेताहेत बैठका घेताहेत बघून अनेकांना मग कधीतरी शंका देखील उत्पन्न होते कि नेमके या  राज्याचे मुख्यमंत्री कोण, स्वातंत्र्य दिले म्हणजे वाट्टेल तसे वागायचे नसते हे जर नेमके उद्धव  यांच्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी ओळखले तर त्यातील एकाचाही उद्धव नक्की पंकजा मुंडे  करणार नाहीत. पंकजा यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला नि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांची नस तडकली नि त्यांनी पंकजा यांचे शेवटपर्यंत पंख बऱ्यापैकी छाटून ठेवले होते जे अत्यावश्यक होते. आपले असे हसे होऊ नये यावेळच्या मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी अतिशय धूर्त चतुर बुद्धिमान पण काहीसे कुल असलेल्या उद्धव यांच्या नजरेतून उतरू नये, अन्यथा त्यांचेच नुकसान होईल…

सारे काही पंकजा यांच्या बाजूने असतांना त्यांना आपले पद आणि पत संभाळता न आल्याने त्यांचा कचरा झाला, असे दिसते यापुढे त्या बऱ्यापैकी राजकीय अडगळीत सापडलेल्या दिसतील. याउलट सारे वातावरण धनंजय मुंडे यांच्या विरोधात होते, गोपीनाथजी यांच्या जाण्याची सिम्पथी नेमकी पंकजा यांना मिळाली होती आणि स्थानिक जनतेचा रोष पंडितराव आणि त्यांचे चिरंजीव धनंजय यांच्यावर होता वरून पंकजा यांना सत्तेत महत्वाचे स्थान मिळलेले होते तरीही धनंजय अविचलित न होता काम करीत राहिले, विधान भवनात प्रभावी विरोधी नेता म्हणून बाजू सांभाळत होते आणि त्यावर शरद पवार जातीने लक्ष ठेवून होते, धनंजय यांना ते निरखून आणि पारखून घेत होते, त्यात धनंजय यांची ती एकमेव चूक झाली नसती म्हणजे अजितदादा यांना त्यांनी पाठिंबा देत ती बाहेर पडण्याची बैठक त्यांनी आपल्या बंगल्यावर घेतली नसती तर आज आणखी वेगळे चित्र दिसले असते, धनंजय यांच्याकडे गृहखाते येणार होते आले असते… 


www.vikrantjoshi.com

पंकजा त्यांच्या बापासारख्या अजिबात नाहीत पण धनंजय मात्र काकांच्या पावलावर पाउल ठेऊन आहेत त्यामुळे जे करायचे ते न लपविता करायचे असे त्यांचे वागणे असल्याने आजही त्यांचे जरी शरद पवार यांच्यावरील श्रद्धा वाढलेली असली तरी अजितदादा यांना त्यांनी दूर केलेले नाही, परिणामांची चिंता व पर्वा न करता, त्यामुळे धनंजय माझे लाडके असे अजितदादा देखील चार चौघात अभिमानाने सांगतात, भीती वाटते कधी कधी त्या काकांच्या स्वभावासारखी म्हणजे उद्या पुतण्याचाही जीव एखादीवर बसला तर तेही तसेच ओरडून सांगतील, मैं तेरे प्यार में पागल हूं, अर्थात त्यातून मोठे राजकीय नुकसान होते, धनंजय यांनी सतत सावध असावे. विपरीत परिस्थितीवर मात करून केवळ सेवेच्या माध्यमातून लोकप्रियता कशी टिकवायची किंवा वाढवायची असते हे धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येक नेत्याने शिकण्यासारखे, मंत्री झाल्यानंतर ते जेव्हा पहिल्यांदा परळीला गेले आपल्या मतदारसंघात गेले ते दृश्य बघण्यासारखे होते म्हणजे जात पक्ष सारे काही विसरून त्यादिवशी परळीतल्या प्रत्येक घरी अक्षरश: दिवाळी साजरी केल्या गेली, स्थानिकांनी आपल्या घरापुढे गुढ्या उभारल्या, दीपमाळा लावल्या, फुले अंथरली, रांगोळ्या काढल्या आणि निघालेली स्वागत मिरवणूक तर संपता संपत नव्हती…. 

तोंडाला फेस येईपर्यंत दरदिवशी मग धनंजय मुंडे मतदारसंघात असोत वा अन्यत्र किंवा मुंबईत, काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला जातीने भेटतात आपल्या दिवंगत काकासारखे आणि तेथल्या तेथे काम करून निर्णय घेऊन ते मोकळे होतात, त्यांचा स्वतःचा त्यात जीव जातो खरा पण त्यांना समाधान लाभते लोकांचे भले साधण्याचे आणि हेच त्यांचे यश आहे जे आता यापुढे कोणालाही सहजासहजी हिरावून घेणे शक्य नाही… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *