मंत्रिमंडळाची पोलखोल २ : पत्रकार हेमंत जोशी

मंत्रिमंडळाची पोलखोल २ : पत्रकार हेमंत जोशी 

आजपर्यंत गेल्या चार दशकात ज्यांच्या ज्यांच्यावर मी बरे वाईट लिहिले आहे ते सारेच्या सारे मला अतिशय जवळून ओळखतात, मी बोचरी टीका केली तरी त्यांना ते बोचत नाही कारण त्या प्रत्येकाला माहित आहे, असते कि मी लिहिलेले सारे अतिशय तळमळीने असते, खोटे नसते, टीका असेल तर त्यांना ते सावध करणारे असते आणि स्तुती केलेली असेल तर त्यातून माझी कधी साधी चहाची देखील अपेक्षा नसते. ज्यांच्यावर टीका करतो त्यांना हे नक्की माहित असते कि हेमंत जोशींनी जे लिहिलेले आहे ते केवळ एक हिमनगाचे टोक आहे, आपल्याला सावध करण्यासाठीच त्यांनी हे असे शब्दांतून झोडलेले आहे, सांगण्याचा उद्देश हाच कि हेतू शुद्ध असला कि अडचण होत नाही…


सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे, फडणवीस मंत्री मंडळातील हे तसे माझे अतिशय जुने परिचित, म्हणाल तर मित्र, तरीही अधून मधून त्यांच्यावर थोडीफार टीका करतो पण त्यापेक्षा अधिक, प्रत्यक्ष भेटीत वेळ आली कि वाद घालतो, त्यांना माझे हेच सांगणे असते जे एकनाथ खडसे यांना देखील सांगणे होते कि देवेंद्र फडणवीसांऐवजी मुख्यमंत्री कोण, हा सवाल जेव्हा चुकून माकून समोर येईल त्यावेळी फक्त आणि फक्त तुमच्या नावाचीच चर्चा होऊ शकते पण आलेल्या संधीचे या मंडळींना हवे तेवढे सोने अजिबात करता आलेले नाही, सुवर्ण संधी वारंवार मिळत नसते म्हणजे नितीन गडकरी यांच्याकडे १९९५ ते २००० म्हणजे केवळ पाच वर्षे या राज्याचे बांधकाम खात्याचे मंत्रिपद आले आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले, कदाचित ते पंतप्रधान देखील होऊ शकतील…


श्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर सारेच होते म्हणजे बांधकाम खाते होते, अत्यंत महत्वाचे म्हणजे महसूल खाते होते त्यापेक्षा म्हणजे त्यांच्या खिशात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस होते, आजही आहेत पण जे चंद्रकांत पाटील प्रति गडकरी म्हणून या राज्याला अपेक्षित होते तसे घडले नाही, भ्रमनिरास झाला, त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले, चंद्रकांत पाटील कुठे कसे चुकले ते मात्र मला येथे ठाऊक असूनही सांगता येणार नाही कारण येणाऱ्या विधान सभा निवडणूका भाजपा सेनेने घालवाव्यात आणि पुन्हा एकदा इसवी सन २००० पुनरावृत्ती होऊन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने या राज्याच्या बोकांडीवर बसावे, केवळ पश्चिम महाराष्ट्राने त्यातून आपले भले करून घ्यावे, निदान पुढल्या पाच वर्षांसाठी तरी मला वाटत नाही त्यामुळे माझ्याकडे या साऱ्यांचे मोठे पुरावे असूनही शक्यतो मला ते उघड करायचे नाहीत आणि हे पथ्य मी आघाडी सरकार देखील असतांना पाळले होते पण अति झाले तेव्हा मात्र गुप्त पद्धतीने मी ते पुरावे संबंधितांना देऊन मोकळा झालो होतो, त्यातून अनेकांच्या गंभीर चौकशा सुरु झाल्या होत्या. सारेच लिहून काढायचे, आवश्यक नसते, आपल्याकडे बदमाशांना संपविणाऱ्या ईडी किंवा आयकर खात्यासारख्या सारख्या यंत्रणा असतात किंवा काही दैनिके माझ्यापेक्षा खूप प्रभावी असतात, त्यांना,पात्यांच्या पैसे न खाणाऱ्या प्रतिनिधींना माहिती दिली कि आपले कर्तव्य नक्की पार पडत असते…


वेळ जवळपास निघून गेलेली आहे, अजूनही जनतेला युतीचे नेमके कोण कोण मंत्री आहेत, माहित नाही, सर्वांना जोमाने कामे करावी लागतील अन्यथा शरद पवार यांचे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे अतिशय गुप्त पद्धतीने पक्ष बांधण्याचे काम अविरत सुरु असते जे त्यांनी २००० च्या दरम्यान केले ते यावेळी देखील कंबर कसून पुढे सरसावत युतीला पुढली आणखी १५ वर्षे कशी सत्ता मिळणार नाही याची काळजी घेतील, युतीसाठी हि निवडणुकीपूर्वी उरलेली कमी वेळ आहे, सध्या विशेषतः भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस हेच पक्ष आणि सरकार चालवितात, जे दृश्य दिसते आहे, जो ताण त्यांच्यावर दिसतो आहे, ते घडता कामा नये, सर्वांनी आत्मचिंतन करून निवडणुकांना सामोरे जाण्याची गरज आहे, अन्यथा पुढले सरकार नक्की आघाडीचे आहे, आजतरी तसे दिसते आहे…

क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *