भाग ४ : गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस —पत्रकार हेमंत जोशी


भाग ४ : 

गडकरी बावनकुळे व फडणवीस 

तिघेही एकमेकांसाठी कासावीस 

—पत्रकार हेमंत जोशी 


फडणवीस मंत्रिमंडळातील चंद्रशेखर बावनकुळे असे एकमेव मंत्री ज्यांच्यासाठी एकाचवेळी फडणवीस आणि गडकरी या दोघांनीही त्यांना मंत्री करण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह मोहन भागवत आणि भाजपाच्या श्रेष्ठींकडे म्हणाल तर शब्द टाकला होता म्हणाल तर आग्रह धरला होता. गडकरी आणि फडणवीस या दोघात सुरुवातीला फक्त एका वाक्यावर मतभिन्नता होती म्हणजे कोणेएकेकाळी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम बघितलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करण्याचे गडकरींच्या अधिक मनात होते ते तेवढे त्यांचे सांगणे बाजूला पडले हे मात्र खरे आहे पण तदनंतर गडकरी आणि फडणवीस यादोघांनाही एकमेकांविषयी मने कलुषित ठेवणे परवडणारे नव्हते, दोघांचे देखील त्यातून पुढे मोठे राजकीय नुकसान झाले असते, दोघेही नेहमीप्रमाणे एकमेकांशी सलोख्याने वागले, वागताहेत, बरे झाले. गडकरींचे त्यांच्या तरुण वयापासून आणि देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत होते तेव्हापासून त्या दोघांमधील एकमेकांशी असलेले आंतरिक नाते भावनिक आणि सख्य्या लहानमोठ्या भावाप्रमाणे असल्याने त्यांचे संबंध फारसे ताणल्या गेले नाहीत आणि दुरावा देखील त्यांच्या कधी निर्माण झाला नाही…


www.vikrantjoshi.com


चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच नेहमी सांगतात कि मी गडकरींचा हनुमान आहे आणि फडणवीसांचा सुदाम आहे. गडकरींनी मला थेट सामान्य घरातून उचलून आणले आणि राजकारणात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. गडकरी आणि फडणवीस या दोघांचेही नाव खराब होईल असे काहीही बावनकुळेंना करायचे नसते त्यामुळे सतत स्वतःला राज्याच्या हितकार्यात झोकून देणे तेवढे त्यांना माहित आहे. गडकरी तर गमतीने म्हणतात कि, चंद्रशेखर कडे कुठलेही काम सोपविले कि तो हमखास करतो. त्याला आपण म्हटले कि दोन तासात बाईचा माणूस करून आण तर तो तसा चमत्कार देखील करून दाखवतो….आश्चर्य म्हणजे हेच बावनकुळे गडकरींना जेवढे प्रिय आहेत, तेवढेच फडणवीसांना देखील हवेहवेसे वाटतात याचे कारण असे कि, दोन नेत्यांमध्ये ते भांडणे लावत नाहीत. बावनकुळे यांचा तास स्वभाव नाही. व्यक्तिगत फायद्यासाठी ते असे काहीही करणे अशक्य आहे. सतत स्वतःला कामाला जुंपून घेणे आणि कोणत्याही गटातटाच्या राजकारणात गुंतवून न घेणे बावनकुळेंना आवडते त्यामुळे त्यांचे एक मंत्री म्हणून आलीया भट सारखे झाले आहे, ज्याला त्याला हि राजकारणातली मंत्रिमंडळातली बावनकुळेरुपी आलीया भट हवीहवीशी असते, वाटते….


वाचकमित्रहो, माझे आमच्या आजपर्यंत राजकीयदृष्ट्या शरद पवारांसारख्या धूर्त अति चतुर नेत्यांनी सावत्र मुलासारखी ट्रीटमेंट दिलेल्या विदर्भावर मनापासून प्रेम आहे आणि या पाच वर्षात गडकरी बावनकुळे फडणवीस या तिघांनी जे नागपूर व विदर्भासाठी केले त्यांना इतर चुटपुट गुन्हे माफ आहेत. हेच ते हनुमान बावनकुळे ज्यांनी गडकरींच्या निवडणुकीत पदयात्रा व प्रचारार्थ एवढी पायपीट केली त्यांच्या पायाला अक्षरश: फोड आले होते. माझी माहिती अशी कि त्यांना त्यावर त्या दोघांनीही आडवे तिडवे घेतले होते. बावनकुळे जेवढे नागपूरकर या नात्याने नागपुरात हिरिरीने भाग घेतात तेवढाच रस ते पालकमंत्री म्हणून भंडाऱ्यात आणि मंत्री म्हणून राज्याच्या हिताकडे न थकता न थांबता लक्ष देतात म्हणून फडणवीस त्यांच्याबाबतीत एक उत्तम सहकारी म्हणून फडणवीस निश्चिन्त असतात. सहज म्हणून सांगतो हेच ते बावनकुळे जेव्हा फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला लातूर येथे अपघात झाला तेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या कोराडीच्या देवीच्या मंदिरात त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी प्रार्थना केली होती आणि गडकरी यांना जेव्हा राहुरीला थेट भाषण देतांना भोवळ आली होती संध्याकाळी नितीन गडकरी जेव्हानागपुरात पोहोचले त्यांना हे बावनकुळे आडनावाचे अजब रसायन बिलगून ढसाढसा रडले…चंद्रशेखर बावनकुळे यांचे उजवे हात म्हणून ओळखल्या जाणारे विश्वास पाठक बावनकुळे यांना एवढे का बिलगून चिटकून असतात याचा उलगडा आता होऊ लागला आहे. पाठक डॉ. दीक्षित यांचे डाएट फॉलो करतात कारण त्यांना आपण स्लिम ट्रिम तरुण असावे दिसावे असे कायम वाटत आलेले आहे. बावनकुळे हे गडकरींच्या म्हणण्यानुसार प्रसंगी बाईचा माणूस करू शकतात त्यातून बावनकुळेंच्या सान्निध्यात आपण कोणत्याही क्षणी थेट तिशीतले दिसू शकतो असा काहीसा कदाचित समज झाल्यानेच पाठक त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत,नसावेत…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *