बुवा बनलेले बदमाश : पत्रकार हेमंत जोशी

बुवा बनलेले बदमाश : पत्रकार हेमंत जोशी 

मध्य प्रदेशातल्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शिवराजसिंग चौहान यांनी इंदोरच्या वादग्रस्त भय्यू महाराजांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे पण लोक सोशल मीडियावर असे चेकाळलेत जणू त्यांना मध्यप्रदेश मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले, असे अजिबात घडलेले नाही, हा झालेला गैरसमज मनातून काढून टाकणे गरजेचे आहे…तिकडे भय्यू महाराजांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्यानंतर इकडे मला विविध फोन, मेसेजेस येणे अपेक्षित होते आणि ते घडलेही, अनेकांनी तर माझी तोंडावर खिल्ली देखील उडविली कि ज्यांच्या विरोधात तुम्ही लढला किंवा लढ़ताहात ते तर राज्यमंत्री झाले, त्यावर नेमकी वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लिखाण येथे खास तुमच्यासाठी….

अत्यंत महत्वाचे म्हणजे राज्यमंत्री असणे आणि राज्यमंत्र्याचा दर्जा यात फार मोठा फरक आहे म्हणजे मी देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो पेक्षा देवेंद्र फडणवीस मला ओळखतात, असा तो फरक आहे किंवा एखादे नृत्य मुख्य नटी करते तिला जेवढे महत्व असते तेवढे महत्व तिच्या मागे उभे राहून एक्सट्राज मध्ये नृत्य करणाऱ्याला नसते किंबहुना एक्सट्राज मध्ये नाचणार्यांचे चेहरे आमच्या लक्षात 

आहेत असे सांगणारे जसे कोणी भेटत नाही तो तसा प्रत्यक्ष राज्यमंत्री आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्यांमध्ये फरक असतो थोडक्यात भय्यू महाराज यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणे म्हणजे एक्सट्राज मध्ये नाचणाऱ्यांशी फारतर त्यांचे साम्य दाखविता येईल….

आणखी एक महत्वाचा मुद्दा कि अमुक एखादे पद मिळाले कि तो माणूस मोठा झाला असे घडत नसते म्हणजे पप्पू कलानीने नाशिक महामार्गावर इगतपुरी येथे त्याच्या दारूच्या कारखान्यात शंकराचे मंदिर बांधले याचा अर्थ पप्पू कलानी देशभक्त देवभक्तांच्या रांगेत बसला असे अजिबात नसते किंवा वादग्रस्त रवींद्र चव्हाण संघाच्या मुशीतून जन्माला आलेल्या भाजपामध्ये राज्यमंत्री झाले म्हणजे ते परमेश्वर ठरले असे अजिबात नसते, लोकशाहीचे आता ते संकेतच ठरले आहेत कि माणूस जेवढा अधिक वाईट तो मोती खातो आणि श्रेष्ठ माणूस दाणे शेंगदाणे खाऊन कसेतरी दिवस काढतो. थोडक्यात भय्यू महाराज यांना पद मिळाले म्हणजे ते देव झाले परमेश्वर ठरले असे अजिबात नाही. याला पुरस्कार दे त्याचा सत्कार कर असे करून कोळसा घोटाळ्यात अडकलेले दर्डा त्यामुळे श्रेष्ठ ठरले असे होत नसते, सामान्य माणूस बोलत नाही पण त्याला ते सारे समजते, आपली कोळसा घोटाळ्यातून सुटका व्हावी म्हणून हि केलेली चापलुसी, सामान्य वाचकांना ते समजत असते पण सर्व गुंडांसमोर सामान्य माणूस हतबल ठरला आहे, त्याचे काहीही चालत नाही, चूप बसण्यापलीकडे त्याच्या हाती काहीही नसते….

आता शेवटच्या आणि महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. बघा, जे वाईट असतात, समाजविघातक असतात त्यांच्याविरुद्ध वर्षानुवर्षे लढावे लागते तेव्हा कुठे यश मिळत असते, या राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारे वर्षानुवर्षे लढले त्यात काहींचे बळी देखील गेले तेव्हा कुठे त्यांना यश मिळाले, अलीकडे राज्यातल्या बुवाबाजीला त्यातून आळा बसला, महाराज किंवा बुवा मग ते अनिरुद्धबापू असतील, भय्यू महाराज असतील, नाणिजचे नरेंद्र असतील, या मंडळींचा पूर्वी जो गाजावाजा होता ते सारे बऱ्यापैकी संपलेले आहे, कसेबसे हे असे बुवा आता या राज्यात आपले स्थान टिकवून आहेत, त्यांचे नशीब ते तुरुंगात गेलेले नाहीत. भय्यू महाराजांच्या बाबतीती सांगायचे झाल्यास विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर तर पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून कालखंड सुरु होईपर्यंत या भय्यूमहाराजांचे आपल्या राज्यात म्हणजे अख्य्या महाराष्ट्रात त्या दहा बारा वर्षात एखाद्या देवासारखे तेही राज्यातल्या प्रत्येक मोठ्या नेत्याच्या घरात थेट चुलीपासून तर देवघरापर्यंत अक्षरश: देवासारखे स्थान होते, सर्वांनी त्यांना फोटोच्या रूपात थेट देवघरात नेऊन बसविले होते, आम्हाला तेव्हाही हसायला यायचे पण भय्यू महाराजांचे राजकीय महत्व वाढलेले असल्याने राज्यातल्या दिलीप वळसे पाटलांसारख्या साऱ्याच चतुर नेत्यांनी शरद पवार आणि अजित पवारांचा अपवाद वगळता भय्यू महाराजांना थेट देव केले होते कारण मोठ्या नेत्यांमध्ये दबदबा असल्याने या भय्यू महाराजांमुळे आपले भले होईल हाच त्यामागे अनिल देशमुखासारख्या प्रत्येक नेत्याच्या ते मनात होते पण जे नेत्यांना वाटते ते तसे भय्यू महाराज अजिबात नाहीत प्रत्यक्षात ते विकृत किंवा थापाडे कसे हे सततच्या लिखाणातून आणि आलेल्या अनुभवातून मी लोकांना या नेत्यांना दरवेळी समजावून सांगितले, सत्य तेवढे मांडले त्यातून आज भलेही त्या मध्य प्रदेशात त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेला असेल पण येथे या राज्यात मग घर ते उद्धव ठाकरे यांचे असो कि अकलूजच्या मोहिते  पाटीलांचे येथे यापुढे भय्यू महाराज केवळ नेत्यांच्या तोंडी लावण्यापुरते उरले आहेत, आणि तेच आमचे यश आहे. येथले बडे सरकारी अधिकारी, अत्यंत मोठे नेते आणि आणि या राज्यातले एकेकाळी भय्यू महाराजांच्या चरणी देव म्हणून बऱ्यापैकी लिन झालेला मराठा समाज, ते सारेच्या सारे भय्यू महाराजांपासून दूर गेले आहेत हे माझे यश कमी पण भय्यू महाराजांचे फसवे वागणे त्याला अधिक कारणीभूत ठरले आहे. त्यांनी सुरुवातीला जे चित्र निर्माण केले होते ते तसे भय्यू महाराज वागले असते तर आमच्या विदर्भात आणि उभ्या महाराष्ट्रात देखील ते खऱ्या अर्थाने संत तुकडोजी किंवा गाडगे महाराज किंवा गजानन महाराज ठरले असते, झाले असते, आता सारे संपले आहे जणू स्वर्गात पोहोचलेल्या त्यांच्या पहिल्या बायकोचे किंवा इतरही वर्षा सत्पाळकर यांच्यासारख्या फसविलेय गेलेल्या भक्तांचे शाप त्यांना आता भोवले आहेत, ती पहिली बायको, बिचारी भोगून भोगून वर गेली आहे, तिच्या लाडक्या कुहूला पोरकी करून, निदान कुहूचे तरी चांगले व्हावे…

तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *