राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : पत्रकार हेमंत जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : पत्रकार हेमंत जोशी 

एकेकाळी माझी अवस्था एकाचवेळी तीन तीन प्रियकरांना मुठीत ठेवणाऱ्या मिठीत घेणाऱ्या मस्तीत लोळविणाऱ्या मगरमिठीत आल्यानंतर तिन्ही प्रियकरांना खुश करून सोडणाऱ्या चालू प्रेयसी सारखी झालेली होती, नेमके कळत नव्हते, कोणत्या राजकीय पक्षात आपले बूड टेकवून मोकळे व्हावे कारण घरात लहानपणापासून संघाचे वातावरण होते, जवळपास अख्खे गाव संपूर्ण जळगाव जामोद संघाच्या विचारांनी भारावलेले होते, वडील कट्टर संघस्वयंसेवक होते, आम्ही सारीच भावंडे त्यामुळे नियमित संघ शाखेवर जाणारे होतो. मी तर संघ शिक्षा वर्गाचा द्वितीय वर्ष शिक्षित आहे त्यानंतर बाहेर पडलो आणि सुरेशदादा जैन यांचा अगदीच लहान वयात म्हणजे फारतर १७-१८ व्या वर्षी पीए झालो पुढे व्यवसायात पत्रकारितेत उतरलो, बघता बघता जळगाव जिल्ह्याचा जवळपास हे शहर सोडून मुंबईत येईपर्यंत दिवंगत मधुकरराव चौधरी आणि दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे अगदी जवळून सान्निध्य लाभल्याने सतत पाच वर्षे काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघनेचा, एनएसयूआय चा जिल्हाध्यक्ष होतो, मीच हि संघटना जळगाव जिल्ह्यात उभी केली तोपर्यंत एनएसयूआय कशाशी खातात हे देखील जळगाव जिल्ह्यात फारसे ठाऊक नव्हते. अत्यंत महत्वाचे म्हणजे भलेही बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी आणि डॉ. श्रीकांत जिचकार काँग्रेस चे कट्टर कार्यकर्ते नेते असले तरी त्या दोघांवरही म्हणजे बाळासाहेबांवर महात्मा गांधी आणि डॉ. जिचकार यांच्यावर दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा वैचारिक सुविचारी पगडा असल्याने मी रा. स्व. संघातून बाहेर पडून फार वेगळ्या विचारांच्या नेत्यांमध्ये सामील झालो असे कधी वाटले नाही. पुढे पूर्णवेळ पत्रकारितेत पडल्यानंतर,  येथे मुंबईत आल्यानंतर नकळत मी शरद पवारांकडे ओढल्या गेलो, त्यांनीच सुरुवातीला मला येथे मोठा आधार दिला. पण पुढे एक दिवस मनोमन ठरविले कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली जगायचे, वावरायचे नाही. पण या साऱ्या विचारांच्या खिचडीत नेमके त्या चालू प्रेयसीसारखे कळत नव्हते कि कोणत्या पक्षाचे बोट धरून पुढे जावे. एक दिवस अचानक ठरले ठरविले कि कट्टर हिंदुत्व आणि मराठी बाणा अगदी उघड जपायचा पण कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावून पत्रकारितेतले करिअर करायचे नाही. म्हणूनच पुढे ते जमले म्हणजे जे चुकले ते कोणत्या राजकीय पक्षाचे न बघता त्यांना शब्दातून धरून धरून हाणले. माझा व्यवसाय म्हणजे ‘ हेमंत जोशी हेअर कटिंग सलून ‘ झाला आहे थोडक्यात जे चुकले किंवा जे चुकतात त्यांची पार भादरून ठेवायची…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लिहायला सुरुवात करतांना मला नेमके या राज्यातल्या समस्त संघ स्वयंसेवकांना विचारायचे आहे कि जोपर्यंत अमुक एखादा, संघस्वयंसेवक असतो तोपर्यंत त्याला भ्रष्टाचार हा शब्द देखील शिवलेला नसतो त्याच्या ठायीठायी फक्त आणि फक्त जाज्वल्य देशप्रेम आणि हिंदुत्व ठासून भरलेले असते पण एकदा का अमुक संघ स्वयंसेवक राजकारणात उतरला कि तो कमालीचा करप्ट होतो किंवा त्यातल्या अनेकांना बायकांचा नाद लागून ते बाहेरख्याली देखील होतात. असे का होते.संघातून राजकारणात उतरल्याने मन लगेच का भरकटते, झालेले किंवा केल्या गेलेले सारे सुसंस्कार राजकारणात उतरलेला संघस्वयंसेवक क्षणार्धात का विसरतो म्हणजे आमच्यावर झालेले संघ संस्कार एवढे तकलादू असतात कि सारे चांगले विसरायला होते. मग आम्ही नेमके या देशात बघायचे कोणाकडे, कारण भ्रष्टाचारविरहित पक्ष नेते कार्यकर्ते येथे शोधूनही मिळत नाही, अपेक्षा संघातून बाहेर पडणाऱ्या आणि राजकारणात शिरलेल्या संघ स्वयंसेवकांपासून तेवढी होती पण तेथेही बोंबाबोंब, जो तो तेथेही फक्त आणि फक्त देश बुडवायला निघाला आहे, एकटा देवेंद्र पंगा घ्यायला लागला तर त्याचा दीनदयाल व्हायला अजिबात वेळ लागणार नाही…

महत्वाचे म्हणजे संघाच्या माध्यमातून चालणाऱ्या संस्थांमध्ये विशेषतः विविध शाळा, महाविद्यालये किंवा सहकारी बँकांमधून सहकारी संस्थांमधून सारेच काही आलबेल असते असेही नाही, माझे सख्खे मेहुणे ज्यांनी संघाला आपले आयुष्य जवळपास वाहून घेतलेले आहे, ते नितीन गडकरी आणि कंपूचे वर्चस्व असलेल्या संघप्रणीत नागपूर नागरिक सहकारी बँकेचे जेव्हा जनरल मॅनेजर होते त्यांनी बँकेत संचालकांकडून घेतल्या जाणारे गैरफ़ायदे जेव्हा अनेकदा मला त्याकाळी ऐकवले, जाणीव तर तेव्हाच झाली होती कि रा. स्व. संघात कार्यव्यस्त असलेले असे अनेक आहेत कि जे केवळ संधी अभावी ब्रम्हचारी आहे पण हे भ्रष्ट संकल्पनेचे फ्याड कम्पेअर टू अदर्स, तसे आजही संघात नक्की अत्यल्प आहे, हार्डकोअर संघस्वयंसेवक वाईट कृत्यांपासून चार हात दूर असतो हेही तेवढे खरे. पुन्हा तेच कि ज्यांना वाममार्गाने पैसे मिळवायला आवडतात संघातले तेच पुढे आपणहून भाजपाचे सद्सत्व पत्करीत असावेत असे अलीकडे वाटायला लागले आहे. पुढे जाऊन संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जो पश्चाताप होतो तो टाळण्यासाठी त्यांनी अत्यंत बारकाईने संघातून भाजपामध्ये कार्यकर्ते पाठवायला हवेत. संघातून भाजपामध्ये आलेले सोवळे राहिले असे क्वचित घडते. जे कर्मठ विचारांना चिटकून राहतात त्यांचा भाजपातले प्रमोद महाजन, रवींद्र भुसारी करून मोकळे होतात…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *