अर्थहीन कि अर्थपूर्ण अर्थमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

अर्थहीन कि अर्थपूर्ण अर्थमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 

ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी या राज्याचे सलग पाच वर्षे अर्थमंत्रीपद भूषविले त्यांची कारकीर्द अर्थपूर्ण कि अर्थहीन त्यावर नेमके सांगणे गरजेचे आहे. जे सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवून सोडली नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेत त्यांचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणे स्वाभाविक होते ते घडलेही पण पुढे नाव मागे पडले किंवा फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून यांनी आदळआपट सुरु केली, रुसवेफुगवे काढले, मित्रांकडे हंबर्डे फोडले किंवा धाय मोकलून एखाद्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडले, त्रागा केला, असे फारसे काही किंवा पाच वर्षात कधीही घडले नाही, सुसंस्कृत सावध सुधीर मुनगंटीवारांच्या हातून तसे घडणे अपेक्षितही नव्हते…


महत्वाचे असे कि आपली ओळख नितीन गडकरी यांच्या गटातले अशी त्यामुळे वयाने अनुभवाने ज्युनियर असलेल्या पण अचानक एकदम जम्प घेतलेल्या फडणवीसांना बसता उठता त्रास द्यायचा असे त्यांच्या हातून घडले नाही, देवेंद्र फडणवीसांचीही सुदैवाने तशी वृत्ती तो स्वभाव नाही कि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतले एक म्हणून सुधीरभाऊंकडे दुर्लक्ष करायचे किंवा त्यांना त्यांच्या खात्यात काम करतांना मर्यादा आणायच्या, काम करू द्यायचे नाही, त्रास द्यायचा, नाही असे त्यांच्याकडूनही घडले नाही त्यामुळे वन खात्याचे मंत्री यानात्याने वृक्षारोपण वृक्ष लागवड त्यात सातत्य नेमकी चर्चा व मिळणारी, मिळालेली अफाट प्रसिद्धी मुनगंटीवार यांचे नाव राज्यात तर गाजले पण राष्ट्रांतही त्यांच्या या कार्याचे मोठे कौतुक झाले, मोठी दाखल विशेषतः वनक्षेत्रात काम करणाऱ्यांनी घेतली. पंतप्रधानांनीही पाठ थोपटली. सुधीरभाऊंच्या या कार्यात तोलामोलाची साथ मुख्यमंत्र्यांनी दिली हे विशेष…


www.vikrantjoshi.com

एक पाऊल मागे आणि मुख्यमंत्री पदाचा मान राखणे हे दोन्ही मुनगंटीवारांनी अगदी पाच वर्षे डोळ्यात तेल घालून पाळले, टाळी एका हाताने वाजत नाही, सुधीरभाऊंनी फडणवीसांना मिळालेले पद सकारात्मक पद्धतीने घेतले, अमुक एखाद्याला पुढे नेण्यात तर देवेंद्र माहीर आहेतच त्यांनी असा एकही प्रसंग नव्हता जेथे या नेत्याला म्हणजे सिनियर सुधीरभाऊंना सहभागी करवून घेतले नाही जसे फडणवीसांच्या तोंडात डोक्यात किंवा बोलण्याच्या कौतुक करण्याच्या ओघात चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन आशिष शेलार रणजित पाटील सुभाष देसाई दिवाकर रावते अशी इत्यादी काही नावे सतत असायची त्यात सुधीर मुनगंटीवार हेही प्रामुख्याने नाव आडनाव असायचे. अमुक एखाद्या स्पर्धेतल्या प्रभावी स्वयंस्फूर्त नेत्याला दाबून ठेवायचे, तोंड दाबून वरून बुक्क्यांचा मार द्यायचा असले घाणेरडे राजकारणानं खेळणारे फडणवीस नसल्याने सुधीरभाऊ मुनगंटीवारांना मुक्तपणे उदारहस्ते एक महत्वपूर्ण खात्याचा मंत्री म्हणून काम करणे सहज शक्य झाले…


तुम्हाला राजकारणात टिकायचे असेल सातत्य राखायचे असेल तर प्रसंग ओळखून निर्णय घेणे किंवा दोन पावले मागे येणे, ताठर भूमिका न घेणे, वाट्टेल तशी बडबड गडबड न करणे हे पाळावे लागते, जे मुनगंटीवारांना सहज जमले. फडणवीस पुढे गेले मुख्यमंत्री झाले त्यावर त्यांनी नोकरांकडून झंडू बाम लावून डोके चोळून घेतले नाही याउलट आपले महत्व मंत्री या नात्याने राखताना त्यांनी फडणवीसांना पुढे जाऊ देण्यात धन्यता मानली, हे नेमके खडसे यांना जमले नाही त्यांनी उगाचच त्रागा करून 

घेतला, मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. अमुक एखादा आपल्या मागे होता आणि अचानक पुढे गेला म्हणून त्याविषयी मनात असूया आणि डोक्यात राग ठेवून वागायचे बोलायचे राजकारणात कधीही फायदेशीर नसते, दूरदर्शी सुधीरभाऊंनी मी पण स्पर्धेत होतो असे काहीबाही मनात ठेवून ते वागले बोलले नाहीत त्यामुळे त्यांचे पुढल्या येणाऱ्या मंत्रिमंडळातले स्थान आजच नक्की निश्चित झालेले आहे, सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीत निवडूनही येतील आणि नामदारही होतील…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *