जितेंद्र आव्हाड त्यांना करू नका हाड हाड : पत्रकार हेमंत जोशी


जितेंद्र आव्हाड त्यांना करू नका हाड हाड : पत्रकार हेमंत जोशी 

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात कोरोनाचे लक्षणे आढळून आल्याचे कानावर पडल्यानंतर क्षणभर छातीत धस्स झाले. जितेंद्र आता मंत्री आहेत पण ते राजकारणात उतरले आले तेव्हापासून मी त्यांना जवळून बघत आलो आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना अनेकांना किंवा कित्येकांना मला माहित आहे जेवढा शरद पवार यांचा राग येतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी जितेंद्र आव्हाडांचा राग येतो. जसे जितेंद्र राष्ट्र्वादीबाहेर बहुतेकांना नावडते आहेत तसे ते त्यांच्या राष्ट्र्वादीतही चेष्टेचे टीकेचे आणि नावडते व्यक्तिमत्व आहे. अगदी सुरुवातीला म्हणजे जितेंद्र जेव्हा ठाण्याच्या स्थानिक राजकारणात उतरले तेव्हा मला देखील एक पत्रकार म्हणून नावडते होते कारण त्यांचे वागणे बोलणे दिसणे सारे काही उर्मट उद्धट वाटायचे. अशा पद्धतीचा वात्रट भासणारा मग तो कोणीही असो माझ्या डोक्यात बसला कि मग तो सहसा माझ्या तडाख्यातून सुटत नाही मग ती व्यक्ती घरातली असेल किंवा घराबाहेरची. अशांना वठणीवर आणणे मी माझे पत्रकारितेतील कर्तव्य समजतो. जितेंद्रच्या बाबतीत सुरुवातीला मनात हेच होते कि या नेत्याशी पंगा घेऊन मोकळे व्हायचे…

मात्र माझे त्यांच्याविषयीची मत नेमके केव्हा कोणत्या क्षणी बदलले नक्की आठवत नाही पण असा एक क्षण आला कि ज्या जितेंद्र कडे मी कायम रागाने बघत असे त्याच्याशी अचानक गट्टी जमली आणि त्यांनीही मैत्रीचा हात पुढे करून पुढे भेटल्यानंतर आमच्यात गप्पांचा फड जमू लागला आणि हळूहळू आव्हाड वेगळे कसे लक्षात आले आणि आवडायला लागले. मला माहित आहे कि आत्ता याक्षणी मी आव्हाड यांना चांगले म्हणणे किंवा त्यांची स्तुती करणे तुम्हा अनेकांना नक्की आवडणारे नाही, आव्हाडांना चांगले म्हणणे म्हणजे सिनेमातल्या एखाद्या खलनायकाला थेट संत तुकाराम म्हणण्यासारखे किंवा सिनेमातल्या हेलनला संतोषी माता म्हणण्यासारखे ठरेल पण जेव्हा नेमका हा जितेंद्र आव्हाड वेगळा, भन्नाट कसा विस्ताराने तुम्हाला सांगितले कि त्यांच्या काहीशा वात्रट वाटणाऱ्या भूमिकेबद्दल फारसा राग तुम्हाला राहणार नाही. आव्हाड यांची नेता म्हणून विशेषतः ठाण्यात कशी नितांत गरज आहे हेही तुम्हाला मी काही गुपिते उघड करून नक्की सांगणार आहे. आव्हाडांचे कुटुंब, आव्हाड यांचे मित्र मैत्रिणी व्यवसाय स्वभाव वृत्ती पैसे राजकारण अशा अनेक विविध असंख्य विविधांगी विषयांवर मला नेमके आवश्यक असेल आणि आहे ते नक्की सांगावे लागणार आहे म्हणजे आव्हाड नेमके वेगळे कसे तुमच्या ते लक्षात येईल…


www.vikrantjoshi.com

जितेंद्र आव्हाड म्हणजे अति उत्साह आणि हीरोगिरीचा जिताजागता नमुना. त्यांना लोकांना अट्रॅकट आकर्षित करायला मनापासून आवडते आणि त्यांचे हे वागणे राजकारणात पडल्यापासून आहे. जेथे एखादा नेता चालत जाईल तेथे आव्हाड दुडूदुडू उड्या मारत जातील. शरद पवार जेव्हा अमुक एखाद्या घोळक्यात असतात अडकतात तेव्हा इतर नेते पवारांच्या मागे लपतात पण आव्हाड मात्र एखाद्या ढालीसारखे पवारांच्या पुढे पुढे चालत असतात इतरांना अंगावर घेत असतात. आव्हाड यांचे हे असे आक्रमक प्रोटेक्टिव्ह पुढे पुढे करणे इतरांना खटकते पण शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना मनापासून आवडते म्हणून आव्हाड हे पवार बाप लेकीचे अत्यंत आवडते म्हणाल तर कार्यकर्ते आहेत म्हणाल तर आवडते नेते आहेत. आव्हाडांचे हे शरद पवारांना इम्प्रेस करणे प्रसंगी जयंत पाटील असोत अथवा थेट अजित पवार किंवा रोहित पवार, इत्यादी राष्ट्र्वादीत असलेल्या बड्या नेत्यांना देखील खटकते. रोहित पवार हे ज्या पद्धतीने शरदरावांच्या पुढे पुढे विशेषतः अमुक एका गर्दीच्या ठिकाणी मुद्दाम करतात तेव्हा ते आव्हाड यांची हुबेहूब नक्कल करण्याचा मला भास होतो. सांगितले ना कि जेथे इतर चालत जातील तेथे आव्हाड पळत जातील, जेथे एखादा कार्यकर्ता पवारांच्या समोर रामरक्षा म्हणेल तेथे आव्हाड मात्र पोवाडा म्हणून मोकळे होतील. आपण वेगळे आणि आक्रमक कसे हे त्यांना कायम दाखवायचे असते आणि त्यात ते यशस्वी ठरले आहेत, यशस्वी होतात. आणि आता त्यांना हि अशी कायम आक्रमक राहून आरडाओरड करून समोरचा विरोधक मग तो त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातला असो कि अन्य विरोधक ज्याला त्याला प्रत्येकाला थेट अंगावर घेण्याची सवय जडली आहे…

क्रमश: हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *