चोरावर मोर २ : पत्रकार हेमंत जोशी

चोरावर मोर २ : पत्रकार  हेमंत जोशी 

अलीकडे कुठेतरी वाचण्यात आले कि आम्ही पुरुष स्त्रियांच्या बाबतीत नेहमी यासाठी गोंधळतो कि त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हेच समजत नाही,जसे, बायका नेहमी म्हणतात कि पुरुष मूर्ख आहेत पण बायका हेदेखील म्हणतात कि, आम्ही पुरुषांपेक्षा काही कमी नाही. थोडक्यात जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळा होतो पण त्याचवेळी उरलेली तिन्ही बोटे स्वतःकडे आहेत, हे आपण नेहमी विसरतो. अलीकडे फेसबुक व्हाट्सअप वरून भाजपा नेते श्री किरीट सोमय्या यांना अगदी घालून पाडून हेच खिजवल्या जाते आहे कि विरोधकांच्या भानगडी चव्हाट्यावर आणणारे, भुजबळांसारख्या नेत्यांना थेट खाडी फोडायला पाठवणारे सोमय्या आता कुठे लपून बसले आहेत? किंवा सोमय्या कुठे हरवले आहेत ? महाराष्ट्र युती सरकारचे नवनवीन घोटाळे बाहेर येत असतांनाही जनसामान्यांसाठी सदैव झटणारे घोटाळ्यांच्या विरोधात सदैव आवाज उठवणारे भाजपाचे धडाडीचे नेते सोमय्या हरवले आहेत त्यांच्याबद्दल माहिती देणार्यास किंवा त्यांना शोधून देणार्यास योग्य ते इनाम दिले जाईल…प्रिय किरीट तुला विनंती आहे कि जिथे असशील तिथून परत ये, तुला कोणी काही बोलणार नाही, अरे वेड्या आपलेच सरकार आहे, आणि मतदार तर मूर्खच आहेत, प्रकाश मेहता, वगैरे आपलीच माणसे आहेत, तू जसे भुजबळांविरुद्ध ओरडत होता तसाच प्रकाश मेहता विरुद्ध ओरडलंस तर तुला फडणवीस, मोदी कोणीही काहीही बोलणार नाहीत, तेव्हा घरी ये हं किरीट बाळा, इथे सध्या सरकारच्या घोटाळ्यांविरोधात बोलण्यासाठी तुझी फार गरज आहे रे सोन्या, लवकर ये…तुझेच, अखिल भारतीय स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून संघटना…इत्यादी इत्यादी…

हे असे उद्वेगातून सोमय्या यांच्या विषयी छापून येणे लिहून येणे अपेक्षित होते, आहे, पण एकटे सोमाय्य्याच का, सारेच नेते यापद्धतीचे कि ते स्वतःचे झाकून ठेवतात आणि दुसऱ्यांवर अगदी बिनधास्त शिंतोडे उडवून मोकळे होतात, एवढे कि त्यांना हेही भान नसते कि जे आरोप आपण विरोधकांवर करतो ते मुळात आपलेच पाप आहे, अनेक उदाहरणे त्यावर देता येतील जसे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अजित पवार मनोरा आमदार निवासात आमदार सतीश पाटील यांच्या खोलीत कोसळल्या छताचा तुकडा घेऊन सभागृहात आले, युती सरकारवर टीका करून मोकळे झाले पण ते हे विसरले कि हे सारे त्यांच्या किंवा त्यांच्या काकांच्या काळातलेच पाप आहे, मुळात आघाडीच्या काळात बांधल्या गेलेले मनोरा आमदार निवास इमारतीचे बांधकाम दर्जाहीन झालेले असतांना त्यावर कधीही पवार साहेबांनी आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही, विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गेल्या वीस वर्षात या इमरतीच्या देखभालीवर जो खर्च करण्यात किंवा दाखविण्यात आलेला आहे, त्या खर्चातून मनोरा पेक्षा अधिक दर्जेदार इमारती बांधता आल्या असत्या, महत्वाचे म्हणजे मनोरा आमदार निवासावर या तिन्ही इमारतींशी संबंधित विविध पदावरील बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी जो खर्च दाखविला आहे, त्यातील २५ टक्के एवढी रक्कम जरी आघाडीच्या काळात या अभियंत्यांनी त्यावर खर्च केली असती तरी आज हि इमारत मोडकळीस आली नसती पण जातीपातीच्या राजकारणात आकंठ बुडालेले या बांधकाम खात्यातले भ्रष्ट अभियंते अजिबात आमदारांनाही न घाबरता पैसे खाऊन मोकळे झाले, मोकळे होताहेत, ना त्यांना आमदारांची भीती, ना जनाची लाज ना मनाची…

www.offtherecordonline.com

www.vikrantjoshi.com


एखाद्या आमदाराने चुकून आवाज उठवलाच तर त्याला आर्थिक रसद पुरवून शांत करायचे आणि आहे ते धंदे सुरु ठेवायचे हेच येथल्या मोनोपली असलेल्या म्हणजे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी केले आणि ते पाप नेमके सतीश पाटलांच्याच डोक्यावर पडता पडता राहिले. नेमके हेच गेली तीन वर्षे मी जीव तोडून तोडून या खात्याच्या मंत्र्याला म्हणजे श्री चंद्रकांत पाटलांना खाजगीत ओरडून ओरडून सांगतो कि दादा, अहो तुमचे ते नितीन गडकरी जे जगभर त्यांच्या कामातून गाजताहेत ना, ते याच बांधकाम खात्यात आगळी कामगिरी करवून दाखविल्याने, फडणवीस सरकार देखील चंद्रकांत दादा यांच्यामुळे अधिकाधिक देशभर नामवंत ठरले असते जर पाटील यांनी गडकरी यांचे अनुकरण केले असते, दुर्दैवाने ते घडले नाही आणि आता वेळ निघून गेली आहे, पुढल्या विधान सभा निवडणुकीला जेमतेम दोन वर्षे उरले आहेत. चंद्रकांत पाटील वाईट आहेत असे मी म्हणणार नाही पण विविध खात्यांच्या फाफट पसाऱ्यात दादा अडकले आणि बांधकाम खात्याचे यावेळीही मातेरे झाले. थोडक्यात, हमाम मे ये सब नंगे है, फक्त आघाडीचे मंत्री दरोडेखोर ठरले असतील तर युतीचे महाचोर, हाच काय तो फरक, पैसाच साऱ्यांना हवा आहे, प्रगती गेली खड्ड्यात, त्यामुळे किरीट सोमय्या यांना येथे मी अजिबात दोष देणार नाही याउलट किरीट सोमय्या यांच्यासारखे खानपाटीस बसणारे, गैरव्यवहार बाहेर काढणारे नेते या राज्याची गरज आहे, त्यांना देखील स्वतःचे राजकीय भवितव्य टिकवून ठेवायचे असते त्यामुळे सोमय्या किंवा तत्सम नेते आपल्या पक्षातल्या भानगडींवर मूग गिळून बसणे स्वाभाविक आहे, त्यात त्यांची अजिबात चूक नाही….

आज एवढेच सांगतो, दरदिवशी जे घडते आहे ते बघून सांगतो, ज्यांनी खाल्ले किंवा ज्यांना खायचे आहे त्यांना आणखी खाऊ द्या, फक्त ते मोदी पुढले दहा वर्षे आणखी जिवंत राहायला हवे आणि सत्तेत राहायला हवेत, ते जे सांगताहेत कि ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तेच सत्य आहे, या देशातल्या प्रत्येक भ्रष्ट माणसाच्या भोवतालीचा फास मोदी घट्ट आवळून मोकळे होताहेत, त्यातून तुमची आमची कोणाचीही सुटका नाही, ज्यांनी वाममार्गाने कमावले त्यांना नजीकच्या काळात नक्की गमवावे लागणार आहे आणि तेच त्रिवार सत्य आहे….

मित्रहो, खाणारे खूप आहेत, ओरडणारे कमी आहेत, ओरडणारेही भ्रष्ट असतील तरी एकवेळ चालेल पण प्रत्येक पक्षात ओरडणारे हवेतच, अन्यथा खाणारे आणखी मस्तवाल होतील आणि हे राज्य अधिकाधिक पोखरले जाईल. आपण किंवा आम्ही सारेच खाणारे पण ओरडणारेही, आमच्या साऱ्यांच्या वृत्तीत आता हे काठोकाठ असे भरले आहे कि खायचे असेल तर आधी किंवा सतत ओरडायचे असते म्हणजे खायला सहज मिळते, मी देखील त्यातलाच एक, आम्ही साsssssssरे खवय्ये….!!

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *