प्रकाश विश्वास आणि चंद्र : पत्रकार हेमंत जोशी

प्रकाश विश्वास आणि चंद्र : पत्रकार हेमंत जोशी 

जसे मुख्यमंत्रयांचे खास सुमित आहेत, उद्धवजींचे खास मिलिंद नार्वेकर आहेत आमदार भारती लव्हेकरांचे खास योगीराज आहेत राज्यमंत्री विद्या ठाकुरांचे खास त्यांचे पती आहेत आशिष शेलारांचे खास कवी प्रशांत डिंगणकर आहेत स्वर्ग च्या मालकांचे खास पत्रकार अनिल थत्ते आहेत ( ओ स्वामी ओ प्रभू…) गिरीश महाजनांचे खास रामेश्वर आहेत किंवा निशिकांत देशपांडे आहेत तसे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काही खास माणसे आहेत ती फार पूर्वीपासून त्यांच्यासंगे त्यांच्या सोबतीला आहेत त्यात सुधीर दिवे असतील, मनोज वाडेकर असतील, जयंत म्हैसकर असतील सुधीर देऊळगावकर असतील अविनाश घुसे असतील, इत्यादी इत्यादी अनेक पण रायगड जिल्ह्यातल्या उरणचे माजी नगराध्यक्ष आणि भावी आमदार महेश बालदी त्याहीपलीकडे म्हणजे ९० च्या दशकापासून तर आजपर्यंत किंवा आयुष्याच्या अखेरपर्यंत गडकरी यांचे म्हणाल तर उजवे हात होते आजही विश्वासू साथीदार आहेत आणि उद्याही असतील…


नितीन गडकरी तसे सांगणार नाहीत पण त्यांनी जर रामदास स्वामी यांनी जशी आपल्या शिष्यांची सत्वपरीक्षा घेतली होती तशी जर उद्या नितीन गडकरी यांनी महेश बालदी, सुधीर दिवे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या आपल्या पट्ट शिष्यांची सत्व परीक्षा घ्यायची ठरविले आणि या वाटीतले पोट्याशियम सायनाईड तुम्हाला चाखायचे आहे, सांगितले तर मला खात्री आहे, बालदी, दिवे आणि मंत्री बावनकुळे क्षणाचाही विलंब न लावता ते जहाल विष चाखून मोकळे होतील, गडकरींनी सभोवताली टीम विश्वासू आणि मेहनती तयार केलेली आहे. येणारी विधानसभा गडकरींचे उजवे हात महेश बालदी उरण मधून लढवतील आणि विवेक पाटलांना म्हणजे विद्यमान आमदाराला अगदी सहज पराभूत करून महेश निवडून येतील, आमदार होतील आणि भाजपा सत्तेत आली तर नामदारही होतील…


या लेखाचा मथळा एखाद्या सिनेमाच्या नावासारखा आहे, प्रकाश विश्वास आणि चंद्र, मथळा विस्ताराने सांगायचा झाल्यास प्रकाश म्हणजे प्रकाश गड मुंबई, वीज खात्याचे मुख्यालय, विश्वास म्हणजे बावनकुळे यांचे सध्याचे हनुमान म्हणाल तर त्यांची काळजी घेणारी सुस्वरूप नर्स आणि चंद्र म्हणजे श्री चंद्रशेखर बावनकुळे. मध्यंतरी गडकरींचे गळ्यातले ताईत किंवा नाकातलया नथीसारखे महेश बालदी यांच्याशी भेट झाली नंतर काही वेळ गप्पा आम्ही मारल्या. महेश बालदी माझ्याशी साधारणतः १५ मिनिटे गप्पा मारत होते आश्चर्य म्हणजे त्यातले तब्बल १० मिनिटे ते फक्त आणि फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करीत होते….


महेश बालदी आपल्या इरसाल भाषेत म्हणाले, रायगड जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री मिळाले विशेष म्हणजे सुनील तटकरे रोह्याचे आमच्या रायगड जिल्ह्याचे ते आघाडी सरकारात केवळ प्रभावी मंत्री नव्हते तर ते चक्क वीज खात्याचे मंत्री होते पण चांगली कामे करण्याची मानसिकता असावी लागते जी मला ठायी ठायी त्या विज मंत्र्याच्या म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात दिसली जे या तिघांनी अजिबात केले नाही ते बावनकुळेंनी केले त्यांनी जगप्रसिद्ध आणि महाराष्ट्राची शान ठरलेल्या घारापुरीच्या लेण्यांना वीज दिली, जे अंतुले यांनी अनेकदा मागणी करून घारपुरीच्या लेण्यांना वीज दिली नाही, ज्या मनोहर जोशी यांच्याकडे सतत पाठपुरावा करून त्यांनीही घारपुरीवासियांचे स्वप्न पूर्ण केले नाही ज्या सुनील तटकरे यांनी रायगडवासीयांनी विनंती करूनही सहज शक्य असतांना वीज दिली नाही त्या घारपुरीशी दूर दूर पर्यंत संबंध नसतांना केवळ एकदा आम्ही त्यांना आठवण करून दिली आणि या कामवेड्या बावनकुळे यांनी आमच्या घारपुरी या जगप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध टुरिस्ट सेंटरला जातीने लक्ष घालून स्वतः सतत पाठपुरावा करून वीज पुरवठा सुरु केला, विरोधकांच्या डोक्यात निदान त्यातून तरी लख्ख प्रकाश पडला असेल, मान लाजेने खाली गेली असेल…हेमंतराव, विविध मंत्र्यांनी भरविलेले अनेक जनता दरबार मी बघितले पण बावनकुळे यांचा आमच्या पनवेल मधला जनता दरबार, फक्त मी वेडा व्हायचा तेवढा बाकी होतो, तेथल्या तेथे निर्णय आणि अधिकाऱ्यांवर जरब काय असते हे मी तेथे माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. मला वीज खात्याचे एक बडे अधिकारी म्हणाले चांदा ते बांदा, साहेबांच्या जनता दरबाराला हा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो…नितीन गडकरी यांचे खास, भाजपाचे हुकमी नेते, उत्तम व्यावसायिक, उद्याचे उरणचे आमदार आणि आजचे सन्मानीय नागरिक श्रीमान महेश बालदी यांनी हे असे वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी काढलेले हे उदगार, डोळ्यात आनंदाश्रू काढतात, असे मंत्री व्हावेत, असावेत….

क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *