फडणवीसांचे कारनामे ५ : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीसांचे कारनामे ५ : पत्रकार हेमंत जोशी 

खुशालचेंडू श्रीमंत खलनायकी स्वरूपाचा शेतकरी फक्त सिनेमात दिसतो. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे असे काहीही नसते ते अतिशय हलाखीचे जीवन जगतात किंवा फास घेऊन, फारतर एखादा परिस्थितीने त्यातला त्यात बरा शेतकरी कीटकनाशके घेऊन आत्महत्या करून मोकळे होतात. विहिरीत उडी मारून आत्महत्या करणे शक्य नसते कारण ऐन डिसेंबरात देखील त्यांच्या विहिरीला पाणी नसते किंवा रॉकेल महाग आहे त्यामुळे तेही अंगावर घेऊन मरणे त्यांना शक्य नसते, म्हणून सर्वात स्वस्त उपाय त्यांना परवडतो, बायकोच्या साडीचा लुगड्याचा फास घेऊन तेमरतात त्यातून मागे उरलेले लुगडे देखील वाया जात नाही, दुसऱ्या दिवसा पासून ते पुन्हा घरातल्या विधवेला नेसता येते. अलीकडे काही दिवसांपूर्वी केवळ पंचतारांकित आयुष्य जगणाऱ्या अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे इत्यादी गरीब शेतकऱ्यांच्या माना कापून श्रीमंत झालेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातल्या तमाम नेत्यांना हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अचानक आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांचा पुतना पुळका आला, येणे स्वाभाविक होते, दुःख त्यांना शेतकऱ्यांचे नव्हते, आपण सत्तेत नाही, त्यामुळे या राज्याला लुबाडणे शक्य नाही याचे त्यांना अधिक दुःख होते मग त्या दुःख्खावर शरद पवारांनी उपाय शोधून काढला आणि हे असे मोर्चाचे थोतांड त्यांनी शोधून काढले, बारा दिवस त्यांनी यवतमाळ ते नागपूर पदयात्रा काढली, पदयात्रा संपल्यानंतर मला वाटले नागपुरातले अधिवेशन हे सारे नेते सामान्य खोल्या असलेल्या आमदार निवासात काढतील पण असे काही झाले नाही हे पुतनामावशीचे प्रेम आलेले नेते नागपुरातील पंच तारांकित हॉटेलकडे उर्वरित दिवस राहण्यासाठी रवाना झाले. असेही मनाला वाटले कि शेतकऱ्यांचे हे तथाकथित कैवारी कदाचित इकडे तिकडे न थांबता थेट काही शेतकऱ्यांच्या घरीच मुक्काम करतील, त्यांचे नेमके दुःख अडचणी यातना समजावून घेऊन आपल्याकडले काही त्यांनाही काढून देतील, त्यांच्या हाती भातके म्हणजे खाऊला पैसे सोपवून मोकळे होतील. पण असे काहीही घडले नाही, सारेच्या सारे पंचतारांकित श्रमपरिहार करून मोकळे झाले. 


अधिवेशनादरम्यान सामान्य माणसांचा त्रास नको म्हणून तसेही सुनील तटकरे आणि अजित पवार हे भाजपाचे नागपुरातील नेते संदीप जोशी यांच्या बंगल्या समोर असलेल्या संदीप बाजोरिया नामक अजित पवारांच्या मित्राच्या कम बदनाम कंत्राटदाराच्या महागड्या लोटस इमारतीतील श्रीमंत सदनिकेत मुक्काम ठोकून आहेत, आणि हेच ते असे शेतकऱ्यांचे कैवारी ज्यांच्या मोर्चाचे प्रायोजक आणि नियोजन म्हणे याच संदीप बाजोरिया यांच्याकडे होते ज्याने अजित पवार किंवा सुनील ताटकरेंच्या साहाय्याने करोडो रुपयांचा सिंचन घोटाळा घडवून आणला आहे. हे असे आहेत शेतकऱ्यांचे तारणहार ज्यांना केवळ पुढल्या निवडणुका जिंकून मंत्रालयातल्या खुर्च्या आणि खिसे गरम करून मोकळे व्हायचे आहे. अर्थात असेही नाही कि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे नेते तेवढे आम्हा सामान्य माणसांसाठी खलनायकासारखे आणि शिवसेना भाजपामधले अत्यंत साधे आणि वेगळे. नो, नाय, नेव्हर, त्यांच्यातही फारच कमी त्या गणपतराव देशमुख, उल्हास पवार, अनंत गाडगीळ यांच्या संस्कारातले, तेही हे असेच लुच्चे लफंगे पंचतारांकित जीवन जगता जगता शेतकऱ्यांसाठी केवळ आम्ही, असे खोटे खोटे सांगणारे. नागपूर अधिवेशनानिमित्ते मी रॅडिसन या पंचतारांकित हॉटेल मध्येच मुक्कामाला त्यामुळे हे असे गरिबांचे तथाकथित कैवारीही तेथे बघायला मिळतात. 


शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नेतृत्व बीड च्या जयदत्त क्षिरसागर या माजी मंत्र्याकडेही होते, ते तेथेच भेटले. मी त्यांना म्हणालो, अरे व्वा, गेली सहा महिने तुम्ही सतत मुख्यमंत्र्यांचा पिच्छा पुरवताय त्यांनी तुम्हाला भाजपा मध्ये घ्यावे म्हणून, वरून अलीकडे जेव्हा फडणवीस बीड ला कुठल्याशा कार्यक्रमासाठी आले असतांना, तुम्ही त्यांना साक्षात लोटांगण घालून मुद्दाम घरी नेले, पाहुणचार घातला आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीला बरे दिवस येताहेत, तुमच्या लक्षात आल्यानंतर देहभान विसरून, पवारांच्या चरणी लीन होऊन शेतकऱ्यांच्या मोर्चात सामील झालाही, त्यांचा चेहरा पडला, दुर्दैवाने हे असे कुंपणावर बसलेले, बसणारे नेते सेनेपेक्षा भाजपामध्ये अधिक लुडबुड करताहेत, त्यातून मूळ संघ आणि जनसंघाचे स्वयंसेवक, कार्यकर्ते देशोधडीला लागून मोकळे होताहेत, असे वास्तविक होता काम नये…


संघ जनसंघाशी बांधिलकी असलेलेच पुढे यायला हवेत, हे असे क्षीरसागर छाप नेते खड्यासारखे निवडून दूर ठेवायला हवेत, माझी तर पक्की माहिती अशी आहे कि जे फडणवीसांची सत्ता आल्यानंतर भाजपामध्ये सामील झाले ते लक्ष्मण ढोबळे किंवा बबनराव पाचपुतेंसारखे भाजपा ची तत्वे मनाला कधी न पटलेले पटणारे नेते कोणत्याही क्षणी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन मोकळे होतील. भाजपचे एखाद्या फिल्मी नाटासारखे झाले आहे, हे फिल्मी नट घरची चांगली सोडून बाहेरची दररोज एक नवी अंथरुणावर खेळवून मोकळे होतात, हे असे झाले आहे, त्यांनी केलेली हि गंभीर चूक आता तरी निस्तरने खूप खूप आवश्यक आहे, गरजेचे आहे….


वाचकमित्रहो, एक तर या राज्यातल्या तमाम भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, पुढाऱ्यांनी, पत्रकारांनी, दलालांनी एक दिवस सरळ सरळ माझा त्या गंगाजल सिनेमातला मोहन जोशी करून मोकळे व्हावे म्हणजे त्या सिनेमासारखे सर्वांनी एकत्र येऊन मला थेट समुद्रात बुडवून मोकळे व्हावे किंवा उर्वरित जनतेने तरी माझे ऐकावे, आपण सारे मिळून त्या बच्चू कडू सारखे एक दिवस एकत्र येऊन इन्कलाब सिनेमातल्या नायकासारखे म्हणजे अमिताभ बच्चन सारखे या तमाम भ्रष्ट मंडळींना एकत्र आणून त्यांना सांगावे कि तुम्ही हे धंदे बंद करता कि आम्ही सारे मिळून तुमचा मोहन जोशी करू…किती दिवस चालायचे हे आधीच्या मंत्र्यांनीही गोरगरिबांना लूट लूट लुटले आणि येथेही तेच दलाल त्या पंकजा मुंडेंसारख्या मंत्र्यांना हाताशी धरून पुन्हा लुटून मोकळे होताहेत. पुरावे खूप आहेत पण मी एकट्याने लढायचे किती, आमच्यातले सारे भाऊ तोरसेकर कसे आणि कधी होतील, नेमके समजत नाही…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *