कुठे फेडाल हि पापे : पत्रकार हेमंत जोशी


कुठे फेडाल हि पापे : पत्रकार हेमंत जोशी 


रविवार दिनांक १३ सप्टेंबर,  दुपारी १ वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा एकवार त्यांनी स्वतःला मोदी यांचा डुप्लिकेट करून घेतला. अनिल कपूर गोविंदा संजय दत्त शाहरुख खान जॅकी श्रॉफ इत्यादींचे डुप्लिकेट आले त्यांनी स्थानिक सामान्य जनतेचे मनोरंजन करून आपले पॉट भरले खरे पण त्यांना ओरिजनल कधीही होता आले नाही कारण तेच, ओरिजनल हा ओरिजनलच असतो आणि डुप्लिकेट हा डुप्लिकेट म्हणूनच शेवटपर्यंत स्वतःला मिरवतो, उद्धव यांना मोदी किंवा बाळासाहेबांचे  डुप्लिकेट म्हणून मिरवून घ्यायचे असेल तर मग हरकत नाही, काही वर्षे त्यात त्यांचे सिनेमातल्या डुप्लिकेट सारखे भागून जाईल पण वेगळे आहोत हे दाखवून द्यायचे असेल तर सध्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जे काय या ८-९ महिन्यात सुरु आहे त्यात त्यांना आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील अन्यथा त्यांचा आणि सेनेचा प्रदीर्घ ह्रास ठरलेला आहे. लहानपणी मला एकच गाणे शाळेतल्या वर्गातले मित्र अनेकदा म्हणायला सांगायचे, मला वाटायचे कि मी ते गाणे उत्तम गातो म्हणून आग्रह केल्या जातो तर ते तसे नव्हते निदान तेवढे एक तरी गाणे मी चांगले म्हणावे म्हणून तो आग्रह असे तसे उद्धव यांचे कि नव्याने मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीचे सुसंवाद पोरकट असायचे, चला निदान यावेळी तरी सुसंवाद उत्तम साधल्या जाईल पण कसले काय, यावेळी देखील त्यांचा सुसंवाद माझ्या रिपीटेड गाण्यासारखाच झाला. उद्धव यांच्याविषयी राग आणि फडणवीस यांच्यावर प्रेम उतू जाणे, असा येथे प्रकार नाही पण माणसे कोरोना हाताबाहेर गेल्याने उद्धवस्त होताहेत आणि ठाकरे सरकारचे तिकडे भलतेच प्रकार सुरु आहेत म्हणून मन अस्वस्थ आहे… 

उद्धव म्हणालेत, लोकांनो तुम्ही कसे नाही बघितले कोरोना काळात मला फिरतांना, केवळ रायगड जिल्ह्यातल्या वादळात ते फिरून आले त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस अख्खा महाराष्ट्र तेही विरोधी पक्षात असतांना पालथा घालून आले हे उद्धव यांना कदाचित लक्षात न आल्याने ते तसे बोलले असावेत. महत्वाचे म्हणजे ‘तेरी साडी मेरे साडी से बढिया क्यों, हे जेव्हा याच उद्धव यांच्या लक्षात आले त्याक्षणी त्यांनी फडणवीसांच्या पायपिटीत अनेक शासकीय अडथळे आणण्यास सुरुवात केली पण तोपर्यंत फडणवीसांचे काम आटोपले होते विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जे काय करायचे होते त्यात पोटतिडिक होती त्यामुळे त्यांचे कोकणापासून तर मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सर्वत्र जनतेने त्यांना उत्स्फूर्त डोक्यावर घेऊन प्रचंड स्वागत केले त्यांच्या सभोवताली गर्दी केली, एखादा लोकमान्य लोकप्रिय धाडसी निर्णय घेणारा निर्णय अमलात आणणारा मुख्यमंत्री लोकांचे गार्हाणे ऐकून घेतो आहे पद्धतीने लोकांनी गर्दी करून  गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. मी जरी इकडे परदेशी नोकरीला असलो तरी चिंता कसली, तिकडे माझ्या बायकोला शेजारच्या गोखल्यांपासून मुले होताहेत कि किंवा रामू पाटील यांनी म्हणावे कि शेतीवर प्रत्यक्ष जाऊन शेती करण्याची गरज ती काय येथे वाड्यावर बसून कॅमेरा समोर ठेवून मला मजुरांना सूचना करता येतात कि, बघा, याच पद्धतीने आपले मुख्यमंत्री पण बोलले आहेत, लावा तो व्हिडीओ पुन्हा आणि बघा ऐका त्यांचे ते १३ तारखेचे भाषण. तेच म्हणताहेत उद्धवजी कि मी येथे चार भिंती आड बसतो हे खरे आहे आणि संगणकाकडे बघून म्हणतात, पण मला येथे सारे दिसत असते. तुम्हीच सांगा, त्यांच्या या बोलण्यावर हसावे कि रडावे, कोण नालायक त्यांना कायम असे हास्यास्पद मुद्दे काढून देतो आणि बोलायला भाग पाडतो येथेही कोणी तरी जॉनी लिव्हर बसलेला दिसतो जो त्यांच्या वाईटावर नजर ठेवून असावा. नवरा नागपूरला आणि बायको मुंबईला बसून हनिमून साजरा करता आला असता तर लोकांना बायकोच्या फोटोची पप्पी घेऊन देखील मुले झाली असती.उद्धवजी, अर्णब कंगना शर्मा ड्रग्स खून यात ज्यांनी चुका केल्या त्याकडे पाठ करा, भोगू द्या त्यांना त्यांच्या पापाची फळे, इकडे कोरोना महामारीकडे लक्ष द्या, महाराष्ट्र उद्धवस्त होतोय…

 
याच १३ सप्टेंबरच्या प्रसार माध्यम सुसंवादात उद्धवजी म्हणाले, या कोरोना काळात आम्ही पावणे दोन कोटी शिव भोजन थाळ्यांचे वाटप केले. कुठे नेऊन ठेवता आहेत ठाकरे आणि भुजबळ तुम्ही हा महाराष्ट्र ? निदान गरिबांचे तरी तळतळाट घेऊ नका त्यांच्या जखमेवर असे मीठ चोळू नका. अहो, पावणे दोन कोटी तर फार दूर, मला बोलायला लावू नका, पंचवीस लाख सुद्धा शिव भोजन थाळ्यांचे भुजबळ यांच्या खात्याने वाटप केलेले नाही आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. मला वाटते या अतिशय गंभीर प्रश्नांकडे किरीट सोमय्या देवेंद्र फडणवीस अतुल भातखळकर राम कदम इत्यादींना लक्ष द्यायला फुरसत नाही कि काय ? वेळ मिळाला कि जा आणि शोधून काढा छगन भुजबळ या तुरुंगातून सुटून आलेल्या मंत्र्याने त्याच्या अवती भोवती जमलेल्या दलालांनी हि शिव भोजन थाळ्यांची नेमकी कंत्राटे कोणाला दिलीत ती, जेव्हा ह्या टग्या कंत्राटदारांची नावे तुमच्या समोर येतील त्याक्षणी तुमच्या ते लक्षात येईल कि शिव भोजन थाळ्यांचे नेमके काय झाले असेल ? पावणे दोन कोटी थाळ्यांपैकी केवळ २५ लाख नित्कृष्ट थाळ्यांचे वाटप तुरुंगातून सुटून आलेल्या छगन भुजबळ यांच्या खात्याने केले अशी माझी माहिती आहे थोडक्यात प्रेताच्या टाळ्यावरचे लोणी यांच्या कंत्राटदरांनी खाल्ल्याचे, माहिती घेतल्यास तुमच्या अगदी सहज लक्षात येईल. इतरही सर्वच खात्यात या आठ महिन्यात प्रचंड भ्रष्टाचार झाले ज्याची माहिती माझ्याकडे आहे पण रडू तेव्हा कोसळले जेव्हा भुजबळ यांच्या कंत्राटदारांनी गरिबांच्या तोंडचे देखील जेवण हिसकावून घेतले. अहो, भुजबळ आणि कंपूने जर खरोखरी, प्रामाणिकपणे शिव भोजन थाळ्यांचे वाटप केले असते तर या मंडळींनी बसता उठता प्रसर माध्यमांना बोलावून त्यांच्या समोर गरिबांना थाळ्यांचे वाटप करतानाचे चित्रीकरण करवून घेऊन लोकांना ते नक्की दाखवले असते. कोट्यवधी रुपयांचा हा शिव भोजन थाळी घोटाळा आणि उद्धवजी मान वर करून सांगताहेत कि पावणे दोन कोटी थाळ्या वितरित केल्या. पुन्हा तेच कि खाणार्यांचा लुबाडणाऱ्यांचा दलालांचा नीच नेत्यांचा अति नीच अधिकाऱ्यांचा वक्त चांगला असू शकतो पण अंत शंभर टक्के वाईटच होणार आहे …. 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *