अभिमन्यू पॉवर ३ : पत्रकार हेमंत जोशी

अभिमन्यू पॉवर ३ : पत्रकार हेमंत जोशी 

सर्वश्री छगन भुजबळ, दिवाकर रावते, अजितदादा, नारायण राणे इत्यादी प्रभूती खदाखदा हसताहेत, कधी कोणी बघितले आहे, नाय नो, नेव्हर. चुकून हि मंडळी एखाद्या लाफ्टर क्लब मध्ये गेलेच तर त्यांच्या गंभीर चेहऱ्याकडे बघून इतर सदस्य पोटे दुखेपर्यंत हसतील पण मला तरी खात्री आहे हि मंडळी प्रसंगी गुदगुदल्या जरी केल्यात तरी एखाद्या स्तब्ध पुतळ्या सारखे किंवा मेणाच्या पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहतील. आदित्य किंवा उद्धव ठाकरे, नारायण राणे, भाई जगताप हि मंडळी कधी कोणी गबाळ्या पोशाखात बघितलेली आहेत का, शंभर टक्के नाही…


आता नेमके उत्तर द्या, पुण्यातला, तोही चक्क सदाशिव पेठी ब्राम्हण न चुकता दररोज किमान शंभर लोकांना अतिशय सुग्रास भोजन तेही आग्रह करून करून खाऊ घालतो, हे कसे शक्य आहे, वाटल्यास सदाशिवपेठी ब्राम्हण दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवणावर ताव मारून येतील वरून माझ्या बायकोलाही टिफिन भरून द्या सांगतील, पण तुमचा अंदाज चुकतोय, चक्क सदाशिवपेठी ब्राम्हण मुंबई किंवा नागपुरातल्या कोणत्याही ऋतूतल्या अधिवेशनादरम्यान दररोज न चुकता किमान शंभर लोकांना मनसोक्त सुग्रास तेही आग्रह करून करून जेऊ घालणारा मी बघितलाय, हे सदाशिवपेठी तुम्हा आम्हा सर्वांच्या अगदी चांगले परिचयाचे आहेत, ते आहेत या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्रीमान गिरीश बापट…विविध पदार्थांनी युक्त घरचे जेवण आणि तेही एवढ्या मोठ्या टिफिन मधून कि टिफिन कडे बघूनच पॉट भरते. नागपुरात असतांना नाही म्हणायला आम्हा पत्रकारांसाठी अमरावतीचे नेते संजय खोडके देखील नागपुरातून घरचे जेवण नेमाने न चुकता आणतात, मला त्यांच्याकडे भोजनाचा अनुभव नाही पण बहुतेक सारेच मीडियावाले त्यांच्या संमिश्र जेवणावर तुटून पडलेले दिसतात. संजय खोडके जातीने आग्रह करून सर्वांना पोट फुटेस्तो जेवायला घालतात..


नेमक्या विषयाकडे वळतो. अभिमन्यू पवारांचे आजोबा आणि वडीलही कट्टर संघस्वयंसेवक होते, वडील तर आणीबाणीत भूमिगत होते आणि त्यांचे सख्खे कोळपेमामा तर १८ महिने तुरुंगात होते, संघ आणि भाजपा तसे अभिमन्यू यांच्या रोमारोमात भिनलेले. आता ते येत्या विधान सभेची तयारी करताहेत थेट लातूरमधून ते अमित देशमुख यांच्याविरुद्ध निवडणूक लढवतील जर अमित यांना काँग्रेस ची उमेदवारी मिळाली तर, शक्यता कमी दिसते, त्यांना यावेळी काँग्रेस मधून उमेदवारी मिळण्याची. अलीकडे म्हणे राहुल गांधी त्या दिवसातून तीन चार वेळा कपडे बदलणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांना म्हणाले, दुसरा तुल्यबळ उमेदवार शोधणे गरजेचे वाटते, कायम हवेतून ये जा करणारे अमीर ‘ अमित देशमुख ‘ यावेळी नकोत, काँग्रेसच्या परंपरागत मतदारांना आणि राहुल गांधींनाही मनापासून वाटते आहे…


असे जर घडले म्हणजे अमित देशमुख यांच्याशिवाय अन्य दुसरा उमेदवार तर मात्र अभिमन्यू पवारांना निवडणून येण्यासाठी कडी मेहनत घ्यावी लागेल आणि श्रीमंत अमितबाबू रिपीट झाले तर अभिमन्यू यांना फडणवीसांसंगे सतत काम करण्याने जो प्रचंड थकवा येणार आहे, येतो आहे, आला आहे, निवडणूक प्रचार करण्याची त्यांना कणभर देखील गरज भासणार नाही त्यांनी त्यादरम्यान आराम करून घ्यावा, झोपा काढाव्यात किंवा कुटुंबसंगे एखादी परदेशवारी करून घ्यावी. आजही नाही म्हणायला नेमके तेच घडते आहे म्हणजे लातूरचे आमदार अभिमन्यू पवार कि अन्य कोणी, नेमके नवख्यांच्या लक्षात येत नाही, विद्यमान आमदाराने लाजेने मान खाली घालावी, एवढा प्रचंड घोळका अभिमन्यू पवारांच्या सभोवताली ते लातुरात प्रकटले रे प्रकटले कि उत्स्फूर्त जमा होतो. मागल्यावेळी अभिमन्यू यांच्यावर त्यांच्या भाजपाने अन्याय केला त्यामुळे त्यांच्या आयुष्यातली पाचवर्षांची आमदारकी फुकट गेली. ते निवडून आले असते आधी आमदार आणि लागोपाठ नामदार देखील झाले असते. आता फक्त त्यांच्या कपाळावरच टीळा असतो ते निवडून आले असते तर त्यांच्या केसांमध्ये सिंदुरसारखा कायमस्वरूपी गुलाल दिसला असता, त्यांचे दुर्दैव, दुसरे काहीही नाही…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *