सारस्वत ब्राम्हण : पत्रकार हेमंत जोशी

सारस्वत ब्राम्हण : पत्रकार हेमंत जोशी 

होय, मासे खाणारेही ब्राम्हण आहेत, मासे खाणारे ब्राम्हण मासे न खाणाऱ्या ब्राम्हणांपेक्षा अधिक यशस्वी आहेत. म्हणून हल्ली हल्ली डोक्यात विचार येतो कि गावोगावी फिरून प्रचार करावा, मासे न खाणाऱ्या ब्राम्हणांना सांगत सुटावे कि मासे खा यशस्वी व्हा. मासे खावे अधिक यशस्वी व्हावे असे मला वाटत असल्याने मीही मासे खाणे सुरु करावे या विचारात आहे. अनेक जाती या राज्यातल्या, ज्यांचा दुरांनवये देखील ब्राम्हणांशी या जातीशी संबंध नाही नसतो पण बिनधास्त सांगून मोकळे होतात आम्हीही ब्राम्हण आहोत, त्यामुळे त्यांना ब्राम्हणांशी सोयरीक जोडताना खूप सोपे जाते पण मासे खाणाऱ्या सरस्वतांचे तसे नाही ते ब्राम्हण आहेत त्यांना सारे सारस्वत ब्राम्हण म्हणूनच ओळखतात, मला वाटते सारस्वत ब्राम्हण हे कोकणस्थ ब्राम्हणांपेक्षा देखील अधिक यशस्वी आहेत अर्थात सारस्वतांवर अत्यंत अभ्यासू आणि हुकमी बोलावे ते कालनिर्णय च्या जयराज साळगावकर यांनीच. त्यांनी सारस्वतांवर पुस्तक देखील लिहिलेले आहे, प्रकाशित केले आहे. साळगावकरही सारस्वत म्हणूनच प्रचंड यशस्वी. दरवर्षी तब्बल ९ भाषांमध्ये १४-१५ कोटी कॅलेंडर्स म्हणजे कालनिर्णय साळगावकर कुटुंब छापून विकून मोकळे होतात…


वरून केव्हाही जयराजजींच्या कार्यालयात जावे तर आयुष्यात जणू काही करायचे उरलेले नाही अशा अविर्भावात मोठमोठ्या नामवंतांशी गप्पा मारतांना ते दिसतात मग आपणही एक भाग्यवान असे मनाला सांगून त्यांच्यात सामील व्हावे. कधी कधी जयराजजी कुठल्याशा निमित्ताने तणावाखाली दिसले कि हळूच माशांचा विषय काढावा मग सारस्वतांची कळी एकदम खुलते आणि नेहमीच्या चार धमाल गप्पा मारून बाहेर पडता येते. होय, सारस्वतांच्या हृदयाला एका क्षणात हात घालायचा असेल तर भलेही तुम्हाला वर्ज्य असेल पण मासे या विषयाने बोलायला सुरुवात करावी, पुढल्या क्षणी ते तुम्हाला डोक्यावर घेतात त्यांचे कोकणस्थांसारखे नाही म्हणजे तुमच्या बोलण्यावर कोकणस्थ घरी जाऊन टाळ्या वाजवतात म्हणजे दाद देतात, सारस्वत ब्राम्हण तोंडावर कौतुक करून मोकळे होतात, व्यवहारी पण ते तसे मनाने देखील नक्की मोठे. मला तर हल्ली हल्ली असे वाटायला लागले आहे कि जसे आम्ही भारतीय वनस्पती तुपाला डालडा म्हणून मोकळे होत असू किंवा आजही मिनरल वॉटर द्या ऐवजी बिसलेरी द्या म्हणतो, तसे त्या साळगावकरांच्या बाबतीत नक्की घडणार आहे म्हणजे एक कॅलेंडर द्या, ऐवजी ग्राहक म्हणेल, एक कालनिर्णय द्या…


आणखी एका सारस्वत मित्राविषयी येथे नेमके सांगायचे आहे. उद्योगपती प्रणेश धोंड हे ते नाव. मी मोठा आहे कारण माझे मित्र मोठे आहेत मग ते साळगावकर असतील किंवा धोंड साहेब असतील अन्य असे कितीतरी. या मंडळींचे यश तोंडात बोट घालायला भाग पडते. नाव प्रणेश म्हणजे एखाद्या विशीतल्या तरुणाला शोभावे असे पण प्रणेश वृद्धत्वाकडे झुकलेले असतांनाही त्यांचा उत्साह आजही एखादया ताकदवान तरुणाला शोभणारा. म्हणाल तर या वयात त्यांना यत्किंचितही धडपडण्याची गरज नाही आवश्यकता नाही कारण ते एकतर स्वतः श्रीमंत आहेत आणि त्यांचा मुलगा व मुलगी तिकडे अमेरिकेत वेल सेटल्ड आहेत पण स्वस्थ आणि शांत बसणे त्यांच्या स्वभावात नाही. विशेष म्हणजे त्यांची पत्नी घरी दुर्धर रोगाने त्रस्त आहे, तिची सतत सेवा वरून धावपळ करायला लावणारा त्यांचा कन्व्हेअर बेल्ट्स बनविण्याचा, तयार करण्याचा मोठा व्यवसाय पण थांबणे थकणे प्रणेश धोंड यांना माहित नाही, कदाचित त्यामुळेच ते या वयातही एखाद्या ताकदवान तरुणाला लाजवून मोकळे होतात. कधी ते त्यांच्या गोव्याच्या फॅक्ट्रीत असतात तर कधी मुंबईच्या कार्यालयात तर कधी भुसावळच्या फॅक्ट्रीमध्ये. त्यांचे येथे कौतुक यासाठी कि त्यांच्या ‘ ग्लोबल कन्व्हेअर सिस्टिम्स ‘ या कंपनीला अलीकडेच अत्यंत नाविन्यपूर्ण विशेष म्हणजे न गंजणार्या या कन्व्हेअर रोलरला, बेल्ट्सला भारत सरकारकडून पेटंट प्रदान करण्यात आलेले आहे. पुढे जाऊन सांगायचे झाल्यास वीज महामंडळाला त्यांच्या फॅक्ट्रीत जे कन्व्हेअर बेल्ट्स लागतात, त्यातले धोंड यांच्या फॅक्ट्रीतून तयार झालेले एकमेव बेल्ट्स अतिशय दर्जेदार आहेत, इतर जे दबाव टाकून वीज महामंडळाला असे कन्व्हेअर बेल्ट्स विकतात तो केवळ एक लुटण्याचा प्रकार असतो…


कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून सांगतो, आपण कन्व्हेअर बेल्ट्स नेहमी विमानतळावर जेथे आपले लगेज येते तेथे बघतो. असे बेल्ट्स विशेषतः फर्टिलायझर व सिमेंट बनविणार्या कारखान्यात आणि विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये कोळसा वाहून नेण्याच्या प्रक्रियेत हमखास आवश्यक असतात, धोंड यांची या क्षेत्रातली निर्मिती आणि त्यांनी घरचे कोणीही साथीला नसतांना मिळविलेले पेटंट, मला सहजच अवतार सिनेमातल्या राजेश खन्नाची आठवण झाली म्हणजे वृद्धत्वाला झिडकारून प्रणेश धोंड या मित्राने सारस्वत ब्राम्हणाने मिळविलेले यश डोळ्यांचे पारणे फेडणारे, म्हणून हल्ली हल्ली वाटायला लागलेले आहे मासे खायला सुरुवात करावी. सततचे संशोधन त्यावर जगभर फिरून माहिती गोळा करणे आणि दर्जेदार कन्व्हेअर बेल्ट्सची निर्मिती कशी करता येईल डोक्यात हे सततचे विचार, दिनरात मेहनत त्यातून त्यांना थेट भारत सरकारने पेटंट प्रदान केले आहे, यशाला वयाची मर्यादा नसते, वयाच्या तिसाव्या वर्षी बापाच्या भरवशावर जेवणारे या राज्यातले कितीतरी तरुण, त्यांनी अशा मंडळींच्या पायाची धूळ नक्की कपाळाला लावून मोकळे व्हावे, टाइम पास न करता…


जात जाता : एक याठिकाणी नक्की सांगावेसे वाटते कि जेव्हा प्रणेश धोंड कोणतीही ओळख नसतांना कोणतीही ओळखपाळख मुद्दाम न काढता राज्याच्या उत्साही वीज खात्याच्या मंत्र्याला म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा थेट नागपुरात भेटायला गेले आणि आपल्या या दर्जेदार उत्पादनाची माहिती करून दिली, वेळ नसतांनाही श्री बावनकुळे यांनी त्यांना थेट आपल्या गाडीत शेजारी बसवून घेतले, त्यावर माहिती घेतली आणि चहाच्या कपाची देखील अपेक्षा न ठेवता धोंड यांना त्यांच्या खात्याचे दरवाजे मोकळे करून दिले, हे मला धोंड यांनी त्यांचे काम झाल्यानंतर सांगितले, असेच मंत्री असावेत, मला तर हे नेहमीच वाटते…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *