लाज वाटते मराठी मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी

लाज वाटते मराठी मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी 

ह्या लेखातला नेमका विषय सुरु करण्यापूर्वी एक आगळे आवाहन येथे करू इच्छितो, मनातली अस्वस्थता देखील सांगू इच्छितो. तसेही माझे वृत्तपत्र हे केवळ एक वर्तमान म्हणून त्याकडे बघू नये, ते तुमचे आमचे गप्पा मारण्याचे
एक व्यासपीठ आहे. अस्वस्थता अशी कि आपल्या या मुंबईत जगातले विविध पदार्थ खाद्य पदार्थ उपलब्ध असलेली अनेक रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे दाक्षिणात्य पदार्थांसाठी माटुंगा पूर्व आहे, गुजराथी खाद्य पदार्थांसाठी काळबादेवीचे ठक्कर भोजनालय किंवा पार्ले पूर्व येथे ‘ तोशा ‘ सारखे हुबेहूब चवींचे हॉटेल्स आहेत, उत्कृष्ट भेळ पुरीसाठी आम्ही सांताक्रूझच्या राम श्याम भेळवाल्याकडे जातो किंवा चायनीज खाण्यासाठी ‘ स्प्रिंग ओनियन ‘ सारखे रेस्टॉरंट्स आहेत. झणझणीत मिसळ खाण्यासाठी थेट ठाण्यात मामलेदार कडे जावे लागते तर अत्योत्तम कॉफी साठी मुंबईतले २२-२५ ‘ कॉफी बाय डी बेला ‘ मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी आहेत, थोडक्यात हुबेहूब चवीचे विविध देशातले, आपल्या देशातले कितीतरी रेस्टॉरंट्स या मुंबापुरीत आहेत पण आमच्या या मराठी मुंबईत ‘ आस्वाद ‘ सारखा अगदीच एखादा दुसरा अपवाद सोडल्यास राज्यातल्या विविध भागातल्या मराठी पदार्थांची जशीच्या तशी चव चाखायला मिळणारे एकही मराठी खानावळ किंवा मराठी उपहारगृह नाही, आम्हा मराठीची हि मोठी शोकांतिका आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून मला ती खंत आहे. एकदा तर मी आस्वाद मित्रवर्य सरजोशी यांना म्हणालो देखील कि सुरुवातीला तुमचे उपहारगृह केवळ मराठी पदार्थांचे होते,

नंतर त्यात सारे जग घुसले त्यामुळे असे वाटते कि बायकोबरोबर सासर्याने आपल्या सोयीसाठी एखादी दाक्षिणात्य तरुणी देखील पाठवून दिली त्यावर सरजोशी म्हणाले, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे बदल करावे लागले म्हणजे थेट पोह्यांशेजारी आम्हाला डोसे किंवा पिझा सारखे अर्थाअर्थी संबंध नसलेले पदार्थ ठेवावे लागले. माझा धाकटा मुलगा विनीत किंवा मुलासमान राहुल येथे मुंबईत हुबेहूब पाश्चिमात्य पद्धतीचे कॉफी शॉप्स उघडून पोटापाण्याचा व्यवस्थित लागले असतील पण कोणीही माझ्या टाहो फोडण्याकडे आजतागायत लक्ष दिलेले नाही म्हणून हे आव्हान येथे मला करावेसे वाटले, वाटते कि एखाद्याने पुढे येऊन मुंबईत मोक्याच्या जागी नव्हे तर फक्त मोक्याच्या परिसरात मग ती भलेही अगदी पहिल्या माळ्यावर असेल, पुढे यावे आणि जागा उपलब्ध करून द्यावी, मला येथे आमच्या मुंबईत जगातल्या लोकांसाठी राज्यातले जसेच्या तसे चवीचे मराठी खाद्यपदार्थ असलेली म्हणाल तर खानावळ किंवा म्हणाल तर चक्क आणि फक्त मराठी उपहारगृह उघडायचे आहे, आणि जे मुंबई किंवा पुण्यातले आम्हाला जवळून ओळखतात, त्यांना माहित आहे, याही व्यवसायात आमचा हातखंडा आहे, फक्त जागेचे तेवढे बघावे, ते कठीण जाते आहे…मुंबईकरांचे दुर्दैव असे कि त्यांना हुबेहूब मराठी पदार्थांची चव घेण्यासाठी उठसुठ पुण्याला जावे लागते. उद्या नेमक्या मराठी पदार्थांची चव घेण्यासाठी त्यावर म्हणाल तर हुकमत किंवा म्हणाल तर मोनोपली असलेले पुणेकर जेव्हा येथे मुंबईत अस्सल मराठी पदार्थांची चव घेण्यासाठी आमच्याकडे येतील तो दिवस निदान माझ्यासाठी तरी, अत्यानंदाचा ठरेल. आणि हो, ‘ मला शोभेल ‘ असे मी या मराठी खानावळीचे नेमके नाव देखील नोंदणीकृत करून घेतलेले आहे आणि नाव आहे, बनवाबनवी…

राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या त्या त्या भागातल्या पदार्थांची चव घेण्यासाठी एकतर पुणे गाठावे लागते किंवा त्या त्या भागात जावे लागते म्हणजे अख्ख्या मुंबईत एकही ठिकाणी लुसलुशीत पुरणाची मिळत नसल्याने त्यासाठी नाशिक ते नागपूर दरम्यान कोणाला तरी गाठावे लागते किंवा नेमका चविष्ट सत्यनारायणाचा प्रसाद येथे मुंबईत एकही ठिकाणी तयार होत नसल्याने त्यासाठी मुंबईतल्या एखाद्या पाककलेत प्रवीण असलेले ब्राम्हणाचे घर गाठावे लागते किंवा नेमकी मिरच्यांची भाजी, शेवेची भाजी किंवा भरीत खाण्यासाठी येथे एखाद्या लेवा पाटलाचे घर गाठावे लागते कारण मराठी पदार्थांची नेमकी चव येथे जगप्रसिद्ध मुंबईत उपहारगृहातून अभावाने उपलब्ध
 आहे, जे काय मिळते ते बहुतेकवेळा बेचव असते किंवा मराठी स्त्रीने घरी हौस म्हणून जसे बनविलेले पाश्चिमात्य पदार्थ आम्हाला गिळावे लागतात तेच येथे उपहारगृहातून उपलब्ध असलेल्या बहुतेक मराठी पदार्थांच्या बाबतीत घडते. मराठीचे अत्यंत लाडके असे चविष्ट पिठले येथे मुंबईत आधी खूप खावे नंतर त्या भूषण कडू सारखे अमाप
पादावे एकही उपहारगृहातून मिळू नये यासारखे दुर्दैव नाही, मग त्यासाठी पुण्यात गेलो कि कामे बाजूला ठेवून नेमक्या चविष्ट मराठी पदार्थांचे उपहारगृह शोधात फिरावे लागते, मुंबईकरांचे हे मोठे दुर्दैव आहे…

कृपया माझ्या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, ज्यांच्याकडे मोक्याच्या परिसरात जागा उपलब्ध आहे, त्यांनी अगदी दुडदुडत मजकडे यावे, विनंती. आपल्याला जगातून मुंबईत येणाऱ्या मंडळींना मराठी पदार्थांची नेमकी ‘बनवाबनवी ‘ त्यांना दाखवून द्यायची आहे. आम्ही मराठी जेथे तेथे कमी पडतो. अलीकडे अमेरिकेतून परततांना बिझिनेस क्लास मध्ये मी एकटा मराठी होतो आणि सारेच्या सारे अमराठी, मोठ्या प्रमाणावर गुजराथी होते, हे प्रमाण उलटे व्हायला पाहिजे, परदेशातून येतांना जेव्हा बहुसंख्य मराठी बिझिनेस क्लास मधून उतरतील, आपण
खऱ्या अर्थाने यशस्वी झालो तेव्हा म्हणता येईल. चला व्यवसायात उतरूया..
तूर्त एवढेच!

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *