मेट्रोवूमन : पत्रकार हेमंत जोशी

मेट्रोवूमन : पत्रकार हेमंत जोशी 

मी वरणाला फोडणी घालतो तू पोळ्या करून घे पद्धतीने भिडे दाम्पत्याने आयुष्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर निर्णय घेतलेला दिसतो, डॉ. सतीश आणि अश्विनी भिडे दोघेही एकेकाळी प्रशासकीय अधिकारी पण कुठे माशी शिंकली नेमके सांगणे अशक्य मात्र डॉ. सतीश भिडे प्रशाकीय सेवेतून मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून व्यवसायात पडले, नोकरीतून बाहेर पडल्यानंतर या निर्णयाप्रती खुश आहेत का त्यांना विचारले तर चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले म्हणजे खुश असावेत किंवा फारसे खुश नसावेत पण समाधानी नक्कीच आहेत. आहे ते व्यवस्थित सुरु असतांना आयुष्याच्या मध्यावर वेगळे वळण घेणे मोठी रिस्क असते पण डॉ सतीश आणि अश्विनी ताई त्यादोघांमधले एकमेकांशी असलेले बॉण्डिंग आणि पारंपरिक उत्तम संस्कारांची त्याला जोड, एक सुखी समाधानी कुटुंब नक्की म्हणता येईल… 


माझी एक सहेली पुण्यातली प्रथितयश लेखिका श्रद्धा आशिष कुलकर्णी अश्विनीताईंना मेट्रोवूमन म्हणतात, खरे आहे ते अत्यन्त कमी वेळेत दर्जेदार मेट्रो तेही मुंबईतल्या खडतर रस्त्यांवर, मुख्यमंत्री फडणवीसांचे हे पंचवार्षिक स्वप्न प्रत्यक्षात उतरवले उतरवून दाखवले तेही एका महिलेने, घर सांभाळून. एकेकाळी योगायोगाने चर्चगेटला असलेल्या बेलेव्हन या शासकीय इमारतीत ज्यांचे माझ्या डोळ्यात कायम कौतुक असते त्या तिघीही प्रशासकीय अधिकारी अश्विनी जोशी, मनीषा म्हैसकर आणि अश्विनी भिडे या इमारतीत वास्तव्याला होत्या. तिघींचेही व्यक्तिमत्व पूर्णतः भिन्न म्हणजे अश्विनी जोशी समोरचा मग कितीही ताकदवान प्रभावी समजणारा असो, निर्णयावर ठाम राहून प्रसंगी पंगा घेऊन मोकळ्या होणाऱ्या, मनीषाताई पण तडफदार उत्साहाच्याबाबतीत एकदम भन्नाट फटक्यासरशी कामे बाजूला करून मोकळ्या होणाऱ्या या दोन्ही जशा तडकफडक तेवढ्याच अश्विनी भिडे शांत पण शामळू नाहीत, कधीही नव्हत्या. अभिमान वाटावा अशा या तिघीही, पत्रकारितेत असल्याने त्यांच्याशी नक्की संपर्क येतो, खूप छान वाटते. नोकरीत मोठी उंची गाठणे तेवढे सोपे नसते…


मनाला अमुक एखादे पटले नाही तर थेट प्रशासकीय पदाचा राजीनामा देणाऱ्या भिडे कुटुंबातल्या अश्विनी त्यांना जर मेट्रो प्रकल्प उभा करतांना काही गैर वाटले दिसले असते तर त्या तेथून लगेच बाजूला झाल्या असत्या, आज आरे वृक्षतोड प्रकरणावर जो हल्लकल्लोळ माजलाय त्यातून नेमकी माहिती घेऊन मी तुम्हाला हे सांगतोय, नेमकी वस्तुस्थिती समजावून घेणे नक्की आवश्यक ठरते, त्यासाठी दस्तुरखुद्द अश्विनी भिडे यांचे नेमके काय म्हणणे सांगणे आहे ते येथे त्यांच्याच शब्दात दुसऱ्या लेखात मांडलेले आहे, पटले तर स्वीकारा अन्यथा तुमची भूमिका मांडा, त्यांच्यापर्यंत मी नक्की ती भूमिका घेऊन जाईन. मला आठवते अश्विनी भिडे नागपूरला असतांना त्यांनी त्या परिसरात परंपरागत जलसंधारणाचे प्रयोग राबवून ज्या पद्धतीने यश मिळविले होते त्या अश्विनीताई निसर्गाचा खेळखंडोबा मेट्रोसाठी करून ठेवतील, नक्की ते घडणारे नाही म्हणून त्यांचीही भूमिका येथे समजावून घेणे नक्की आवश्यक ठरते…


www.vikrantjoshi.com


पर्यावरणावर मनापासून प्रेम करणारी हि सांगलीकर प्रशासकीय अधिकारी, नागपूरला असतांना लघुसिंचन करणारे कमी खर्चात बंधारे उभारून त्यांनी ज्या पद्धतीने पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात केली होती, हे सारे मला वाटते, फडणवीसांनी ते नागपूरकर या नात्याने बघितल्यानेच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून बघितलेले मेट्रोचे भव्यदिव्य स्वप्न पूर्ण करण्याचे काम अश्विनी भिडे यांच्यावर मोठ्या विश्वासाने सोपविले, हि पंचवार्षिक योजना संपत असतांनाच अगदी अलीकडे थेट पंतप्रधानांनी मेट्रो ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. वास्तविक अश्विनीताई साहित्य घेऊन पुढे प्रशासकीय अधिकारावर पोहोचलेल्या, मला मेट्रो मधला माझा एक अधिकारी मित्र सांगत होता, भिडेमॅडम यांची मेट्रो सारख्या टेक्निकल विषयावर असलेली पकड बघून त्या अख्ख्या भारतात प्रशासकीय सेवेतल्या नोकरीत पहिल्या आल्या होत्या त्याची प्रचिती येथे अनुभवायला मिळते…


सोशल मीडिया किंवा वृत्तपत्रे, वाहिन्या थोडक्यात विविध प्रसिद्धीच्या माध्यमातून आपण अनेकदा नको तेवढे माहिती न घेता ज्ञान पाजळत बसतो, मेट्रो प्रकल्प नेमका समजावून घेण्यासाठी म्हणूनच अश्विनी भिडे यांचे लिखाण याठिकाणी वेगळ्या ठिकाणी मुद्दाम मांडले आहे ते तुम्ही वाचायला हवे तदनंतर स्वतःची मते मांडायला हवी. मोठ्या कष्टाने, तेवढ्याच शांत चित्ताने भिडे आणि त्यांच्या चमूने अल्पावधीत मुंबईत उभे केलेले मेट्रोचे जाळे, मराठी म्हणून त्यांचे कौतुक करायलाच हवे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *