शरद पवार राष्ट्रवादी आणि राष्टपती २ : पत्रकार हेमंत जोशी

एखाद्या तरुणीला सलमान सारखा दिसणारा नवरा करायचा असतो, सलमान मिळत नाही वय झालेले असते, लग्नाचे वय उलटून गेलेले 

असते मग ती सलमान डोक्यातून काढते आणि अलोकनाथ पसंत करून मोकळी होते. शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान व्हायचे होते पण ते होता आले नाही, त्यांना तशी संधी जंग जंग पछाडून देखील मिळाली नाही,मग त्यांनी केंद्रात मंत्री होणे पसंत केले. आता पुन्हा एकदा त्यांना सुवर्णसंधी चालून आलेली आहे, पवारांना राष्ट्रपती व्हायचे आहे आणि मोदींना पवार राष्ट्रपती म्हणून चालणारे आहेत, पवार हेच पुढले राष्ट्रपती असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे….

शरद पवार देशाचे राष्ट्रपती झाले तर ते निवृत्त होईपर्यंत त्यांना आजच्यासारखे राज्यात ठाण मांडून बसणे अजिबात शक्य नसेल. पक्षाची विस्कटलेली घडी नीट बसविण्यासाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना राज्याबाहेरच्या राजकारणात अजिबात लक्ष देणे जमलेले नाही. त्यांनी तसे केले असते तर महाराष्ट्रातला उरला सुरला पक्ष केव्हाच संपला असता, चांगले नेते मोठ्या प्रमाणावर निघून गेले असते. वरून छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त अजित पवार यांच्यासारखे आणखी चार दोन नेते तुरुंगात खाडी फोडायला गेले असते, बरे झाले पवार पुन्हा देशातून राज्यात रमले, पक्षातल्या भ्रष्ट आणि संधीसाधू लोकांनीच पवारांचे पंख छाटले. पवार हे मोदी यांच्या तोडीचे नेते पण त्यांचा पार विचका आणि पचका झाला…

अलीकडे मुंबई राष्ट्रवादी मध्ये बिहार सारख्या बंदुका बाहेर निघाल्या. नेमका त्यातला गुंड आणि बदमाश कोण, सांगणे कठीण, दोघेही तोडीस तोड. पवारांनी या अशा विषारी मंडळींना मोठे केले आता ते पवारांनाच चावायला निघाले आहेत. चार गुंड मोठे करण्यापेक्षा पवारांनी जर चार चांगले नेते मोठे केले असते तर त्यांना सत्तेचे यश कदाचित चार दिवस उशिरा मिळाले असते पण ते घडले नाही. राष्ट्रवादीत नेमका नेता दिसत नाही जया चांगले म्हणावे किंवा सज्जन सुसंस्कृत ठरवावे, पवारांना गिरीश गांधी चालत नाहीत त्यांना गिल्बर्ट मेंडोन्सा अधिक जवळचा वाटतो. आता हे असे बंदूकधारी प्रकार बघितल्यामुळेच शरदराव गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे केंद्रातले मंत्रिपद गमावल्यानंतर राज्यात मुद्दाम ठाण मांडून बसलेले आहेत…..

एकदा का राष्ट्रपती झाल्यानंतर म्हणजे राजकारणापासून दूर गेल्यानंतर, पवारांची राष्ट्रवादी त्यांचे अस्तित्व असेपर्यंत संपणार नाही असे दिसते कारण राष्ट्रवादीचे प्रमुख राष्ट्रपती झाले कि आपोआप त्या पक्षाचे महत्व टिकते आणि कायमही राहते. पण राष्ट्रवादी भविष्यात कायम टिकवायची असेल तर पक्षाचे नेतृत्व अजित पवार ऐवजी जर सुप्रिया सुळे यांनी केले तर हा पक्ष आणखी आणि पुन्हा एकदा या राज्यात महत्व प्राप्त करेल असे दिसते मात्र अजितदादा जर नेते म्हणून पवारांनी पुढे केले तर राष्ट्र्वादीतले भास्कर जाधव दत्त मेघे किंवा बबनराव पाचपुते यांच्यासारखे संघटन कौशल्य अंगी बनलेले नेते नेहमीप्रमाणे दूर पळतील, उरले सुरले धनंजय मुंडे यांच्यासारखे द बेस्ट पण पक्षांतर करतील आणि उरतील मागे राहतील ते सुनील तटकरे यांच्यासारखे वादग्रस्त आणि भ्रष्ट. बबनराव पाचपुते असोत कि रत्नागिरीचे बलदंड युवा नेते उदय सामंत, असे कितीतरी नेते अजिबात इच्छा नसतांना राष्ट्रवादीत चार दोन नेत्यांच्या सततच्या अपमान होण्यातून सोडून गेलेत हि वस्तुस्थिती आहे . शरद पवार यांच्या ते लक्षात आल्यानेच त्यांनी अजित पवारांची सूत्र पुन्हा आपल्याकडे घेतली, कशीबशी गाडी रुळावर आणली. कोकणातली राष्ट्रवादी असो कि विदर्भातली, तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणखी आणखी रोडावत गेली. अलीकडे तर असे वाटते शरदरावांच्या साथीला सुप्रिया किंवा धनंजय मुंडे यांच्यासारखे धडाकेबाज पण उध्दट नसलेले नेते असणे पवारांची आणि राष्ट्रवादीची ती गरज आहे. विदर्भ नाही, ठाणे जेमतेम, नव्या मुंबईतले गणेश नाईक देखील नेमके काय ठरवतील नेम नाही, तेही काठावरच आणि डावखरे निवृत्त झालेले. कोकणचे देखील काही खरे नाही, मुंबईत राष्ट्रवादीचे उरले सुरले अस्तित्व महापालिका निवडणुकीनंतर संपल्यात जमा असेल असे वाटते तेव्हा नेमके भान ठेवून काही खंबीर आणि गंभीर निर्णय घेणे शरद पवारांना आवश्यक आहेत. अर्थात पवारांना मी राजकारण शिकविणे म्हणजे कल्याणकरांना पैसे कसे खावेत हे शिकवण्यासारखे किंवा लोकांना कसे हसवावे, फसवावे नाही, हे आमदार दिलीप सोपल किंवा पत्रकार उदय तानपाठक यांना शिकवण्यासारखे. थोडक्यात पवार सक्षम आहेत आणि थकत्या निवृत्तीच्या वयात नेमके काय करावे त्यांना ठाऊक आहे, आपला भीष्म होणार नाही याची ते नक्कीच काळजी घेतील….

तूर्त एवढेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *