खासदाराचे अल्टिमेटम ३ : पत्रकार हेमंत जोशी

खासदाराचे अल्टिमेटम ३ : पत्रकार हेमंत जोशी 

शत्रूचा नाश केला तर फायदा होतो आणि आपलेच संपवायला घेतले तर वाटोळे साऱ्यांचेच होते. दोष स्वतःचे आणि बोट दुसऱ्याकडे, अशी माणसे मूर्ख असतात. गुणी माणसांचे दोष काढणारे त्यांची निन्दा करणारे प्रगतीकडे वाटचाल करणे अशक्य. आता नेमक्या विषयाला हात घालतो…मुंबईत बसून हेमंत जोशी दूरवर अकोल्यातले राजकीय नाट्य लिहिण्यात यासाठी गुंतलेले आहेत कारण भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी त्यांच्या कम्पूला म्हणजे आमदार गोवर्धन शर्मा किंवा आमदार रणधीर सावरकर, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल इत्यादींना हाताशी धरून त्यांच्याच पक्षातल्या राज्यमंत्र्याशी थोडक्यात थेट सरकारशी सरळ सरळ हुबेहूब त्या नाना पटोले यांच्या बंडाशी साधर्म्य असलेले बंड अगदी उघड पुकारलेले आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षश्रेष्ठींना अल्टिमेटम देणे म्हणजे उघड आव्हान केल्यासारखे आहे, पण अकोला जिल्ह्यातल्या मतदारांना संजय धोत्रे यांनी केलेले हे बंड किंवा दिलेले आव्हान फारसे आश्चर्यात टाकणारे नाही, त्यांचे म्हणणे असे कि मागल्या लोकसभेच्या वेळीच धोत्रे भाजपमधून बाहेर पडून पवारांना बिलगून मोकळे झाले असते पण मोदी लाट आली नेमकी या राज्यातली पवारांची लाट त्यादरम्यान अति झपाट्याने उतरली म्हणून धोत्रे यांचे पक्षांतर थांबले, यावेळी त्यांचे बंड हवेत विरणे अकोलेकरांना अशक्य वाटते, धोत्रे यांचे पक्षांतर करणे जवळपास निश्चित झाले आहे असेच त्यांना आता वाटते आहे. भाजपा ला धोत्रे यांचे पक्ष सोडून जाणे फारसे नुकसान करणारे नसेल मात्र अकोला जिल्ह्यात फारशी अस्तित्वात नसलेली राष्ट्रवादी काहीसे नक्की बाळसे धरेल. पण भाजपाचे एक बरे आहे त्यांच्याकडे राज्यमंत्री रणजित पाटलांच्या रूपाने नक्की प्रभावी नेता आहे, धोत्रे केवळ अकोला जिल्ह्याचे नेतृत्व करतात, रणजित पाटलांची मात्र थेट पाच जिल्ह्यावर म्हणजे अकोला, वाशीम, यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती वर हुकूमत आहे, पकड आहे त्यामुळे अगदीच तशी वेळ आली म्हणजे धोत्रे हे पटोले यांच्या मार्गाने गेले तर भाजपाचे 

अतोनात नुकसान झाले असे होणार नाही…


विदर्भातला पदवीधर मतदार अतिशय सावध आहे, चिकित्सक आहे, तो नेमके मतदान करतो, प्रसंगी त्याच्या पसंतीचे उमेदवार नसतील तर वर्हाडी मतदार मतदानाच्या दिवशी घरी बसणे पसंत करेल पण चुकीचा उमेदवार त्याने निवडला असे होत नाही म्हणून बी टी देशमुख हे तसे मधू दंडवते सारख्या आदर्शाच्या रांगेतले नेते वर उल्लेख केलेले पाचही जिल्ह्यातले सुशिक्षित मतदार त्यांना नेहमी पदवीधर विधान परिषद मतदार संघातून निवडून पाठवायचे पण अशी वेळ आली कि याच मतदारांनी त्यांना पराभूत केले आणि रणजित पाटलांना निवडून दिले. याच चिकित्सक मतदारांनी मागल्या वर्षी पुन्हा एकदा रणजित पाटील यांना तब्बल ५५००० हजार मतांच्या फरकाने निवडून दिले, त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला म्हणजे काँग्रेस च्या संजय खोडके यांना भाजपमधले नेमके हेच अकोल्यातले नेते अगदी उघड मदत करीत असतांनाही…थोडक्यात एकही संधी धोत्रे आणि कंपूने सोडली नाही जेथे रणजित पाटील यांची छळवणूक किंवा अडवणूक झाली नाही मात्र त्याचवेळी रणजीत पाटलांनी वागण्यातली बोलण्यातली सभयता कधीच सोडली नाही. त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या घेतल्या थेट खासदाराचे घर गाठले, पाया पडून म्हणाले, संजयजी आपण बुजुर्ग आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, आपण विकासाचे कोणतेही काम सांगावे आणि मी ते ऐकावे, करावे असे सतत माझ्याकडून घडेल, तरीही द्वेषाचे राजकारण वाढत गेले आणि आता भाजपाचे नुकसान झाले तरी बेहत्तर, रणजित पाटलांची हकालपट्टी करण्यासाठी धोत्रे आणि कंपू रुसून फुगून बसला आहे..


अत्यंत बेजबाबदार वक्तव्य म्हणजे धोत्रे यांनी रणजित पाटीलांसंदर्भात बोलतांना, शिशुपालाचे शंभर अपराध भरले, असे उदगार काढले. केवढे हे गंभीर वक्तव्य, असे कोणते गुन्हे त्यांच्याकडून घडले कि पाटील शिशुपाल ठरले. कुठलेतरी शुक्लकाष्ठ मागे लावून द्यायचे नंतर त्यातून काही निघाले नाही म्हणून आदळआपट करायची, एखाद्या हिंदी मालिकेला शोभण्यासारखे हे वागणे…राज्याच्या मंत्र्याविषयी एकेरी उल्लेख करून मीडिया समोर अद्वातद्वा बोलणे, त्यातून निष्पन्न काहीही नाही, उलट धोत्रे यांची जनमानसातली प्रतिमा त्यातून झपाट्याने खालवण्याची दाट शक्यता आहे, 

तेच सत्य आहे….

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *