भारत भूषण पवारसाहेब : पत्रकार हेमंत जोशी

भारत भूषण पवारसाहेब : पत्रकार हेमंत जोशी 

धन यश प्रकृतिस्वास्थ्य राखता यायला हवे अन्यथा बर्फ जसा वितळतो तेच मनुष्याचे होते. सारे काही नजरेसमोर नष्ट होते. जुन्या जमान्यातला फिल्मी हिरो भारत भूषणला अल्पावधीत इतके मोठे यश मिळाले होते कि त्याकाळी इतर कोणाचीही औकात नसतांना हा पठया स्वतःच्या इंपाला मधून स्टुडिओमध्ये यायचा पण त्यालाही यश आणि पैसे राखता आले नाहीत, पुढे याच भारत भूषण यांना लहानसहान कामे करतांना मी आपल्या डोळ्यांनी गोरेगावच्या चित्रनगरीतल्या हिरवळीवर वाट पाहतांना बघितले आहे, अनेकदा भारत भूषण आमच्या पूर्वीच्या घराजवळ वर्सोव्याला त्याच्या मुलीकडे राहत असे आणि रिक्षेने ये जा करीत असे, अर्थात असे कित्येक भारत भूषण तुम्ही आम्ही सारेच पावलो पावली बघतो, बघत आलोय….

तिकडे दिल्लीत नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा तोडीस तोड नेता, शरद पवार असावेत, असा अंदाज अनेकांनी बांधला होता पण हळू हळू त्यांचे सततचे फक्त मुंबईतले अधिक वास्तव्य बघता, नजीकच्या काळात शरद पवार यांचा त्या अभिनेत्याप्रमाणे नेत्यां मधला ‘ भारत भूषण ‘ होतो कि काय वाटू लागले आहे कारण असा त्यांच्याकडे एकही नेता नाही ज्याला राष्ट्रवादी मधून कोलांटीउडी घ्यायची नाही, विशेषतः भाजपामध्ये जायचे आहे, मग ते बीडचे जयदत्त क्षीरसागर असोत कि प्रकाश सोळंकी, भायंदरचे कैदी गिल्बर्ट मेंडोन्सा असोत कि नव्या मुंबईतले गणेश नाईक, गुहागरचे भास्कर जाधव असोत कि विट्याचे जयंत पाटील, एकदा का जयंत पाटलांचा या वयातला हनिमून संपला कि ते लगेचच भाजपा किंवा काँग्रेस मध्ये जातील असे दिसते. जयंत पाटील सत्तेच्या जवळपास आलेत कि सांगेल जयंत पाटलांचा किंवा जालन्याच्या राजेश टोपे यांचा हनिमून, हि नेमकी काय भानगड आहे…..

धृतराष्ट्राने १०० नालायक मुलांना पैदा करण्याऐवजी १० लायक मुले जन्माला घातली असती तर धृतराष्ट्राला हयात असतानाच मुलांचा हा यातना देणारा संहार बघण्याचे दुर्भाग्य लाभले नसते. ज्याने पुढली पिढी नेमकी घडवली नाही त्याला हयात असेपर्यंतच नेमके सारे वाईट बघावे लागते, काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शरद पवार यांनी चार प्रफुल्ल पटेल मोठे करण्याऐवजी दोन आर आर पाटील, गिरीश गांधी, घडविले आणि वाढविले असते तर पवार दिल्लीत मोदींच्या तोडीचे आणि येथे राज्यात राष्ट्रवादीचे भवितव्य नेहमी उज्वल ठरले राहिले असते, ज्या नेत्याकडे या राज्याला चालणारी जात आणि लागणारा मुबलक पैसा आहे त्याचा नेता म्हणून भारत भूषण होतो कारण पक्षबांधणी करतांना पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या तोडीचे नव्हेत तर सुनील तटकरेंच्या संस्कार नसलेल्या पुढल्या पिढितलॆ नेते वाढविणे १२-१३ वर्षांपूर्वी अधिक सोयीस्कर वाटले. आदित्य योगिनाथ ज्यांच्यासमोर मच्छर ठरावा एवढी प्रचंड ताकद, अभ्यास, बुद्धिमत्ता शरद पवार यांच्याकडे सुरुवातीपासून 

आहे पण त्यांच्यातल्या नेतृत्वाला राक्षसी महत्वकांक्षेने घेरले, त्या नादात शरद पवार या देशाचे नरेंद्र मोदी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी 

वाजपेयी इत्यादी होता होता राहिले….

हसायला येते जेव्हा या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद किंवा देशाचे १५ वर्षे मंत्रिपद भोगुनही शरद पवार यांना त्यांच्या पंचतारांकित म्हणजे लॅव्हिश लाईफ जगणाऱ्या पक्षातल्या अजितदादांसारख्या सामान्य विचारांच्या नेत्यांबरोबर फुसकी पदयात्रा काढावी लागते. सतत ५५ वर्षे राजकारणात राहिलेले मुरलेले शरद पवार वास्तवात मोदी यांच्यासारख्या अनेक मातब्बरांना पिछाडीवर ठेवून जगप्रख्यात व्हावेत, आम्हा मराठींना मनापासून वाटत होते पण पवारांच्या येड्या भक्तांना फक्त हेच वाटत राहिले कि ते एक दिवस नक्की एकहाती सत्ता मिळवून मोकळे होतील. ज्यांनी हे राज्य लुटले त्या आघाडीच्या या राज्यातील माजी मंत्र्यांसंगे अपवाद पृथ्वीराज पाटील, पवार जेव्हा पंचतारांकित पदयात्रा पंचतारांकित सवयी लागलेल्या या नेत्यांबरोबर काढतात, सामान्य मराठी शेतकऱ्यांची हसून हसून पुरेवाट होते. पवारसाहेब, का म्हणून या अशा लुटारू नेत्यांसंगे पदयात्रेत सामील होता त्यापेक्षा नाना असो कि मकरंद किंवा अमीर खान, या लेकरांना छातीशी घ्या अन सांगा, मी आहे कि भरभक्कम तुमच्या पाठीशी, व्हा पुढे, मग बघा, मर्द मराठी पुन्हा एकवार तुम्हाला कसे डोक्यावर घेऊन नाचतात ते….

अपूर्ण :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *