संकल्प नवा ध्यास हवा : पत्रकार हेमंत जोशी

संकल्प नवा ध्यास हवा : पत्रकार हेमंत जोशी 

अमुक एखादा संकल्प सोडायला वयाची कोणतीही अट नसते. फक्त सोडलेल्या संकल्पावर ठाम राहायचे असते. नव्या वर्षात नवा संकल्प सोडूया, सोडलेल्या संकल्पावर ठाम राहूया. इगो, गर्व, लबाड वृत्ती हे तीन दोष सोडण्याचा संकल्प करून तर बघा, कारण हे तीन दोष तुम्हा आम्हा सर्वांना क्षणिक समाधान देणारे असतात पण पुढे हळूहळू हे दोष आयुष्यात नक्की अडचणी निर्माण करतात, भले भले त्यातून संपतात. जे पोटात आहे ते ओठावर आले म्हणजे मागाहून त्याचा त्रास होत नाही पण असे फार कमी व्यक्तींच्या बाबतीत घडते, अर्थात ओठावर आणणे म्हणजे घालून पाडून बोलणे असे होत नसते. हा देश लबाडांचा, फसविणाऱ्यांचा, म्हटल्या जाते, लबाडी न करता मोठे होता येते यावर निदान मराठी माणसाने तरी विश्वास ठेवायला हवा कारण त्याला सुसंस्कृत सुशिक्षित म्हटल्या जाते..


माझ्या सभोवताली मी असे कितीतरी नातेवाईक मित्र नेते पत्रकार अधिकारी बघितलेले आहेत जे त्याच्या चढत्या काळात इगो ठेवून जगले, गर्विष्ठ वृत्तीने वागले आणि सतत लांड्यालबाड्या करीत करीत मोठे झाले पण जेव्हा त्यांचा पडतीचा काळ आला किंवा मृत्यू समीप आला तेव्हा त्यांच्याजवळ कोणीही नव्हते, ते एकटे पडले तोपर्यंत स्वतः मध्ये बदल घडवून घेण्याची त्यांची वेळ देखील निघून गेली होती. असा पत्रकार मी अगदी जवळून बघितला आहे जेव्हा तो महत्वाच्या हुद्द्यावर होता त्याचे उर्मट बोलणे घालून पडून वागणे मुद्द्याचे फारसे नसायचे याउलट हा पत्रकार आता थेट गुद्यावर येतो कि काय त्याच्या उर्मट वात्रट भाषेतून बोलतांना ते जाणवायचे, अलीकडे तो मला त्याच्या निवृत्तीनंतर कुठल्याशा कार्यक्रमात भेटला, एकटाच कोपऱ्यात बसला होता कारण आता त्याच्या हाती काहीही उरलेले नव्हते त्यामुळे त्याची अवस्था शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखी झालेली बघून मलाच खूप वाईट वाटले…


मला सर्वाधिक राग येतो तो लबाड वृत्तीच्या लोकांचा म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली पद्धतीने वागणारी जी माणसे माझ्या रस्त्यात येतात, तेवढ्यापुरता मी शांत बसतो पण मोक्याच्या वेळी त्यांची लफडी काढून अमुक एक व्यक्ती कशी लबाड भ्रष्ट होती हे मी समाजासमोर नक्की आणतो. लबाड माणसांनीच या देशाचे वाटोळे करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे, ते पार पाडताहेत. माझा एक नातेवाईक मी फार आदर्श आहे, हे सांगून भासवून स्वतःला मिरविण्यात धन्य समजत असे किंबहुना मी कसा निर्व्यसनी हेही चित्र तो मोठ्या खुबीने रंगवीत असे ज्याचे उदाहरण मग हमखास आमच्या घरी दिल्या जात असे, मला माहित होते हा जे भासवतो तो तसा अजिबात नाही आणि नेमकी त्याची लबाडी एक दिवस सर्वांसमोर उघड झाली जेव्हा त्याचा दारू आणि बिअर पिण्याचा कोटा इतर बेवड्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. त्याची अपत्ये त्याची हि लबाडी निरखित होते, पुढे असे घडले कि ती अपत्ये त्यालाच आम्हा सर्वांसमोर चिअर्स करून पेगवर पेग रिचवायला लागली…

व्यसन कि मजबुरी हे पोटच्या मुलांना नेमके कळत असते म्हणजे जळगावला असतांना माझ्या घराच्या आसपास राहणाऱ्या कोल्हाटी समाजतल्या तरुण स्त्रियांच्या घरी येणारे त्यांचे मालक थेट लहानग्या मुलांसमोर नको नको ते चाळे करून मोकळे व्हायचे पण अशा नाचकाम करून पैसे मिळविणाऱ्या स्त्रियांची मजबुरी त्यांच्या चिल्यापिलांना लक्षात येत असे म्हणून त्यांच्यातली पुढली पिढी आज मोठ्या पदांवर विराजमान झाली पण गरज नसतांना जर एखादी तरुण स्त्री नवर्याच्या पश्चात यार ठेवून मोकळी होत असेल तर हे असे वागणे देखील मुलांच्या लक्षात येते आणि अशा आईवडिलांची मुले देखील पुढे 

वाममार्गाला लागलेली हमखास दिसतात…

पुन्हा एकदा नवं वर्षात संकल्प सोडूया, इगो ठेवून गर्विष्ठ होऊन आणि लबाडीने वागून न जगण्याचा. ज्यांच्या ठायी हे तीन दुर्गुण चिकटले, त्यांचा, प्रसंगी त्यांच्या पुढल्या पिढीचा विनाशकाल जवळ आलाय हे नक्की…

तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *