शिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी


शिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी 

या लॉक डाऊनच्या दिवसात राज्यातल्या अनेक मान्यवरांचे सूक्ष्म निरीक्षण करता करता असे लक्षात येते, जसे मंत्री उदय सामंत यांनी ज्या पद्धतीने दाढी वाढवली आहे बघून वाटते कि त्यांच्या प्रेयसीला महेश सामंत पळवून गेलाय कि काय ? अर्थात असे होणार नाही वाटल्यास उलट घडेल किंवा गृहमंत्री अनिल देशमुख असे काही तयार होऊन बाहेर पडतात कि त्यांना चार पाच ठिकाणी कांद्यापोह्यांचा कार्यक्रम आहे. मिलिंद नार्वेकर असे काही ड्रेसअप होऊन राज्यपालांना भेटायला गेले जणू काही नोकरीसाठी मुलाखत आहे. शरद पवार असे घरात बसले आहे जसे त्यांना शाळेतून काढून टाकले आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्यापद्धतीने यादिवसात बोलतात बघून वाटते कि त्यांची प्रेयसी जर्मनीत अडकली आहे आणि हे इकडे कासावीस होऊन तिच्याशी बोलताहेत. राधेशाम मोपलवार यांनी ज्यापद्धतीने भ्रमणध्वनी बंद करून ठेवलाय जसे काही किराणा दुकानदार उधारी वसुलीसाठी त्यांच्या मागे तगादा लावतो आहे. जेव्हा बघावे तेव्हा आमचे नेहमीचे उदाहरण  उदय तानपाठक स्वयंपाकात असे गर्क जणू जोशीकाकू दहा घरी जेवणाचे डबे पाठवतात. अजितदादा असे गायब जसा काही त्यांना नववा महिना लागलाय आणि कळा सोसत नाहीत. राजेश टोपेंचे बोलणे बघून व ऐकून वाटते कि यांची पाळी अद्याप आलेली नाही आणि पोटात तर दुखते आहे. भुजबळांचा चेहरा बघून तर असे वाटते रेशन दुकानदाराने आधार कार्ड रेशन कार्ड दाखवूनही त्यांना महिन्याचे रेशन भरून दिले नाही. उद्धव ठाकरे अधून मधून टीव्हीवर जे बोलतात बघून वाटते सिनेमातला शशी कपूर सुहाग राती नवोदित पत्नीला मनवतोय विनवतोय कि काही होणार नाही, जवळ ये ना…

काही दिवसांपूर्वी मी जेव्हा शिव भोजन थाळी संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच या खात्याच्या अधिकाऱयांना काही टॉन्ट्स मारले. त्यावर लगेच भुजबळांचा मला दोन वेळा फोन आला पण मी तो यासाठी घेतला नाही कि तुमचे त्यांच्याविषयी काहीही मत असो बट, आय रिस्पेकट भुजबळ. मला त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवरूनही वाद घालणे किंवा त्यांच्या तोंडोतोंडी येणे कदापिही शक्य नाही. भुजबळांचे आधी जे चुकले तीच चूक ते आजही करताहेत त्यांच्या सभोवताली अतिशय थर्ड ग्रेड लोकांचा गराडा असतो आणि एवढी मोठी अद्दल घडल्यानंतर आताही भुजबळ नेमकी तीच चूक पुन्हा करताहेत, पुन्हा एकवार त्यांच्या सभोवताली परदेशी सारख्या अतिशय वाईट वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी घेराव केला आहे आणि यावेळीही हे असे नालायक भुजबळांचा गैरफायदा घेऊन पुन्हा एकवार त्यांना प्रचंड बदनाम करून बाजूला होतील, वाईट फळे मग भुजबळ यांनाच भोगावी लागतील ज्याची मला काळजी भीती चिंता वाटते. राज्याचे एक बुजुर्ग सीझन्ड बॅलन्स्ड सचिव महेश पाठक यांचाही मला त्या लिखाणासंदर्भात फोन आला, आणि याच शिवभोजन थाळी संदर्भात मला येथे काही सांगायचे आहे…

महेश पाठक असे म्हणालेत कि जर रेल्वेच्या खानपान विभागाने आम्हाला म्हणजे महाराष्ट्र शासनाला शिवभोजन थाळी संदर्भात ऍप्रोच केला तर आम्ही नक्की त्यांचे प्रपोजल विचारात घेऊ. यावर माझे असे शासनाला भुजबळांना सांगणे आहे कि त्यांच्या ऍप्रोचची वाट कशाला ती बघायची, पियुष गोयल तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत आणि केंद्रात रेल्वे मंत्री आहेत, थेट गोयल यांना जरी कोणीही सूचित केले तरी ते महाराष्ट्र शासनाचे हे काम क्षणार्धात करून मोकळे होतील म्हणजे आज जी शिवभोजन थाळी शासनाला खाजगी कंत्राटदारांकडून ५० रुपयात मिळते आहे उगाच फार मोठा भुर्दंड शासनाला पडतो आहे उद्या जर अधिक दर्जेदार शिवभोजन थाळी केवळ १५ रुपयात उपलब्ध झाली तर महाराष्ट्र शासनाचे कितीतरी पैसे वाचतील पण असे काहीही दूरदूरपर्यंत घडतांना दिसत नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या शिवभोजन थाळ्या राज्यात कुठे केव्हा किती वाटप केल्या जातात त्याचा थांगपत्ता नेमका हिशेब जनतेला लागलेला नाही, लोकांसमोर आला नाही. विशेषतः विविध वाहिन्यांना जर शासनाने नेमकी माहिती दिली तर त्यांचे प्रतिनिधी शिवभोजन थाळी वाटप होतांनाची दृश्ये जनतेला दाखवून मोकळे होतील. शिवाय अनेकांना जो संशय आहे कि थाळ्या समजा पंचवीस हजार वाटल्या गेल्या तर कागदोपत्री त्या किमान एक लाख वाटल्या गेल्या असे कानावर पडते, त्यातले कंत्राटदारांचे लुबाडणे आणि लागेबांधे नेमका त्यावर प्रकाशझोत पडेल. दूध का दूध पानी का पानी पद्धतीने नेमके सत्य जर जनतेसमोर आले तर भविष्यात शासनाकडे संशयाने पाहिल्या जाणार नाही, बघा कसे जमते ते…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *