मराठ्यांच्या व्यथा आणि सत्य कथा : पत्रकार हेमंत जोशी

मराठ्यांच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे सकाळ दैनिकाचे बुजुर्ग आणि पत्रकार श्रीराम पवार यांना दिलेली मुलाखत अतिशय गाजली, अत्यंत सावध राहून दिलेली ती मुलाखत होती. मधुचंद्राच्या राती लग्नाआधी विविध प्रेमप्रकरणात कसलेले तरुण व तरुणी कसे अत्यंत सावध राहून हा कसा पहिलाच अनुभव मोठ्या खुबीने एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात ते तसे मुख्यमंत्र्यांनी जनतेला म्हटल्यापेक्षा मराठ्यांना पटवून देण्याचा तो त्यांचा प्रयत्न होता असे म्हटल्यास त्यात वावगे ठरणार नाही पण या अशा मुलाखतीची अद्याप अजिबात गरज नव्हती असेही वाटते. मराठयांचा मोर्चा नेमका कोणाविरुद्ध हे जरी त्यांच्या नेमके लक्षात आले असते किंवा आणून दिल्या गेले असते तरी त्यांनी सदर मुलाखत देण्याची घाई केली नसती. अहो जे मराठे सारे मोर्चे भगवा झेंडा खांद्यावर घेऊन काढताहेत ते का म्हणून सत्तेवर असलेल्या भगव्या मुख्यमंत्र्याला विरोध करतील. माझे तर स्पष्ट मत आहे कि मराठ्यांचा हा मोर्चा त्यांच्याच समाजातल्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या केवळ मतांसाठी मराठयांना कायम वापरून घेणाऱ्या नेत्यांविरुद्ध अधिक आहे. मराठे, फडणवीस आणि त्यांच्या भगव्याला अजिबात कंटाळलेले नसून, खबरदार यापुढे आम्हाला केवळ मतांसाठी वापरून घ्याल तर, हा इशारा तमाम स्वार्थी आणि पुरोगामी मराठा नेत्यांनाच देण्यासाठी हे लाखांचे मोर्चे जागोजाग उत्स्फूर्त स्वयंस्फूर्त काढण्यात येत आहेत आणि तीच वस्तुस्थिती आहे…

जेव्हा आमच्यातल्या एखाद्या पत्रकाराला अमुक एखाद्या बातमीची कुणकुण देखील लागलेली नसते तेव्हा ती बातमी माझ्याजवळ तयार असते, केवळ वर्षानुवर्षे वैक्तिक संबंध, त्यातून हे घडते. पुढे जाऊन सांगतो, या राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातले प्रत्येक क्षेत्रातले विशेषतः शासन प्रशासन किंवा राजकारणातले जे दिग्गज आहेत, त्यातल्या कोणाचेही नाव मला सांगा, पुढल्या दोन दिवसात माझ्याकडे नाव सांगितलेल्या माणसाची तंतोतंत माहिती आली नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका वाटल्यास शक्ती कपूर म्हणा, रावण म्हणा, संजय घरत म्हणा, दुष्ट म्हणा, अविनाश भोसले म्हणा, प्रकाश मेहता म्हणा वाट्टेल ते म्हणा. या अशा हाती आलेल्या माहितीतुन मी तब्बल सहा महिन्यांपूर्वी भाजपा नेत्यांना वारंवार कधी प्रत्यक्ष तर कधी लिखाणातून सांगत होतो कि तुमच्याकडे सारे आहे पण सक्षम लोकप्रिय धुरंधर मान्यवर लोकमान्य समाजप्रिय मराठा नेतृत्वाची वानवा आहे. कोकणात आणि मुंबईत विनोद तावडे, मुंबईत आशिष शेलार आणि विदर्भात भाऊसाहेब फुंडकर इत्यादी चार दोन नावे सोडल्यास अद्याप मराठा समाज ज्याच्या नेतृत्वाला सलाम ठोकेल असे नेते नक्कीच भाजपाकडे नाहीत.अत्यंत महत्वाचे म्हणजे कोणत्याही पक्षात त्या त्या नेत्यांना त्या त्या जातीचे नेते म्हणून ओळखल्या जाते म्हणजे अबू आझमी असोत बाबा सिद्दीकी इत्यादींना मुसलमानांचे नेते म्हणून, रामदास आठवले प्रकाश आंबेडकर नवबौद्धांचे किंवा जयदत्त क्षीरसागर, चंद्रशेखर बावनकुळे तेली समाजाचे छगन भुजबळ माळ्यांचे किंवा मुंडे कुटुंब वंजारी समाजाचे पुसदचे नाईक घराणे बंजाऱ्यांचे जळगावचे सुरेशदादा किंवा नागपूर मलकापूरचे संचेती मारवाड्यांचे इत्यादी अनेक नेते त्या त्या जातीचे नेते म्हणून ओळखले जातात पण ‘ होय मी मराठ्यांचा नेता आहे ‘ असा आवाज आजतागायत ते शरद पवार असोत कि पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असोत कि दिवंगत विलासराव देशमुख, अनिल देशमुख असोत कि दत्ता मेघे, रावसाहेब दानवे असोत कि राजेश टोपे, विखे पाटील घराणे असो कि बबनराव पाचपुते, कोकणातले भास्कर जाधव असो कि खासदार अनंत गीते,आजतागायत ज्या वाक्याची वाट तमाम मराठा समाज आजपर्यँत पाहत होता, त्यांचे कान ज्या वाक्यासाठी आसुसलेले होते, सत्ता पदे आणि भरभक्कम पैसे केवळ सामान्य मराठ्यांच्या भरवशावर मिळविणाऱ्या एकही मराठ्याने आजपर्यंत जाहीर सांगितले नाही कि होय मी मराठ्यांचा नेता आहे. एकदा केव्हातरी प्रमोद हिंदुराव तेही खाजगीत म्हणाले होते कि मी मराठ्यांचा नेता आहे पण प्रमोद हिंदुराव यांना तुम्ही नेता म्हणत असाल तर अलोकनाथ यास सिनेमातला गाजलेला सोलो हिरो म्हणून मोकळे व्हा किंवा दीपक पराशर यास उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन मोकळे व्हा. भगवा हाती घेऊन होय मी मराठ्यांचाच नेता असे जेव्हा या राज्यातला शरद पवार यांच्यासारखा कोणताही मान्यवर नेता सांगून मोकळा होईल, पुन्हा असे मोर्चे काढण्याचा प्रश्न मराठयांना येणार नाही. यानिमीत्ते नारायण राणे यांचा उल्लेख येथे आवश्यक वाटतो, अगदी उघड, मराठ्यांची अलीकडे बाजू घेणारे ते एक नेते पण केवळ स्थान टिकविण्यासाठी हि धडपड, अशी टीका त्यांच्यावर होते, त्यांनी किमान एकदा तरी जाहीर सांगून मोकळे व्हावे, होय, मी फक्त आणि फक्त मराठ्यांचा नेता, त्यांना अशा उघड भूमिकेचा नक्कीच राजकीय फायदा होईल, गर्दी त्यांच्या सभोवताली पुन्हा एकवार जमा होईल, हे निश्चित. एक बरे झाले एकदाचे कि भय्यू महाराज यांनी सांगून टाकले कि होय मी मराठ्यांचा बुवा बाबा महाराज आहे. परमेश्वर आणि सामान्य मराठा यांच्यात दुवा साधणारा असा एखादा बुवा देखील या समाजाची गरज होती थोड्या अल्प प्रमाणात का होईना भय्यू महाराज यांनी ती पूर्ण केली आहे. 

अधिक चांगले वर्तन ठेवून जर भय्यू महाराज यांनी आपले तमाम आयुष्य या समाजाच्या भल्यासाठी अगदी उघड खर्च केले तर नक्कीच अगदी त्यांच्या हयातीत देखील मराठा समाज त्यांची मंदिरे बांधून मोकळा होईल जसे अमिताभचे मंदिर कलकत्याला आहे. आणखी एक नाव येथे घ्यायचे झाल्यास बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे घेता येईल. महत्वाचे गुपित येथे फोडतो, या राज्यातल्या दिल्लीशी संबंधित नसलेल्या फक्त दोन तीन नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट फोन येतो, आणि फोन आल्यानंतर वेळेचे भान विसरून नरेंद्र मोदी ज्यांच्याशी बोलतात गप्पा मारतात त्यात अर्थात एक आहेत, त्यांचे अतिशय लाडके आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीमान चंद्रकांत पाटील. अगदी परवा परवा देखील मराठ्यांच्या मोर्चाची इत्यंभूत माहिती पंतप्रधानांनी फक्त या दोन नेत्यांशी बोलून घेतली, अर्थात त्यांचे अधून मधून आशिष शेलार यांच्याशी देखील बोलणे होते पण ते बोलणे मुंबई अध्यक्ष म्हणून असते, अजिबात वैयक्तिक नसते. कार्यालयातल्या कानडे कुलकर्णींच्या भरवशावर मंत्रिपद पुढे न हाकता चंद्रकांत पाटील यांनी अद्याप न टाकलेला नेमका प्रभाव मंत्री म्हणून टाकला तर नेतृत्वात झटपट भरारी घेण्याचा विश्व विक्रम नक्कीच त्यांच्या नावाने गिनीज बुक मध्ये नोंदल्या जाईल पण त्यासाठी त्यांनी बावळट नव्हे तर साधे सरळ मंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याची त्वरेने गरज आहे. 25 वर्षानंतर जरी एखादा माणूस शरद पवार किंवा भय्यू महाराज यांना गर्दीत दिसला तरी ते त्या माणसाला नावानिशी जवळ बोलावून त्याची आस्थेने चौकशी करतात, आणि चंद्रकांत पाटील जर भाजपा मधल्या भेटायला आलेल्या एखाद्या मान्यवर नेत्याला किंवा आमदाराला विचारात असतील कि आपण कोण, अशावेळी ह्या अशा मान्यवरांना चंद्रकांत पाटलांसमोरच धाय मोकलून हंबरडा फोडावा वाटतो म्हणून पोटतिडकीने सांगतो, भेटायला आलेले किंवा येणारे नेमके कोण आणि किती महत्वाचे हे जोपर्यन्त चंद्रकांत पाटलांना त्या देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांच्यासारखे तोंडपाठ होत नाही किंवा मी बावळट नाही साधा आहे हे ते जोपर्यंत प्रूव्ह करीत नाहीत, भेटणार्यांचे त्यांना भेटल्यानंतर पॉट धरून धरून हसणे थांबणार नाही. चंद्रकांत व्यक्ती म्हणून उत्कृष्ट प्रतिमेचे नेते म्हणून मान्यताप्राप्त आहेत पण जवळ नेमकी कोणती चांगली माणसे बाळगायची कि स्वतःचा ‘ एकनाथ खडसे ‘ करून मोकळे व्हायचे हे तातडीने त्यांनी ठरवून त्यादिवशेने पावले टाकल्यास चंद्रकांत कुठल्या कुठे निघून जातील. अमुक एखाद्या स्मृती गेलेल्या माणसाचे कसे अगदी घरातल्यांना ओळखतांना देखील होते ते तसे चंद्रकांत पाटलांचे होते तरीही त्यांना त्यांच्या घरातले बदाम किंवा बदामाचा साजूक तुपातला शिरा खाऊ घालायला तयार नाहीत आणि हे असेच त्यांच्याबाबतीत घडत राहिले तर हेच चंद्रकांत नेमके भाऊबीजेला बायकोसमोर पाट घेऊन ओवाळून घेण्यासाठी बसतील. एकेकाळी विद्यार्थी नेता म्हणून चंद्रकांत पाटील जळगावला माझ्या मित्राकडे मुक्कामाला असायचे मी पण एका राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्याशी कित्येक तास गप्पा मारत असे, आज जेव्हा केव्हा पाटलांना भेटतो त्यांच्या कानाला जणू कडकडून चावा घेऊन सांगावे लागते, मी पत्रकार हेमंत जोशी, जुनी ओळख सांगून नक्कीच उपयोग नाही म्हणून पत्रकार आहे असे सांगतो….

यातला गमतीचा भाग सोडा पण फडणवीस यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांना भाजपमध्ये फार वरचे आणि मानाचे स्थान आहे त्यांनी आपल्या लोकप्रिय प्रतिमेचा संधी मिळतेय तोपर्यंत उपयोग करून घ्यायला हवा अन्यथा अत्यंत सावध निर्णय घेत शिक्षण मंत्री विनोद तावडे त्यांच्या पक्षात फडणवीसनंतरचे स्थान मिळविण्यात व्यस्त आहेत आणि त्यांच्यासाठी तो दिवस फार दूर नाही. मराठा असण्याचा अधिक फायदा त्यातून विनोद तावडे यांना मिळेल असे आज तरी नव्याने चित्र निर्माण होते आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *