एका लग्नाची गोष्ट : पत्रकार हेमंत जोशी

एका लग्नाची गोष्ट : पत्रकार हेमंत जोशी 


पैशांचे नियोजन, आपल्याकडे जे काय थोडे बहुत आहे त्याचा आनंद घेणे, इतरांनाही देणे, हाती घेतलेल्या कामांचे नियोजन करणे, वेगळे काहीतरी करून दाखविणे, अमुक एखाद्यासाठी मी तमुक केले आहे हे शक्यतो बोलून न दाखवणे, शत्रू असो कि मित्र, राग तेवढ्यापुरता, लगेच विसरून जाऊन सर्वांविषयी ममत्व बाळगणे, ज्यांच्याशी ओळखी आहेत त्या सर्वांना कायम वाटत राहावे कि हा माणूस जणू आपल्या घरातला एक सदस्य आहे, या अशा काही गुणांच्या भरवशावर मी जगात आलो आहे, मुलांनीही तसेच जगावे त्यांना सांगत आलो आहे, त्यामुळेच अलीकडे थेट दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपुरात पार पडलेला मुलाचा विवाह त्यानंतर ३ ऑक्टोबरला येथे मुंबईत ठेवलेला स्वागत समारंभ या दोन्ही कार्यक्रमांची राज्यभर चर्चा झाली, चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे लग्न ठरल्यानंतर आमच्या हाती केवळ ३०-४० दिवस होते त्यात प्रचंड पाऊस आणि पितृपक्ष पण या साऱ्या अडचणींवर मात करत हा दिमाखदार सोहळा परमेश्वर कृपेने यथासांग पार पडला…

याचे सर्वाधिक श्रेय जाते ते अर्थात पत्रकार विक्रांतला, माझ्या अति उत्साही मुलास आणि त्याच्या तीन मित्रांना, या चौघांनी हे कार्य कमी पैशात छान पार पडले कारण विक्रांत व्यतिरिक्त तिघेही मला विक्रांत सारखेच होते, अगदी घरातले होते. पार्ल्यातल्या सुप्रसिद्ध तोसा या उपहारगृहाचा मालक आणि या देशातील अग्रणी तृप्ती कॅटरिंगचा संचालक मिथुन सूचक तसाही जोशी कुटुंबीयांचा लाडका त्यामुळे विनीत चे लग्न हे त्याच्या घरातले कार्य होते, त्यामुळेच स्वागत समारंभ जमलेल्या लहान थोर सर्वांच्या मनात कौतुकाचे बाण रुतवून गेला. तेथे असलेला प्रत्येक पदार्थ हा जणू फक्त आपल्यासाठी तयार केला आहे हे प्रत्येकाला वाटत होते, विशेष म्हणजे तो स्वागत समारंभ वाटत नव्हता, वाटत होते एकाच कुटुंबाचे एकत्र जमणे, होय, दिवाळी आधीच सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. प्रशासकीय अधिकारी, शासकीय 

अधिकारी, मंत्रालय, नेते, मंत्री, पत्रकार, उद्योगपती या सर्वांच्या रांगेत आज आपणही, हे आमच्याकडे आलेल्या लग्नातील आणि स्वागत समारंभातील सर्वसामान्य पाहुण्यानाही वाटत होते, सारे देहभान विसरून आनंद घेत होते…


नागपुरातल्या नानिवडेकरांनाही महिनाभरापासून हेच वाटत होते कि विनीतचे हे शुभ कार्य आपल्या घरातलेच आहे आणि ते तसेच तयारी करीत होते. बघा जे केटरर असतात, त्यांच्यासाठी लग्न उरकणे हि नित्याचीच बाब असते पण मिथुन आणि नानिवडेकर कुटुंबाला तसे न वाटणे हे आमचे भाग्य आहे, होते. विशेष म्हणजे लग्नासाठी जे जे लागत होते, त्यातली सारी महान मंडळी हे तर आपल्या कुटुंबाचे एक सदस्यच आहेत, हे या विवाहानिमित्ये आमच्या लक्षात आले म्हणजे कपडे शिवणे असोत कि मुंबई ते नागपूर प्रवासाचे नियोजन असो, असे एकही क्षण जाणवले नाही कि आम्ही कुठे एकटे आहोत किंवा आमचे अमुक एका क्षेत्रात घराचे संबंध नाहीत. सर्वांनी आमच्या कडल्या लग्नपत्रिका म्हणे संग्रही ठेवल्या आहेत, या पत्रिका देखील घडवतांना या राज्यातल्या एका नामवंत कुटुंबाची म्हणजे कालनिर्णय चे जयराज साळगावकर आणि त्यांच्या गुणवान बुद्धिमान कन्येची शक्ती साळगावकर यांची मोठी मदत झाली. विशेष म्हणजे द ग्रेट साळगावकर दाम्पत्य वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी चक्क रांगेत उभे होते. किंवा काँग्रेस मधले खऱ्या अर्थाने गांधी, श्री उल्हासदादा पवार थेट पुण्याहून आले होते. कोणी काहीही आणू नये आणि कोणालाही काहीही द्यायचे नाही हे आमचे आधीच ठरलेले होते तरीही काही मंडळींच्या बाबतीत नाईलाज झाला. आमच्या फिरोज खान नामक मित्राने विनिताला गणपतीची सुबक मूर्ती दिली आणि श्रीमान पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्याला काही दुर्मिळ पुस्तके दिलीत, हे असे न विसरता येणारे प्रसंग. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जवळून बघणे हे एखाद्या हिरोला बघण्यापेक्षा कमी नसते, एवढी त्यांची या समाजात क्रेझ असते, येथे त्यांना जवळून बघणे सहज शक्य झाले, पत्रकार एखाद्या पत्रकाराच्या विवाह सोहळ्याला फारसे जाणे पसंत करीत नाहीत, येथे तसे घडले नाही, पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार, मोठा आनंद देऊन गेले. प्रख्यात पत्रकार अशोक वानखेडे थेट दिल्लीवरून आले, भेटले आणि पुन्हा त्याच पावली दिल्लीला निघून गेले, डोळ्यात आनंदाश्रू दाटले, चला, माणसे छान जोडल्या गेलीत. प्रशांत बाग म्हणालेत, गिरीश महाजन यायला विसरले होते, घेऊन आलो, हे असे प्रेमापोटी घडते किंवा राज ठाकरे यांचे स्वागत समारंभाला येणे त्याचे क्रेडिट माझा आवडता 

पत्रकार उदय तानपाठक यास द्यायलाच हवे…


नागपुरातही, मुख्यमंत्र्यांची केवढी मोठी क्रेझ, ते जेव्हा आशीर्वाद द्यायला नागपुरात व्यासपीठावर आले, जमलेला असा एकही व्यक्ती लहानांपासून तर थोरांपर्यंत नसावा, ज्यांनी त्यांचे फोटो काढले नाहीत. विशेष म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांसंगे मुक्तपणे फोटो काढू दिले, वेळ दिला. अविस्मरणीय सोहळा दिमाखात पार पडला, काहींना घाईगर्दीत निमंत्रण द्यायचे राहून गेले, ते मात्र मनाला खटकले, त्यांची माफी मागतो. आयुष्यात सहजगत्या सहज मिळत असते, ओरबाडून, डावपेच खेळून काहीही मिळवायचे नसते, मग मित्र आपोआप जोडल्या जातात, अशा शुभ प्रसंगी मग हि मित्रांची श्रीमंती उपभोगायला मिळते. कर्क रोगाशी सामना करणारे प्रदीप भिडे आणि त्यांच्या पत्नी किंवा त्याच रोगाशी सामना करणाऱ्या उद्योगपती प्रणेश  धोंड यांच्या पत्नी त्रास बाजूला ठेवून सजून धजून येतात, जमलेल्या सर्वांचे आभार कसे मानावेत, शब्द सुचत नाहीत. ऐन दसऱ्याच्या दिवशी, तब्बल ३००-३५० कुटुंबे, तेही नागपूरला लग्नाला येतात, तेही दसरा हा मोठा सण बाजूला ठेवून, मी कसे आभार व्यक्त करू, शब्द नाहीत…


आमचे भाचे पत्रकार विशाल राजे आणि माजी पत्रकार ऍडव्होकेट जयेश वाणी या दोघांनी विवाह सोहळ्याचे केलेले वर्णन सदैव स्मरणात ठेवावे असे, त्यांचे मनापासून आभार, ज्या अनेकांनी तोंडभरून कौतुक केले त्यांचेही शतश: आभार…


ना हुंडा ना कसली देवाण घेवाण, त्यामुळे मुलीकडले खुश होते. मुलीच्या आई वडिलांना लुटायचे, त्यांना कर्जबाजारी करून सोडायचे, आम्हाला ते ना आधी जमले ना यावेळी, मुलाकडल्यांनी हे असेच धोरण राबवावे, मला मनापासून वाटते, शक्यतो साध्या सरळ सामान्य घरातल्या मुलींना मोठ्या घरच्या मंडळींनी सून करून घ्यावे असे आवाहन मी यानिमीत्ते सर्वांना करतो…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *