पवारांचे पॉलिटिक्स १ : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे पॉलिटिक्स १ : पत्रकार हेमंत जोशी 

त्यांनी जे छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांचे केले म्हणजे जसे धिंडवडे या दोघांचे काढले ती तशी वेळ आली असती तर त्यांनी सुप्रिया सुळे यांचे देखील ते तसेच हाल केले असते. आणि हे असे शरद पवार जेव्हा जेव्हा ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत वागले ते चुकीचे वागले असे अजिबात वाटत नाही. मी जे प्रमोद महाजन यांच्याविषयी मुलुंडला वामनराव परब यांना त्यांच्या घरी गप्पांच्या ओघात म्हणालो होतो, तेच पवार आणि फडणवीस यांच्या बाबतीत आवश्यक असते त्या सर्वांना सांगतो किंवा प्रमोद महाजन जिवंत असेपर्यंत भाजपातल्या विविध वामनरावांना म्हणजे महाजनांशी पंगा घेऊ बघणार्यांना मी हेच सांगत असे कि तुम्हाला महाजनांचे नेतृत्व आवडो अथवा न आवडो त्यांच्याशी पंगा घेणे म्हणजे स्वतःचा वामनराव परब करवून घेणे आहे, त्यात दोष महाजन यांचा होता किंवा आज पवार फडणवीसांचे चुकते आहे असे मला अजिबात वाटत नाही, सदासर्वदा स्वतःला नेते म्हणवून घायचे असेल, राजकारणातले आपले अस्तित्व महत्व टिकवायचे असेल तर हे असे महाजन पवार फडणवीसांसारखे वागायचे असतेच असते किंवा वागावे लागते..


पुन्हा एकदा ती म्हण, गाढवाच्या मागून आणि ताकदवान नेत्यांच्या पुढून जायचे नसते माणसाने चंद्रशेखर बावनकुळेंसारखे द्रौपदीच्या भूमिकेत शिरायचे असते म्हणजे नितीन गडकरी हे बावनकुळे यांच्यासाठी त्यांचे लाडके आवडते अर्जुन असतील तर देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासाठी भीम आहेत, म्हणून त्यांचे मंत्री म्हणून चांगले सुरु आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही तसे भाजपमधले आजचे बावनकुळे आणि इतिहासातली द्रोपदीच आहेत त्यांचेही ते तसेच सुरु आहे म्हणजे ते एकाचवेळी गडकरी यांना लाडाने मिठीत घेतात आणि फडणवीसांना अतिशय प्रेमाने म्हणाल तर खुबीने मुठीत ठेवतात म्हणून त्यांचेही छान सुरु आहे…


मला या राज्यात आयुष्याच्या अखेरपर्यंत अमुक एका टोळीचा सरदार म्हणून जगायचे आहे हे जेव्हा एखादा नेता मनाशी ठरवतो त्या नेत्याने शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवणे अतिशय आवश्यक ठरते. जर सुप्रिया सुळे नामें पोटच्या पोरीने जरी अजितदादा किंवा भुजबळ यांच्या सारखे पवारांशी पंगे घेतले असते तरीही पवारांनी तिलाही माफ केले नसते आणि माफ करायचे नसतेही. मी सोडून भुजबळांना त्यावेळी कोणीही सांगितले नाही कि शरद पवारांपेक्षा मी आणि माझी महात्मा फुले समता परिषद मोठी आहे, हे असे वागणे अयोग्य आहे, योग्य नाही.पुढे काय घडले इतिहास ताजा आहे, भुजबळ तुरुंगात आहेत आणि समता परिषदेचे नामोनिशाण देखील दूरदूरपर्यंत दिसत नाही…


भुजबळांच्या उरल्या सुरल्या नाशिक मधल्या पाठीराख्याचे देखील तिकीट पवार यांनी कापले आहे, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेसाठी भुजबळांचे उरले सुरले समर्थक जयंत जाधव यांना उमेदवारी न देता जखमेवर मीठ चोळावे तसे राष्ट्रवादीत घडले आहे, भुजबळांच्या बाबतीत घडले आहे, जयंत जाधव यांनी मागल्यावेळी शिवसेनेच्या ज्या उमेदवाराला पराभूत केले होते त्या शिवाजी सहाणे यांना आधी राष्ट्रवादीत घेतल्या गेले आणि त्यांची विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करून शरद पवार मोकळे झाले आहेत. केवळ भुजबळ यांचे खंदे समर्थक होते म्हणून दुसरे एक इच्छुक दिलीप खैरे यांचेही नाव मागे पडले आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *