फडणवीस आडनावाची मिसळ २ : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीस आडनावाची मिसळ २ : पत्रकार हेमंत जोशी 

देशी दारूचा अड्डा तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठी साक्षात मृत्यूचे आमंत्रण असतो पण तोच अड्डा त्याच्या मालकांसाठी उत्पन्नाचे साधन असते. जगभरात फिरतांना मी हमखास रात्रीचे काही तास त्या त्या देशातल्या कसिनोज मध्ये काढतो, थोडेफार पैसे देखील जिंकतो, इतर मात्र कोणीही तेथे जिंकताना दिसत नाहीत उलट असे कितीतरी ग्राहक रात्री कॅसिनो मध्ये पैसे गमावल्यानंतर आणि सकाळी त्यांची नशा उतरल्यानंतर अक्षरश: वेड्या माणसागत रडतांना ओरडताना मी बघितलेले आहेत पण हेच कसिनोज त्यांच्या मालकांना मात्र कोट्याधीश करून सोडतात. सोशल मीडियाचे देखील असेच आहे, फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडिया ने विशेषतः भारतीयांना वेडे करून सोडलेले आहे, आपला अमूल्य वेळ जे भारतीय विनाकारण सोशल मीडियावर खर्च करून आपले आयुष्य खराब करून घेतात तोच सोशल मीडिया माझ्यासाठी मात्र वरदान ठरलेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेक असंख्य बहुसंख्य पत्रकार जगातल्या वाचकांसमोर गेलो आहोत, पोहोचलो आहोत…


माझ्या फेसबुक वर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंगे अगदीच अलीकडे काढलेला फोटो अपलोड केला आहे. अमुक एखाद्या मोठ्या व्यक्तीसंगे फोटो काढणे मला फारसे आवडत नाही, असे फोटो काढणे मी टाळतो पण फडणवीसांसंगे फोटो काढण्याचे आदेश त्यांना अलीकडे भेटण्यापूर्वी मला दोघांनी दिलेले होते कारण त्या दोघांचेही हे मुख्यमंत्री लाडके आहेत, आश्चर्य याचे वाटते कि ज्या दोघांनी फोटो काढण्याचे आदेश दिले होते त्यांना राजकारणातले ओ का ठो कळत नाही मात्र एखादा फिल्मी हिरो जसा अनेकांचा जीव कि प्राण असतो ते तसे त्या दोघांमध्ये मला दिसले त्यापैकी एक तर चक्क माझ्या घरातला वय वर्षे सहा, एक चिमुकला होता आणि दुसरी व्यक्ती आमच्या व्यवसायात काम करणारी अगदी साध्या घरातली तरुणी होती, माझ्या फोनवर बोलण्यातून त्या तरुणीला कळले कि मी मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालोय, मग तिने मी तिचा बॉस असतांनाही तमा न बाळगता मला सांगितले, सर, तुमचा मुख्यमंत्र्यांबरोबर एक फोटो प्लिज. आणि मी त्या दोघांचे हट्ट पूर्ण केले, सुदैवाने मुख्यमंत्री प्रसन्न मूड मध्ये होते, मी संधी साधली..वर्ष बंगल्यावर म्हणजे त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, अजिबात सुदैवाने भेटणाऱ्यांची गर्दी नव्हती. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या केबिनमध्ये यायला थोडा अवधी होता, फार मोठ्या हिंदी फिल्मी हिरोशी ते बोलत बसलेले आहेत, मला कळले. आम्ही दोघे तिघेच त्यांना भेटणारे होतो, मग मी माझ्या समोरच बसलेल्या एका सुटाबुटातल्या श्रीमंत खानदानी बांधकाम व्यवसायिकाकडे मुद्दाम मोर्चाचे वळविला, त्यांना माझा परिचय करून देत म्हणालो, मी पत्रकार हेमंत जोशी, ते म्हणाले मी तुम्हाला फार छान ओळखतो तुमच्या चिरंजीवांना पत्रकार विक्रांत जोशी यांना देखील ओळखतो, मुंबईतल्या बड्या उद्योगपतींमध्ये बड्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये तुम्हा दोघांविषयी फार चांगल्या बोलल्या जाते…


पुढे ते म्हणाले, मला हेही माहित आहे कि नरिमन पॉईंट च्या दलामल टॉवर्स मध्ये नवव्या माळ्यावर तुमचे स्वतःच्या मालकीचे ऑफिस आहे आणि हो, माझे ऑफिस पाचव्या माळ्यावर आहे. आणि त्यांनी आपणहून मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले, त्यांच्या भ्रमणध्वनी मध्ये माझा आणि विक्रांत चा क्रमांक मुद्दाम टिपून घेतला, ते द ग्रेट व्यवसायिक होते, डॉ. निरंजन हिरानंदानी. आणखी काही गप्पा झाल्या, तेवढ्यात त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, आपण ज्या मोठ्या लोकांना अनेकदा केवळ दुरून बघत असतो, ते देखील जेव्हा आपल्याला ओळखतात, हे श्रेय त्या पत्रकारितेला ज्यामुळे हे असे भाग्य लाभते, वाट्याला येते…


मी त्यांना गप्पांच्या ओघात हेही म्हणालो कि उद्योगपती जयंत म्हैसकर भाग्यवान आहेत कारण प्रत्येकाचे स्वप्न असते कि पवईच्या हिरानंदानी गार्डन मध्ये आपले शॉप असावे, म्हैसकरांचे, अरोमाज हे कॉफी शॉप तेथे मोक्याच्या ठिकाणी आहे, राहुल नामें आमचे तिसरे ( मानलेले) आवडते चिरंजीव मुंबईतल्या सुप्रसिद्ध कॉफी बाय डि बेला चे म्हणाल तर सर्वेसर्वा आहेत, मी डॉ. निरंजन हिरानंदानी यांना नेमके तेच म्हणालो, राहुल चे हे स्वप्न आहे कि हिरानंदानी गार्डन मध्ये डि बेला असावे, आणि मला खात्री आहे तो त्याचे, आमचे स्वप्न नक्की एक दिवस प्रत्यक्षात उतरवेल. माझ्या या कौतुक वाक्यांवर त्यांनी दिलखुलास दाद दिली..


मनात हाच विचार अनेकदा येतो, लहानपणापासून तर आजतागायतच्या मेहनतीला परमेश्वराने चांगली साथ दिली आणि मराठींनी मनापासून दाद दिली म्हणून निदान आजपर्यंत तरी मस्तीत जीवन जगता आले…

क्रमश:


 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *