नरेंद्र पॉवर : कल्याणकर कल्याणकर : पत्रकार हेमंत जोशी
आमदार त्यातले काही विधान परिषद सदस्य असतील किंवा विधानसभा सदस्य, फक्त आणि फक्त राजकीय पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या ३९ वर्षातले बहुतेक सारे आजी माजी आमदार एकतर मित्र होते किंवा ओळखीचे तर नक्की झाले, होते. काही आठवतील काही आठवणारही नाहीत पण या साऱ्यांमध्ये मिसळताना मजा येते मजा आली. अनेक आमदार पुढे खूप मोठे झाले, मोठे झाले तरीही मित्र राहिले,त्यांचा ते सत्तेत असतांना फायदा किंवा गैरफायदा घ्यावा कधीही मनात आले नाही, कारण दलाली करण्यात आनंद मानणारी पत्रकारिता करून मला माझा स्वाभिमान कधी गहाण ठेवायचा नव्हता. आमदारांपेक्षा तर शासकीय व प्रशासकीय अधिकारी कितीतरी अधिकपटीने कामें करवून देऊ शकतात पण त्यांचा आधार घेतल्यापेक्षा उलट त्यांनाच आपण मोठ्या भावासारखा आधार द्यावा मनाशी अगदी सुरुवातीलाच ठरविले होते आणि तसेच घडत गेले…
साऱ्या बाबी केवळ पैशातून मोजायच्या नसतात त्यातून आपोआप प्रेम मिळत जाते. काही छोट्या छोट्या गोष्टीतून ते दिसतेही जसे अलीकडे एका शासकीय अधिकारी मित्राने अगदी आठवणीने त्याच्या घरी बनवलेले मला आवडते म्हणून कैरीचे लोणचे पाठवले किंवा एकदा एका अधिकाऱ्याने थेट घरी बोलावून स्वतःच्या हाताने मला आवडणारी चविष्ट खान्देशी शेवेची भाजी करून खाऊ घातली किंबहुना त्यादिवशी काही अन्य अधिकारी आणि मी, जमून आलेली ती शेवेच्या भाजीची पार्टी, मनातले सांगतो, खूप वर्षांनी बॅचलर्स पार्टीची आठवण झाली. माझे असे मत आहे कि ओळखी नक्की खूप असाव्यात पण एकदा का अमुक एखाद्याशी मैत्री झाली कि त्याला त्याच्या गुण दोषांसहित स्वीकारायचे असते…
नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अन्य कोणीही, त्यांनी त्यांच्या घरात घेतल्यानंतर कधीही वाटता कामा नये कि हा आपल्या घरातली माहिती घेऊन लिहून मोकळा होईल. नाते मग कोठेही निर्माण झाले तरी अत्यंत विश्वासाचे असावे व्हावे लागते. गम्मत म्हणून सांगतो, सत्तेभोवती जे सतत फिरणारे असतात ते अतिशय प्रोफेशनल असतात म्हणजे गरज सरो नि वैद्य मरो,पद्धतीचे वागणारे असतात पण आम्ही ते तसे कधीही वागत आलेलो नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास प्रमोद बोरसे आणि गजानन गिरी हे विविध मंत्र्यांचे खाजगी सचिव होते किंवा सतीश भिडे तर मोठे प्रशासकीय अधिकारी होते पुढे त्यांनी थेट नोकरी सोडली, खाजगी क्षेत्रात ऑन मेरिट पुढे जायचे त्यांनी ठरविले, आश्चर्य वाटेल, आजही मी या अशा मंडळींशी मैत्री जवळीक ठेवून आहे. एकदा का अमुक एक सत्तेतून बाहेर पडला कि तो जवळून जरी गेला तरी ओळख न देणारे बहुतेक असतात पण असे वागू नये, मैत्री कायमस्वरूपी असावी, टिकावी. अर्थात हा सारा भावभावनांचा खेळ आहे जो खेळणे फार कमी लोकांना जमते…
काही आमदार दुरून जरी दिसले तरी आनंद होतो, वाटते जागच्या जागी गोल गोल नाचावे, बागडावे. पुण्याच्या मेधा कुलकर्णी, मंदाताई म्हात्रे, राजेंद्र पटणी, निलय नाईक, डॉ सुजित मिणचेकर, जितेंद्र आव्हाड, पराग आळवणी, गोपीकिसन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, हेमंत टकले, संजय सावकारे, चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, के. सी. पाडवी, अनिल गोटे, उदय सामंत, भास्करराव जाधव, एकनाथजी खडसे, आकाश फुंडकर, प्रकाश भारसाखळे, कप्तान तामिळ सेल्वन, गणपत गायकवाड, राम कदम, अमर काळे, सुनील केदार, समीर मेघे, दिलीप सोपल, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार असे आजवरचे शेकडो, कितीतरी, बहुसंख्य आणि त्यातलेच एक कल्याण पश्चिमचे आमदार भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत असूनही मंत्री म्हणून डावलल्या गेलेले, भाजपाचे त्या भागातले आधारस्तंभ श्रीयुत नरेंद्र पवार. थकलेल्या आणि चिडलेल्या नेत्यांशी साधे बोलणेही नकोसे वाटते, नरेंद्र पवार कायम उत्साही आणि हसतमुख म्हणून ते मंत्रालयातही सर्वांना हवेहवेसे असतात, वाटतात…
एकाचवेळी जो लोकप्रतिनिधी थेट मंत्रालय आणि स्वतःचा मतदारसंघ सांभाळून असतो तो राजकारणात पुढे खूप वर्षे टिकतो आणि आमदार म्हणून वारंवार निवडूनही येतो, त्यातलेच एक नरेंद्र पवार. अर्थात असे फार कमी असतात जे मतदारांच्या समस्यांना थेट सामोरे जातात आणि मंत्रालयातल्या झगमगटासमोर दिग्ग्ज मंडळींसमोर न घाबरता उभे राहून कामें करवून घेतात. मला तर नेहमीच असे वाटते, ज्यांनी आमदार व्हायचे ठरविलेले असते त्यांनी आमदार होण्याआधी मुंबईचे राजकीय वातावरण आणि वर्तुळ समजावून घेतलेच पाहिजे, हे असे नरेंद्र पवार यांनी केले त्यामुळे त्यांना येथे वावरणे अगदी सहज वाटते. मंत्री किंवा अधिकारी मग तो कोणत्याही विचारांचा असला तरी पवारांची कामे अत्यंत आवडीने करवून देतो कारण पवारांचे वागणे बोलणे एवढे आश्वासक सुसंस्कृत असते कि ते जे करताहेत ते लोकांच्या भल्यासाठी असे सतत वाटत राहते. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर अगदी जाहीर सभेत म्हणालेत कि माझ्याकडे लोकांची सर्वाधिक समस्या कामें घेऊन येणारे आमदार म्हणजे आपले नरेंद्र पवार…
पुढे मी जे काही लिहिणार आहे ते वाचून नरेंद्र पवार यांचे चाहते मतदार जागच्या जागी गिरक्या घेऊन आधी नाच नाच नाचतील नंतर नक्की नरेंद्र यांना तोंडात पेढे भरवून येतील. आणि जे मी सांगणार आहे ते थेट कार्यसम्राट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पब्लिकसमोर सांगितले आहे, ते म्हणाले, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या राज्यातील २८८ आमदारांच्या सर्व्हेमध्ये नरेंद पवार हे टॉप टेन मध्ये आले आहेत. केलेले काम कधीही लपत नसते, त्याची दखल थेट पक्षश्रेष्ठी तर घेतातच पण मतदारांना देखील अशा काम करणाऱ्या आमदाराचे मनापासून कौतुक असते, मग ते अशा आमदारांना वारंवार विधानसभेत तेही निवडणून पाठवतात. नरेंद पवार यांचे पुन्हा विधान सभेत निवडून जाणे हे जणू आजच ठरलेले आहे कारण पक्षश्रेष्ठी आणि मतदार दोघेही त्यांच्यावर जाम खुश आहेत…
साऱ्यांनी नरेंद्र यासाठी व्हावे कि तसे बघितले तर विधानसभेत जाण्याची त्यांची जेव्हा पहिली वेळ होती तेव्हा विधानसभेत जाण्याआधी सतत एक कार्यकर्ता म्हणून पवारांनी मंत्रालयाचा आणि मतदारसंघाचा तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा अभ्यास केला, एखाद्या आमदाराने नेमके काय करायचे असते, कसे बोलायचे वागायचे असते त्यांनी ते जाणून घेतले म्हणून नरेंद्र थेट आमदारातून पहिल्या दहा मध्ये म्हणजे मेरिट मध्ये आले. त्यांना विविध प्रश्नाची उत्कृष्ट जाणआहे म्हणजे आधी ते अमुक एखादा प्रश्न काळजीपूर्वक समजावून घेतात मग तो प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान करतात. बावनकुळे म्हणालेत तेच खरे आहे कि राज्यातील २८८ आमदारांच्या कामगिरीचा सर्व्हे फडणवीसांनी जेव्हा केला तेव्हा मतदारसंघातील प्रश्न, सभा गृहातील भाषणे आणि आक्रमकपणा, लोकांमध्ये असलेली प्रतिमा आणि थेट जनतेतून घेतल्या गेलेल्या प्रतिक्रिया, त्यातून नरेंद्र पहिल्या दहा मध्ये पास झाले मेरिट मध्ये आले…
शेवटी एकच सांगता येईल कि त्यांच्या बोलण्या वागण्यातला साधेपणा त्यातून ते कल्याण पश्चिम मध्ये म्हणजे त्यांच्या विधान सभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराला आपल्या घरातले एक सुसंस्कृत सदस्य आहेत असे सतत वाटत राहते. मतदारांना ते थेट मोठ्या भावासारखे वाटतात कारण नरेंद्र त्याचपद्धतीने म्हणजे आपुलकीने सर्वांशी वागतात. अमुक एका मतदाराने काम सांगितल्यानंतर त्याची पाठ वळली कि कागदाचा चिटोरा थेट कोपऱ्यात भिरकावणारे ते लोकप्रतिनिधी नाहीत. ते प्रत्येक कामाचा पाठपुरावा करतात आणि अमुक एखाद्याचे काम झाले कि त्याला तसे जातीने कळवून मोकळे होतात म्हणून त्यांची लोकांत लोकप्रियता व प्रतिमा उंचावलेली सतत दिसते आहे. मतदारांच्या हक्काचा साधा सच्चा माणूस म्हणजे नरेंद्र पवार. ज्याला मतदारांत घरातले स्थान आहे आणि मोठ्या भावासारखा मानसन्मान लाभतो आहे. काम करणाऱ्यांचे मनापासून कौतुक झाले पाहिजे असे वाटले म्हणून नरेंद्र पवारांवर थेट चांगले लिखाण केले…
पत्रकार हेमंत जोशी