राज्य अस्थिरतेकडे : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे शरद पवार जे जाहीर म्हणालेत आणि उद्धव यांनी निमूटपणे ऐकूनही घेतले कि ते मुस्लिमांमुळे निवडून आले त्यावर एकाने पवारांना छान विचारले कि जर पवारांचा पक्ष मुस्लिमांमुळे निवडून आला असेल तर मुस्लिम अल्पसंख्यांक कसे आणि ज्या हिंदूंनी त्यांच्या पक्षाला मते दिलीत त्यांनी चूक केली का ? अर्थात पवारांनी काहीही बोलले तरी चालते कारण त्यांची सध्या चलती आहे. एका पाठोपाठ एक म्हणजे आधी पृथ्वीराज चव्हाण बोलले त्यानंतर काहीच दिवसात अशोक चव्हाण देखील अगदी जाहीर सभेत, उद्धवजींकडून लिहून घेतले आहे, म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण दोघेही काँग्रेसचे जबाबदार नेते, दिल्लीच्या इशाऱ्यावरून बोलणारे अशी त्यांची ख्याती, दोघेही लागोपाठ आरोप करून जहरी बोलून मोकळे होतात, उगाच असे घडत नसते. काँग्रेसला हे पक्के माहित आहे जो काय गोंधळ घालायचा असेल तो मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्यालाही फाट्यावर मारून मोकळे होणार आहेत आपली देखील ते फडणवीसांची भाजपा करून मोकळे होतील हे त्यांनी नेमके ताडले आहे…
काहीतरी कुणकुण तर काँग्रेसला लागलेली आहे म्हणजे आमदारांचा एक मोठा गट त्यांना सोडून जाईल राष्ट्रवादी कि शिवसेनेत सामील होईल आणि नजीकच्या भविष्यात सेना व राष्ट्रवादीला जशी भाजपाची गरज राहिलेली नाही तेच काँग्रेसच्या बाबतीत घडेल, कदाचित या अस्वस्थतेतून दोन्ही चव्हाण नको ते बोलून मोकळे झाले असावेत. आता आपणही देवेंद्र फडणवीस व भाजपा आणि राज ठाकरे आणि मनसे यांच्या रांगेत हेच नेमके काँग्रेसच्या नेत्यांनी ओळखले असावे म्हणून त्यांनी या दोन्ही चव्हाणांना पुढे केले आहे. जसे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या सूचनेशिवाय आणि इशारा केल्या शिवाय १००% कधीही काहीही बोलत नसतात ते तसेच राज्यातल्या काँग्रेस मध्ये असते, स्वतःच्या मनाने येथे कोणीही काहीही बोलत नसते, बोलले तर त्याचा लगेच संजय निरुपम होतो, नेता बाजूला फेकल्या जातो. सध्या तरी नेहमीप्रमाणे आहे ते किंवा मिळेल ते सावटून घ्या, नेहमीप्रमाणे महाआघाडी देखील राज्य हाकते आहे, तशीच जोरात सुरुवात झालेली आहे कारण वातावरण अद्यापही अस्थिर असल्याने मंत्र्यांची आणि मर्जीतल्या खाबू अधिकाऱ्यांची हि अशीच मनोवस्था आहे, कोणालाही दीर्घकाळ टिकणारे काहीही चांगले घडवून आणायचे नाही नसते जे जनतेला दिसते ते अजिबात टिकावू नसते फक्त दिखाऊ असते कारण तकलादू देऊन नेत्यांना अधिकाऱ्यांना राज्य लुटून मोकळे व्हायचे असते…
www.vikrantjoshi.com
श्रीमान बच्चू कडू यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिल्याने सध्या विदर्भातल्या पाच जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे अस्वस्थता आहे अस्थिरता आलेली आहे कारण शिवसैनिकांचा या चार पाच जिल्ह्यात बच्चू कडू यांच्याकडे वाढलेला राबता आणि ओढा हे ते प्रमुख कारण आहे, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या चारही जिल्ह्यावर राजकीय पकड घेण्याची बच्चू कडू यांनी मोठी तयारी सुरु ठेवलेली आहे आणि त्यांच्याकडे नेमके शिवसैनिकच दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर ज्या वेगाने आकर्षित होताहेत बघून या पाचही जिल्ह्यातले शिवसेना नेते अतिशय अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. या नेत्यांना वाटते कि जर बच्चू कडू यांनी नजीकच्या काळात उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत येण्याचे संकेत दिलेले असतील तर ठीक आहे अन्यथा कडू यांचे सर्वसामान्य लोकांमध्ये वेगाने वाढणारे महत्व आणि लोकप्रियता फक्त आणि फक्त शिवसेनेच्याच अंगाशी येऊ शकते त्यातूनच बहुतांश सेना नेते उद्धव यांच्या बच्चू कडू यांना शिवसेना कोट्यातून मंत्री करण्यावर अतिशय नाराज आहेत. बच्चू कडू हे नजीकच्या काळातले विदर्भवीर ठरणार आहेत त्यांची लोकप्रियता एकेकाळच्या जांबुवंतराव धोटे पद्धतीने वेगाने झपाट्याने वाढणार आहे हे जे सेना नेत्यांना वाटते आहे त्यात त्यांचे अंदाज चुकीचे आहेत, अजिबात वाटत नाही. अर्थात बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात तेही सेना कोट्यातून स्थान देऊन ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतलेली आहे कि त्यांनी आपल्या जाळ्यात अलगद एक स्ट्रॉंग नेता, मासा पकडला ओढला आहे हे आजतरी सांगणे कठीण आहे पण नुकसान मात्र सध्या तरी शिवसेनेचे होते आहे, बच्चू कडू नक्की वरचढ ठरले आहेत. बच्चू कडू जेथे शिवसैनिकांचा कोंडाळा तेथे, असे दृश्य जागोजाग दिसते आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.