आघाडीचे लोचे आणि राजकारणातले उच्च व लुच्चे :
एखादा जातिवंत मराठा तोही थेट शिवाजी महाराजांचा वंशज किती उच्च विचारांचा आणि निधड्या छातीचा असू शकतो, उदयन महाराज तुम्हाला बार बार सलाम ढोपरापासून नमस्कार, तुम्ही जे अलीकडे बोलून गेला आहात त्या वाक्यांचे जर राज्यातल्या भाजपाने जागोजाग होर्डिंग्स उभारले नाहीत तर त्यांच्यासारखे कपाळकरंटे तेच असतील, विरोधक त्यावेळी नक्की टाळ्या वाजवून मोकळे होतील. उदयनराजे भोसले म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस तुम्ही सर्वगुण संपन्न आहात, मात्र तुम्ही देवेंद्र भोसले, शिंदे, पाटील, महाडिक नाही म्हणून तुम्हाला टार्गेट केले जाते. पण मी भेदभाव करीत नाही, मी उदयनराजे फडणवीस आणि तुम्ही देवेंद्रराजे भोसले !! तुम्ही सारेच्या सारे अगदी आत्ताआत्तापर्यंत राज्यातल्या महायुतीच्या पराभवावर ठाम होते, मला वाटते मी एकमेव, तुम्हाला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होतो कि महायुतीविषयी कोणतेही नकारात्मक भाव आणि विचारही मनात यासाठी आणू नका कारण एकाचवेळी मी महायुतीचे निर्णय आणि महाआघाडीच्या एकंदर राजकीय गोंधळाचा निरखून पारखून अभ्यास करीत होतो, आता नेमके तेच वातावरण तेही मतदानाच्या आधीच महायुतीसाठी पूरक आणि महाआघाडीला अत्यंत मारक असे निर्माण झाले आहे, हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम असलेली महायुती राज्यातल्या समस्त हिंदूंना सुरक्षित आणि सदुपयोगी कशी हे पूर्णतः लक्षात आल्याने त्याचवेळी महाआघाडी घातक घातकी कशी हे राज्यातल्या मुसलमानांच्याही लक्षात आले असल्याने एकाचवेळी दोघे म्हणजे हिंदू आणि मुसलमान मोठ्या प्रमाणावर महाआघाडीपासून नक्की दूर जाणार आहेत,विशेष म्हणजे मुसलमान आपली स्वतंत्र चूल मांडतांना तुम्हाला दिसणार आहेत…
www.vikrantjoshi.com
तिकडे कोल्हापुरात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग नाही म्हणायला लोकसभा निवडणुकी दरम्यान पुन्हा त्यांच्या झेंड्याखाली एकत्र जमा झाला होता ज्याचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत अख्या पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी बसला होता पण केवळ दोन तीन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती अचानक बदलली आहे ज्याचा मोठा फायदा या विधानसभेला नक्की आणि फक्त महायुतीला यासाठी होणार आहे कारण याच कोल्हापूर जिल्ह्यातले तीन विविध राजकीय दादा एकत्र आले आहेत त्यातले एक राज्यसभेतले भाजपा महायुतीचे खासदार मुन्ना महाडिक दुसरे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि तिसरे अर्थातच इचलकरंजीचे राजकीय अनभिषिक्त सम्राट प्रकाश आवाडे, या तिघांनीही शरद पवारांकडे पाठ फिरवून कायमस्वरूपी देवेंद्र फडणवीसांना लाडाने कडेवर घेत त्यांचे पटापट मुके घेणे सुरु केल्याने अख्य्या कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला पूरक आणि पोषक असे वातावरण तयार झाले असून प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून आजच आमदार झाल्यात जमा आहेत, महायुतीची ती अगदी नक्की निवडून येणारी जागा आहे. खासदार मुन्ना महाडिक वगळता अपक्ष आमदार असलेले प्रकाश आवाडे किंवा जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा जणू सिनेमातले मनोजकुमार ते विनय कोरे वास्तविक याआधी दूरदूरपर्यंत भाजपाच्या पंक्तीला बसणारे नेते नव्हते पण फडणवीसांचे अफाट नेतृत्व त्यांची सहकार्य करण्याची तडफेने निर्णय घेण्याची अचाट क्षमता बघून कोल्हापूर जिल्ह्यातल्या याआधी पूर्णतः भाजपाविरोधी सतत आजतागायत भूमिका घेणाऱ्या या अतिशय ताकदवान नेत्यांनी भूमिकेत बदल केला आणि आज जवळपास सारेच कोल्हापूर जिल्ह्यातले आता फडणवीसांचे फॅन फॉलोअर झालेले आहेत म्हणजे उद्या एखाद्या बेसावध क्षणी ते सतेज पाटील त्या फडणवीसांच्या मांडीवर येऊन बसलेत तर अजिबात नवल वाटून घेऊ नका. आणखी एक महत्वाचा मुद्दा त्या चंद्रकांत पाटील यांचा, हेच ते चंद्रकांतदादा ज्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा जन्माला घातली वाढविली मोठी केली जिवंत ठेवली, थोडक्यात या चंद्रकांतदादांना मानणारा याच कोल्हापूर जिल्ह्यात संघ स्वयंसेवकांचा आणि भाजपा कार्यकर्त्यांचा एक मोठा गट आहे आणि त्याची ताकद नक्कीच नेहमीसारखी महायुतीच्या पाठीशी उभी आहे, थोडक्यात महायुतीचे दिवाळी आधीच कोल्हापुरात फटाके वाजू लागले आहेत, महायुतीचे समर्थक आनंदाने नाचू बागडू लागले आहेत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी