शिंदेंचा अवाढव्य गढ त्यावर भाजपा वरचढ :
किस्सा तसा जुना आहे, राष्ट्रवादी मध्ये अनेकदा एकमेकांना गमतीने तो सांगितल्या जातो. जेव्हा अजित पवार काकांपासून वेगळे झाले नव्हते तेव्हा…
अजितदादा अचानक चालता चालता विहिरीत पडतात. शेजारी नेहमीप्रमाणे संजय खोडके असतात ते लगेच विहिरीत दोर टाकून दादांना बाहेर काढायचा प्रयत्न करतात, दादा वर आले रे आले कि खोडके दोन्ही हातांनी त्यांना नमस्कार करतात, दोरीवरचा हात सुटतो, दादा पुन्हा विहरीत….असे अनेकदा घडते…
www.vikrantjoshi.com
म्हणून दादांना वर काढण्यासाठी थेट शरद काकांना पाचारण केल्या जाते. कारण काका नक्कीच पुतण्यासमोर दोन्ही कर जोडणार नाहीत. काका येतात, विहिरीत दोर सोडतात, दादा हळूच वर येतात, समोर बघतात तर थेट शरद काका, दादांना गहिवरून येते, यावेळी देखील काकांनीच आपल्याला वाचविले या सदभावनेतून अजितदादा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपले कर काकांसमोर जोडतात, हातातून दोरी सुटते, दादा पुन्हा विहिरीत पडतात, विहिरीत भरपूर पाणी असल्याने दरवेळी दादांना साधे खरचटले नसते. पण येथेही दरवेळी तेच घडते, काका दादांना वर काढतात, दादा दोन्ही हात जोडतात आणि पुनःपुन्हा विहिरीत पडतात…
शेवटी खोडके आणि काका विचारात पडतात, दादाला कसे वाचवायचे, तेवढ्यात खालून स्वतः अजितदादांनीच त्यांच्या नेहमीच्या कर्कश आवाजात ओरडून सांगितले कि पक्षातल्या माझ्या सर्वाधिक खतरनाक आणि खडूस शत्रूला म्हणजे त्या जयंत पाटलांना आता बोलवा. दोघेही दादांचे म्हणणे मान्य करतात आणि जयंत पाटलांना बोलविले जाते, दादा त्यानंतर जयंत पाटलांनी दोर सोडताच झर झर वर येतात, कारण ना जयंत पाटलांना दादांसमोर झुकायचे असते ना तिरसट अजितदादांना जयंतरावांसमोर वाकायचे असते…
दादांचा नेमका हाच स्वभाव विशेषतः भाजपा पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आला आणि त्यांनी काहीसे डोईजोड ठरत चाललेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चेकमेट देण्यासाठी, मात करण्यासाठी अजित पवार आणि अख्या राष्ट्रवादीच्या बदनाम गँगला त्वरेने महायुतीच्या सत्तेत थेट सामील करून घेण्यात आले, अगदी पहिल्या दिवसांपासून शिंदे आणि दादा ना एकमेकांसमोर झुकायला तयार आहेत ना एकमेकांना बिलगायला तयार आहेत जे त्या भाजपा पक्ष श्रेष्ठींना अपेक्षित होते. भाजपाशी लॉयल्टी आणि उत्तम संस्कारांची विचारांची गॅरंटी जर अजितदादा आणि गॅंग ने यापुढे आचरणात आणली तर दादा गॅंग राजकीय दृष्ट्या फार पुढे निघून जाईल, भाजपा त्यांच्या पाठीशी उभी राहील, नेमके हेच याठिकाणी मला महाराष्ट्रातल्या हार्डकोअर भाजपा कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि संघ स्वयंसेवकांना सांगायचे आहे कि अजित पवारांना त्यांच्या संगे बाहेर पडलेल्या नेत्यांना मंत्र्यांना भाजपा तसेच महायुतीच्या सत्तेमध्ये सामील करून घेणे तुम्हाला अजिबात आवडलेले नाही म्हणजे शेजारी राहणाऱ्या बदनाम बदमाश बिनधास्त तरुणाशी नेमके सुसंस्कृत कुटुंबातल्या तरुणीने तेही पळून जाऊन लग्न केल्यानंतर ज्यापद्धतीने त्या सुसंस्कृत शालीन कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसतो तेच अजितदादा आणि टोळीला महायुतीमध्ये सामील करून घेतल्यानंतर भाजपा आणि संघातल्या प्रत्येकाच्या डोक्याचे पार भजे झाले होते आहे पण माझी नेमकी नक्की माहिती हीच आहे कि अजित पवारांना युतीमध्ये सामील करवून घेऊन जेवढे मोठे नुकसान आज भाजपाचे झाले नाही त्यापेक्षा अधिक नुकसान त्यांना महायुतीमध्ये सामील करवून घेतले नसते तर नक्की झाले असते, काट्याने काटा याचपद्धतीने काढल्या जातो. अतिशय डोईजोड ठरत चाललेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे जवळपास सारेच मंत्री तसेच डोक्यावर बसलेले नेते या साऱ्यांवर अंकुश ठेवून त्यांचा चौफेर उधळलेला घोडा त्याला लगाम खेचण्यासाठी भाजपा श्रेष्ठींची हि नामी युक्ती, त्यावर संघ आणि भाजपा हार्डकोअर मंडळींनी अजिबात अस्वस्थ होण्याचे कारण नाही, जे तुम्हाला आवडलेले नाही ते तुमच्या नेत्यांना नक्कीच मनापासून आवडलेले नव्हते पण पंचतारांकित हॉटेलच्या मालकाला ताळ्यावर आणण्यासाठी त्याच्याच कंपाउंड मध्ये थेट देशी दारू विक्रीचा परवाना असलेला ढाबा त्या दुल्हे राजा सिनेमा पद्धतीने भाजपा श्रेष्ठींनी उघडला आहे, महायुतीमध्ये त्यातून नक्कीच भाजपाचा मोठा राजकीय फायदा होणार आहे, हे भाजपा श्रेष्ठींनी घडवून आणले नसते तर हेच एकनाथ शिंदे शरद पवारांच्या देखील पुढे निघून गेले असते. अजित पवार विषय येथेच संपत नाही…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी