लाजू नका आणि माजू नका : पत्रकार हेमंत जोशी
सध्या तुम्ही आम्ही सारे जेवढे किराणा आणि भाजी विकत घेण्यावर तुटून पडलो आहोत तेवढे अगतिक आक्रमक याआधी कधी झाल्याचे तुम्हाला आठवते का, शक्यच नाही. जणू पुढल्या काही दिवसात चक्क उपासमारीची वेळ येणार आहे पद्धतीने आपण खरेदीवर तुटून पडलो आहोत नि कोरोनाचे त्यातून संकट अधिकाधिक गडद करून सोडतो आहोत. प्रत्येकाच्या घरी यादिवसात तर असे वातावरण आहे कि जणू दिवाळीच्या सुट्टीनिमीत्ते सारे घरात एकत्र जमले आहोत आणि आनंदोत्सव साजरा करतो आहोत, आज काय तर चायनीज उद्या काय तर श्रीखंड पुरी पर्वा काय तर पिझ्झा, कधी चिकन तर कधी मद्याचे प्याले, कधी गोडधोड तर कधी विविध चमचमीत पदार्थ, दररोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळे पदार्थ आणि त्या पदार्थांचे फेसबुकवर विभत्स प्रदर्शन, मृत्यूच्या दारावर आणून सोडलेल्या संकटाचे भान न ठेवता हे जे काय एखाद्या सणासुदीसारखे खाण्यावर आणि त्यासाठी लागणाऱ्या खरेदीवर तुटून पडणे सुरु आहे त्यातून आपल्याला संकटाचे गांभीर्य अजिबात समजलेले नाही असे दिसते…
याउलट या कठीण दिवसात नियोजन करणे म्हणजे काय असते ते मुलांना समजावून सांगायला हवे. घरात कमीतकमी भांडी वापरून काटकसर करून पोटाला आवश्यके तेवढे गरजेपुरते अन्न शिजवण्याचे सोडून जर अधिक बेशिस्तीकडे वागण्याचा आपला कल असेल तर कोरोना किंवा तत्सम संकटांचे गांभीर्य आपण लक्षातच घ्यायला तयार नाही असा सरळ अर्थ त्यातून निघतो. अत्यंत महत्वाचे म्हणजे मारून मुटकून साऱ्यांना या दिवसात कंपलसरी घरात बसावे लागते आहे, विशेषतः कमावत्या मुलामुलींच्या सुनांच्या गराड्यात आपले म्हातारपण नेमके कसे असेल हे यादिवसात विशेषतः वृद्ध किंवा वृद्धत्वाकडे झुकलेल्यांच्या एव्हाना ते नक्की लक्षात आले असेल, जर अशा बुजुर्ग वयस्क मंडळींकडे तरुण मंडळींचे वागणे बोलणे पाहणे चुकीचे असेल, त्रासदायक असेल, मुलांच्या शिव्या बोलणी प्रसंगी अंगावर हात देखील उगारला जात असेल तर या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपला वृद्धापकाळ सुखकर जाण्यासाठी तमाम बुजुर्ग मंडळींनी नियोजन करणे किंवा स्वतःची भविष्यात सेफ सोय लावून ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलावीत…
माझा एक व्यापारी मित्र आहे, कोरोनामुळे त्याच्या एकुलत्या एक मुलाचे उत्पन्न बंद असल्याने तरुण आडदांड मुलगा जातायेता आलेले फ्रस्ट्रेशन मायबापावर काढून मोकळा होतो, बायको श्रीमंत घरातली असल्याने तिला मात्र राणीसारखे वागवतो. या विवाहित मुलास यादिवसात सतत घरात राहावे लागत असल्याने मुलाच्या नेमक्या वाईट सवयी व्यसने मित्राच्या लक्षात आलेली आहेत. हे चिरंजीव कधी या कोपऱ्यात जाऊन सिगारेट ओढतात तर कधी त्या कोपऱ्यात जाऊन दारूचा पेग मारून मोकळे होतात त्याशिवाय बाहेरची लफडी त्यामुळे फोनवर हळू आवाजात बोलणे, पै पै जमवून वाढविलेल्या मुलाचे हे वेगळे रूप पाहून शेवटी मित्राने बायकोशी बोलून ठेवले आहे कि कोरोना संकट दूर झाले कि आपल्या गावाकडल्या घरात जाऊन आयुष्याचा अखेरचा काळ सुखासमाधानाने व्यतीत करायचा. मला आठवते, माझे एक जवळचे नातेवाईक, जेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना यापद्धतीने झिडकारले, शेवटी ते एके सकाळी उठले आणि विदर्भातल्या एका खेड्यात झोपडीवजा घरात जाऊन सुखाने राहू लागले, उलट असे केल्याने त्यादोघांचे आरोग्य व्यवस्थित आहे आणि आयुष्य देखील वाढले आहे. कष्टाने वाढविलेल्या, संकटांवर मात करून घडविलेल्या मुलांचा घरातला वावर जर आयुष्याच्या संध्याकाळी खरोखरी त्रासदायक वाटत असेल तर यावयातही आईवडिलांनी बाहेर माधुकरी मागून आयुष्य व्यतीत करावे पण नालायक कुटुंब सदस्यांपासून दूर राहावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.