भाग दुसरा : माझे विचार आजचा सुविचार
—पत्रकार हेमंत जोशी
आम्ही मराठी विशेषतः कौटुंबिक कलह घरातल्या कटकटी आणि व्यावसायिक अपयशातून लगेचच कोलमडून पडतो, व्यसनात यश आणि अपयश पचवण्याची हिम्मत नसेल तर सरळ नेहमीप्रमाणे नोकरी करा जे पाश्चिमात्य देशातल्या व्यवसायिक असलेल्या गुजराथी समाजाने केले म्हणजे मॉल संस्कृती फोफावल्यानंतर किंवा सुरु झाल्यानंतर विशेषतः पाश्चिमात्य देशात कित्येक वर्षे जे गुजराथी बांधव छोट्या मोठ्या व्यवसायात दुकानदारीत होते त्यांनी तडकफडकी आपले व्यवसाय बंद केले अधिक शिक्षण घेतले आणि त्यांचे पुरुष व महिला देखील मराठी ब्राम्हणांसारखे सरळसरळ नोकरीत उतरले आता ते तेथेही समाधानी आहेत, कदाचित जे वेळेचे स्वातंत्र्य आणि पैसा स्वतःच्या व्यवसायात मिळतो नोकरी करताना त्यावर बऱ्यापैकी बंधने येत असतील पण गुजराथी मंडळींनी त्याचीही सवय करून घेतली. व्यवसायाचे हे असेच असते म्हणजे त्याची फळे नोकरीपेक्षा नक्की अधिक मधुर असतात पण दणका बसला तर तीच सुमधुर फळे सडक्या आंब्यासारखी ठरतात अशावेळी काही काळ शारीरिक व मानसिक स्वास्थ्य किंवा मनाचा विचारांचा सवयीचा तोल ढळू न देता पुन्हा पूर्वीचे यश मिळविण्यासाठी जोमाने उठून उभे राहायचे असते. व्यसायातल्या यशाने माजून जायचे नसते आणि अपयशाने खचून जायचे नसते हे कायम लक्षात ठेवा. मी व माझी दोन्ही उच्चशिक्षित मुले वेगवेगळ्या तीन व्यवसायात आहोत पैकी पत्रकारितेमुळे या कोरोना महामारीत आमचे अजिबात नुकसान झाले नाही दुसऱ्या एका व्यवसायात नियमित मिळणाऱ्या उत्पन्नात थोडी घट झाली तर तिसऱ्या व्यवसायात एवढे खाली आलो कि तेथले नुकसान भरून काढण्या नक्की काही दिवस नव्हे तर काही वर्षे लागणार आहेत फक्त दोन्ही मुलांना एवढेच एक दिवस विश्वासात घेऊन सांगितले कि आलेल्या या अनपेक्षित अपयशाने अजिबात खचून जायचे नाही किंवा झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इतर अनेक मीडियातील मंडळी ज्या वाईट पद्धतीने प्रचंड पैसे मिळवून मोकळे होतात तसेही आपल्या हातून अजिबात घडू द्यायचे नाही, म्हणजे जेणेकरून आपला पत्रकारितेतील दबदबा त्या दलालीतून अजिबात कमी होऊ देता कामी नाही. वाचकमित्रहो, नोकरी करायची नाही हे मी वयाच्या १७ व्या वर्षी ठरविले आणि तेच केले म्हणजे व्यवसायच केला त्यातून आजवर किमान तीन वेळा प्रचंड अपयश आले पण मेहनतीला आणि आलेल्या वाईट प्रसंगांना डगमगलो नाही पुन्हा पुन्हा उभा राहिलो आणि पूर्वीचे चांगले दिवस अगदी विपरीत परिस्थितीत कुटुंबाला मिळवून दिले अर्थात त्यासाठी योग्य नियोजन कामात आले काही नियमित उत्पन्नाचे स्रोत उभे केले. एकदा तर असा कठीण प्रसंग आला वाईट आर्थिक काळ आला कि ज्यांना मी घडविले वाढविले अशा कुटुंबाने मला ऐन गौरी गणपतीच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर पूजा सुरु असतांना मला माझ्या कुटुंबासहित काढले पण अशा प्रसंगातही कोलमडून पडलो नाही किंवा ज्यांनी बाहेर काढले त्यांचे वाईट चिंतले नाही, काहीतरी आपलेच चुकले असावे असा मनाशी विचार केला, पुन्हा पूर्वीचे आर्थिक यश केवळ वर्षभरात मिळवून मोकळा झालो. तुम्ही देखील व्यवसाय करतांना कुटुंबातील शांतात ढळणार नाही याची कायम खबरदारी घ्या, घरातल्या बुजुर्ग मंडळींचा सतत अपमान होणार नाही याची खबरदारी काळजी घ्या नंतर बघा कि प्रचंड यश आपणहून तुमच्याकडे चालत येणार आहे. काही कुटुंबात मूल होत नाही म्हणून अस्वस्थता असते तर काही कुटुंबातले सदस्य संतापी असतात म्हणून त्यांना काळजी असते अनेकांना घरातली तरुण पण व्यसनी पिढी अस्वस्थ करीत असते त्यावर अनेक पर्याय व उपाय उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करून नेमके पर्याय व उपाय शोधून काढा नक्की अशांच्या आयुष्यात पुन्हा अत्यानंदाचे आनंदाचे दिवस चालून येतील, निराश होऊ नका हिम्मत सोडू नका, कल अपना है…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी