आदित्य विक्रमादित्य व्हा : पत्रकार हेमंत जोशी
मी माझ्या बापापेक्षा सरस आजोबा पेक्षा जबरदस्त आणि पणजोबा पेक्षा कणखर आहे हे जेव्हा सिद्ध करेल तेव्हाच पुन्हा एकवार मंत्री म्हणून शपथ घेईन, मी माझे निर्दोषत्व जोपर्यंत सिद्ध करीत नाही आणि जोपर्यंत राज्यातल्या, मुंबईतल्या मराठी माणसाचा केवळ मीच तारणहार आणि नेता हे इतरांना दाखवून देत नाही तोपर्यँत स्वस्थ शांत बसणार नाही असे मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला ठणकावून सांगावे आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे. हे असे आजपर्यंत ज्यांनी केले ते राजकारणात पुढे फार मोठे झाले. त्यातले एक होते दिवंगत आर आर पाटील आणि दुसरे होते अजितदादा पवार. एकेकाळी ते दोघे असेच जनतेच्या रोषाला जेव्हा बळी पडले होते तेव्हा एका झटक्यात त्यांनी मंत्रिपदाचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता विशेष म्हणजे पुढे दोघांनीही आपापले निर्दोषत्व सिद्ध केले आणि शानसे पुन्हा त्याच पदांवर ते शपथ घेऊन मोकळे झाले. आदित्य तुम्ही हे केले तर तुमच्या वडिलांचे नाव आणि त्यांचे सध्याचे पद तर वाचेलच पण तुमचे उद्धवजींच्या राजकीय निवृत्तीनंतर शिवसेना प्रमुख हे पद अबाधित राहीलच पण प्रबोधनकार, हिंदुहृदय सम्राट आणि खतरनाक उद्धवजींच्या रांगेत तुम्हालाही स्थान मिळेल…
आदित्य, मला हे नेमके माहित आहे कि वडील उद्धव तुम्हाला वारंवार ठणकावून हेच सांगत होते कि आपण राज्याचे हिंदूहृदय सम्राट आहोत आपण येथे मातोश्री वर बसून आदेश द्यायचे असतात, पेज थ्री छाप तरुण तरुणींबरोबर रात्री बेरात्री फिरायचे नसते आणि त्यांच्या पासून त्यांच्या पार्ट्यांपासून चार हात लांब राहायचे असते पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही, वडिलांपेक्षा तुम्हाला झिशान सिद्दीकी सारखे मित्र मोलाचे आणि महत्वाचे वाटले. आज हे असे वातावरण तुमच्या अंगलट आले, हरकत नाही सारेच उद्धव यांच्यासारखे चतुर आणि सावध नसतात, तरुण वयात चुका होत असतात पण आता मात्र तडफेने त्वरेने सावध व्हा मंत्रिपदाचा राजीनामा द्या विस्कटलेली शिवसेना बांधायला घ्या जे बुजुर्ग शिवसेना नेते मातोश्री आणि तुम्हा बाप बेट्यांना पारखे झाले आहेत त्यांना जवळ करा, त्यांचे सल्ले मोलाचे माना बाकी सारे वडिलांवर सोडून द्या कारण उद्धव हे अनेकदा युद्धात हरतात पण तहात कायम जिंकतात, यावेळीही तेच होईल, सुशांत दिशा युद्धात ते आज हरले आहेत पण तहात कसे जिंकायचे आणि शरद पवार यांना दूर करून क्षणार्धात मोदी व शहा यांना कसे बिलगायचे त्यांना ते उत्तम जमते…
www.vikrantjoshi.com
सुशांत आणि दिशा प्रकरणी अनेकांच्या विकेट पडतील कित्येक आत जातील पण आदित्य ठाकरे यांचा बाल देखील बाका होणार नाही मात्र तत्पूर्वी त्यांनी मंत्री मंडळातून ताबडतोब बाहेर पडणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आजपर्यंत जे काय भोगायचे उपभोगायचे ते पुरे झाले अशी शपथ घेऊन आदित्य यांनी आधी मुंबईतली नंतर राज्यातली शिवसेनेची विस्कटलेली घडी नीट बसवावी, माझ्याकडे पैशांना नव्हे मराठी माणसांना विशेषतः सामान्य शिवसैनिकांना महत्व आहे हे आपल्या आजोबांसारखे या राज्याला आणि सामान्य मराठी माणसाला दाखवून द्यावे त्यानंतर म्हणजे काही वर्षांच्या मेहनतीनंतर वाटल्यास पुन्हा मंत्रिपद स्वीकारावे अगदी मुख्यमंत्री देखील व्हावे. नेते आणि मंत्री सामान्य शिवसैनिकांना नव्हे तर पैशांना पैसेवाल्यांना दलालांना व्यापाऱ्यांना अधिक महत्व देतात आमच्याकडे साफ दुर्लक्ष करतात हि जी राज्यातल्या प्रत्येक शिवसैनिकांची भावना सध्या मनात निर्माण झालेली आहे त्यात सुधारणा आणि बदल अत्यावश्यक आहेत. आम्हा प्रत्येक मराठी व हिंदू माणसाची गरज शिवसेना आहे जरी माझ्यासारखे अनेक हिंदू व मराठी शिवसैनिक नसलेत तरी. अन्यथा एक लक्षात घ्या हे असे बदल जर घडले नाहीत तर शिवसेनेची जागा लवकरच भाजपा घेईल आणि देवेंद्र फडणवीस हे या राज्यातले नरेंद्र मोदी ठरतील. मी जे लिहितो ते कायम खरे ठरत आलेले आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी