धक्कादायक व धोकादायक : केवळ वयस्कांसाठी : पत्रकार हेमंत जोशी
दिवसभरात किमान दहा फोन किंवा सोशल मीडिया, मेसेजेस इत्यादी वरून मी व माझ्या इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेल्या इंग्रजीतूनच लिखाण करणाऱ्या पत्रकार असलेल्या पोटच्या मुलाविषयी म्हणजे विक्रांतविषयी ज्यांना आमची खूप काळजी असते वाटते त्यांच्याकडून हमखास सांगण्यात येते कि जीवाला जपा एवढे सत्य व आक्रमक लिखाण करणे योग्य नाही, आम्हाला तुमच्या जीवाची नेहमी काळजी व चिंता असते वाटते. त्यावर मला एवढेच सर्वांना सांगायचे आहे कि जीवाला जीवनाला धोका आहे हे जसे तुमच्या लक्षात येते तसे ते आमच्याही लक्षात येते पण जसा एखादा खुनी खून पूर्वनियोजित करतो तसे आमचे, आमच्या दोघांचे, आमच्या कुटुंब सदस्यांचे ठरलेले आहे कि मृत्यूचे किंवा कुठल्याही संकटाचे यत्किंचितही भय मनात न बाळगता अखेरच्या श्वासापर्यंत मला आम्हाला अत्याचार अन्याय भ्रष्टाचार इत्यादी राजकारणातल्या घाणीविरुद्ध सतत लढायचे आहे, समजा या लढाईत आमच्या दोघांपैकी एखाद्याचा प्रसंगी जीव जरी गेला तरी जिवंत असलेल्या एकाने बाजी प्रभू देशपांडे या सीकेपीसारखे अखेरपर्यंत अगदी घायाळ अवस्थेत देखील लढायचे आहे. तसा वेळ अद्याप मिळत नाही मिळाला नाही म्हणून अन्यथा मी जर आत्मचसरित्र लिहिले तर ते वाचून त्यातील माझ्यावर वेळोवेळी बेतलेले ओढवलेले प्रसंग वाचून तुमच्या अंगाचा नक्की थरकाप उडेल. भाऊ तोरसेकर, पंढरीनाथ सावंत सारखे मोजके पत्रकार सोडल्यास वाहिन्या व वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर काम करणारे किंवा मालक असलेल्यांचे जर कुभांड तुम्हाला सांगितले तर पत्रकारिता किंवा विविध मीडिया किती खालच्या पातळीने सडलेली, समजल्याने तुमची बातम्या बघण्याची किंवा वाचण्याची त्यानंतर कधीही इच्छा नक्की होणार नाही. अर्थात मीडियावर जेथे घाव घालायचा तेथे शक्यतो आम्ही मागे वळून पाहत नाही पण राजकारणातले मीडियातले सारेच उघड करणे शक्य नसते…
एक उद्योगपती माझा अतिशय जवळचा मित्र आहे, तो मुंबईतल्या महागड्या मसाज पार्लर मध्ये नियमित जातो. महाराष्ट्रात पुण्यात मुंबईत नागपुरात थोडक्यात या राज्यात विविध शहरातून गेल्या काही वर्षात स्पा म्हणजे मसाज पार्लरचे फार मोठे पीक आलेले आहे त्यात काम करणाऱ्या बहुसंख्य मुली या मणिपूर आसाम त्रिपुरा अरुणाचल इत्यादी पूर्व भागातून तर काही थेट थायलंड मधून आलेल्या आहेत, त्यांना अगदी जेमतेम वेतन मिळते त्यामुळे वाट्टेल ते करून भरमसाठ टीप मिळविणे, त्यांचा प्रमुख हेतू असतो, अर्थात या व्यवसायात स्थानिक मुलींचा बायकांचा नक्की सहभाग आहेच, स्पा किंवा पार्लर या नावाखाली वेश्याव्यवसाय करणे हे हमखास त्यामुळे जर तुमच्या घरातले पुरुष अगदी राजरोस सांगून दिवसाढवळ्या या अशा स्पामध्ये जात असतील तर त्यांना नेमकी कोणती सवय आहे हे ध्यानात घ्यावे. कारण मसाज करूनच घ्यायची असेल कित्येक पुरुष थेट घरी येऊन मसाज करतात, मी व माझी मुले सुनील नावाच्या व्यक्तीला अगदी घरी बोलावून त्याच्याकडून अनेकदा मसाज करून घेतो. विशेष म्हणजे अलीकडे विशेषतः हे मसाज पार्लर चालविणारे या मुलींना ग्राहकाच्या विनंतीवरून थेट घरी देखील पाठवू लागले आहेत. कोरोना महामारीत देखील मसाज पालर्स फुल आहेत, थोडक्यात हा छुपा वेश्या व्यवसाय तेजीत आहे. घरी बायकोला शंभर रुपये देतांना शंभर प्रश्न विचारणारे पुरुष अशा पार्लर्स मध्ये मात्र किमान ३ ते ५ हजार रुपये अगदी सहज उधळून येतात हि वस्तुस्थिती आहे. तर माझा हा उद्योगपती मित्र अलीकडे नेहमीच्या मुलीकडून मसाज करून घेण्यास गेला असतांना ती तेथे नव्हती, विशेष म्हणजे ती सोशल वर्क मध्ये कायम इंटरेस्ट दाखवणाऱ्या खान आडनावाच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या थेट घरी गेलेली होती. येथे मला हा विषय फार वाढवता येणार नाही पण मसाज पार्लरच्या नावाखाली हा छुपा वेश्या व्यवसाय थेट तुमच्या घरात घुसला आहे, सावध राहावे सावध असावे…
सुशांतसिंग आत्महत्या कि खून प्रकरण गुंडाळले, रिया सुटली, दिशा सालियन खून प्रकरण उजेडात आलेच नाही, कंगना राणावत आदळआपट करून कुठेतरी गायबही झाली, ड्रग्स प्रकरणी सारे काही शांत शांत, विविध वाहिन्या थंडावल्या, आणि राज्यातले हे सारे गंभीर प्रकार अगदी सहज थांबले दाबल्या गेले त्यातून नैराश्य आले आहे ते सर्वसामान्य माणसाला, तरीही वाचक मित्रानो, तुम्ही असे तडकाफडकी निराश नाराज होण्याचे कारण नाही असे आजही निदान मला तरी वाटते आहे किंबहुना बिहार निवडणुकांमुळे हि वादळापूर्वीची शांतता आहे असे मानायला हरकत नाही त्यात गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती सध्या तोळामासा असल्याने हि गंभीर प्रकरणे बाजूला पडलेली असावीत. अर्थात वर उल्लेख केलेल्या साऱ्या प्रकरणांचा जर खरा सत्य सोक्षमोक्ष लागला तर त्यानंतर या राज्यात या मुंबईत विशेषतः ड्रग्स घेणे विकणे या अतिशय गंभीर प्रकाराला नक्की वचक बसेल अन्यथा असे जर घडले नाही तर जशी या राज्यात अगदी उघड दारू विकल्या जाते, अगदी सहज घुटका मिळतो, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक दारू विक्री होते किंवा असे अगदी उघड स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे तसे माल है क्या, असे ओरडून अमुक एखादे ग्राहक विचारेल आणि आपला आजचा सुसंस्कृत महाराष्ट्र पुढल्या काहीच दिवसात उडता महाराष्ट्र म्हणून देशात व जगात बदनाम होईल. माझ्या ज्या ज्या मित्रांचे मुले व मुली लग्नाचे आहेत त्यांना मी कायम हेच सांगतो कि होणारी सून किंवा जावई भलेही चार इयत्ता कमी शिकलेले असतील किंवा त्यांचे उत्पन्न जेमेतेम असेल पण ते व्यसनी नाहीत याची आधी खात्री करून घ्या नंतरच विवाह जुळवून मोकळे व्हा. मुले वयात येताच त्यांना आपणहून दारू ऑफर करणारे माय किंवा बाप जगातले सर्वाधिक नालायक असतात असे माझे स्पष्ट मत आहे, दुर्दैवाने असे मायबाप अनेक घरातून अलीकडे आढळतात हे दुर्दैव आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी