संजय आणि सामना : पत्रकार हेमंत जोशी
शिवसेनेचे नव्हे तर राष्ट्रवादीचे मुखपत्र, वास्तविक दैनिक सामना च्या प्रथम पानावर हे कुठेतरी लिहिल्या गेले पाहिजे आणि संजय राऊत हे शिवसेनेचे नव्हे तर शरद पवारांचे किंवा राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी प्रवक्ते म्हणून त्यांचा जाहीर जंगी सत्कार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात दस्तुरखुद्द शरद पवारांनी घडवून आणायला हवा. संजय राऊत म्हणजे ‘दुल्हेराजा’ सिनेमातले चित्रपटातले जणू जॉनी लिव्हर, या सिनेमात हास्यभिनेता जॉनी लिव्हर म्हणायला नोकरी कादर खानकडे करत असतो पण तो वास्तवात कादर खान याचा विरोधक त्यातला नायक गोविंदाचा साथीदार असतो. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी वास्तविक जमले तर अगदी जाहीर, संपादक संजय राऊत यांना त्या कादर खान सारखे विचारायलाच हवे, संजयजी, तुम नोकरी मेरे यहा करते हो या शरद पवारका पक्ष राष्ट्र्वादीमे…दुल्हेराजा चित्रपटात अगदी शेवटपर्यंत कादर खानला नेमके हे लक्षातच येत नाही कि जॉनी लिव्हर त्यांच्याकडे नोकरी करतो कि तो विरोधक गोविंदाचा म्हणजे नायकाचा मित्र आहे, तो हे सारखे सारखे जॉनी लिव्हरला म्हणतो, अबे तू नोकरी मेरे यहा करता है कि गोविंदा के यहा. शिवसेनेत कादर खानच्या भूमिकेतल्या उद्धवजींनी वास्तविक ‘ सामना ‘ चे संपादक सर्वेसर्वा खासदार संजय राऊतांना हे नक्की विचारायलाच हवे, तुम्ही नेमके कोणाचे म्हणजे आमचे कि तुमचे मित्रवर्य शरद पवार यांचे, अर्थात येथेही नेमके संजय राऊत यांनी त्या जॉनी लिव्हर सारखे हास्यास्पद वातावरण निर्माण केलेले आहे म्हणजे सामना वाचायला घेतला कि जिकडे पाहावे तिकडे युतीची विशेषतः भाजपा या मित्र पक्षाची आई बहीण घेतलेली काढलेली असते…
युती मध्ये काटे अंथरवणारा खरा खलनायक म्हणजे दैनिक सामना, मध्यंतरी पत्रकार आणि उद्धव ठाकरे व शिवसेना भवनातले जनसंपर्क अधिकारी श्री हर्षल प्रधान यांना वास्तविक दैनिक सामनाचे संपादक करण्याचे म्हणजे संजय राऊत यांची गादी खालसा करून तेथे प्रधानांना बसविण्याचे ठरले होते पण माशी कोठे शिंकली, कळलेले नाही पण पुढे प्रगती नाही. बरे झाले असते, हर्षल प्रधान दैनिक सामनाचे संपादक झाले असते. वास्तविक सामना या अस्त्राचा शस्त्राचा कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर प्रहार करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा पण ते आजपर्यंत कधीही घडले नाही याउलट सेना आणि भाजपा मध्ये दरी निर्माण करण्याचे आणि त्यातून राष्ट्रवादीसारख्या युती विरोधी पक्षाचा राजकीय फायदा करून देण्याचे मोठे पाप मोठे षडयंत्र सामना दैनिकातून पद्धतशीर राबविल्या जाते आहे असेच वारंवार वाटते, सामना दैनिकाचे अंक वाचले म्हणजे मी येथे जे लिहिले आहे ते शंभर टक्के सत्य आहे, हे तुम्हा सर्वांच्या, शिवसेना नेत्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात येईल…
www.vikrantjoshi.com
मला एकदा केव्हातरी नारायणराव राणे हेच म्हणाले होते कि ज्यादिवशी उद्धवजी संजय राऊत यांना खड्यासारखे बाजूला करतील, बघा संजय राऊत यांचा देखील एका क्षणात संजय निरुपम होईल, ते शिवसेना सोडतील, थेट शरद पवारांना जाऊन बिलगतील, राऊत राष्ट्रवादीत जातील. पुढले काही महिने शिवसेना आणि मित्रपक्ष भाजपासाठी राजकीयदृष्ट्या कठीण परीक्षेचा, महत्वपूर्ण कालखंड आहे आणि निदान पुढल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका आटोपेपर्यंत संजय राऊतांनी सामना दैनिकात भाजपा या मित्र पक्षाची पर्यायाने सेना भाजपा युतीची निंदानालस्ती न करता या राज्यात राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाने केलेली पापे त्यांनी सपुरावे मांडून मतदारांचे ब्रेन वॉशिंग करणे जास्त गरजेचे आहे, तेच आवश्यक आहे….
चाललंय ना, चालतोय ना मग बदल कशाला हवेत असे दादरच्या प्रकाश हॉटेल सारखे संजय राऊतांचे वागणे अजिबात योग्य नाही. जेथे तेथे हागुन ठेवल्यासारख्या बातम्या छापून मोकळे व्हायचे आणि रविवार पुरवणीचे धिंडवडे काढून मोकळे व्हायचे हे समोर लोकसत्ता, लोकमत सारख्या तगड्या दैनिकांचे आव्हान असतांना केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे म्हणून आहे तसे पुढे वर्षानुवर्षे ढकलायचे राऊतांचे, या दीर्घ अनुभवी संपादकाचे हे असे बेशिस्त वागणे अजिबात योग्य नाही, आमच्यासारख्या बाणेदारमराठी माणसाचे सामना हे बलस्थान आहे आणि ते वाचकांच्या मानसारखेच दररोज उतरायला हवे, निघायला हवे. सामनातून दरदिवशी भाजपाचे उट्टे काढून सेना भाजपा युतीची बदनामी करायची आणि आघाडीचा विशेषतः शरद पवारांचा म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचा भाला मोठा राजकीय फायदा करून देण्याचे जणू हे मोठे कारस्थान आहे असे वारंवार जाणकारांना वाटत आले आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे, असे घडायला नको तसे संजय राऊत यांना खुद्द उद्धवजींनी ठणकावून सांगायला हवे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी