बायका पुण्यातल्या : पत्रकार हेमंत जोशी
पुण्यात पर्वा ओळखीच्या कुटुंबात गेलो होतो. कुटुंबातल्या एका तरण्या मुलीला बाहेर जायचे होते म्हणून तिने काय हो केले असेल, चक्क सिंगल गादीवरची चादर खेचली नि तीच चादर स्कार्फ सारखी अख्खा चेहरा बांधून ती बाहेर पडली. हे असे मला दोन ठिकाणी बघायला मिळाले म्हणजे चेहरे स्कार्फने बांधून झाकून बाहेर पडणारे पुण्यात आणि हिंदी सिनेमात डाकूंचे काम करणार्यात हे बघितले. पण किती हे कॉन्ट्रास्ट, म्हणजे पुणेकर हा वृत्तीने डाकू नसतो आणि कोणताही डाकू हा कधीच पुणेकर होऊ शकत नाही, तोच काय पण पुण्याबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने पुणेकर होण्याचा प्रयत्न केला तर तो नक्की काही दिवसांनी ठार वेडा झाल्याचे आपल्याला बघायला मिळेल…
पुणेकर मल्टी टॅलेंटेड असतात म्हणून ते गादीवरच्या चादरीचा वेगवेगळा उपयोग करून घेतात. म्हणजे चादर एकच पण तीच चादर घरी गादीवर तर बाहेर स्कार्फ किंवा श्रीखंड चक्का बांधण्यासाठीही किंवा तोंडावर शेवटची चादर म्हणजे प्रेताच्या अंगाखालची काढून तीच तोंडावर टाकणे, उन्हाळ्यात पापड कुर्डाई वाळत घालण्यासाठी, लॉन्ड्रीत इस्त्रीला कपडे घेऊन जातांना याच चादरीचा गाठोडे म्हणून उपयोग, अंघोळ करून आल्यानंतर केस सुकवायला पटकन समोर टॉवेल दिसला नाही तर पहुडलेल्या नवऱ्याला भसकन उठवून त्या चादरीने केस बांधून घेणे, असे एकाच वस्तू मधून अनेक उपयोग कसे करवून घ्यायचे हे पुणेकरांकडून आणि भारतीय स्त्रियांकडून त्यांच्या नवऱ्याबाबत शिकून घेण्यासारखे. मला नाही वाटत, जगाच्या पाठीवरची कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याचा एवढा मल्टिपल उपयोग करवून घेत असेल जेवढी भारतीय स्त्री तिच्या नवऱ्याचा करवून घेते…
जो नवरा रात्रभर अंगावर हात टाकूनच शेजारी हवा असतो म्हणजे क्षणभर जरी त्याचा हात बाजूला गेला, केवळ संशयातून दुसरेच दिवशी घरातली तरुण मोलकरीण काढून टाकल्या जाते नि त्याजागी आजी, आत्या, मावशी वयाची दिसू लागते. हाच नवरा सकाळी उष्टी भांडी विसळण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी, येतांना भाजी घेऊन येण्यासाठी, घरात पाऊल ठेवताच कुकरची शिटी बघण्यासाठी, लहान बाळाचे दुपटे बदलवून देण्यासाठी, पाठीवरती हुक ताकद लावून अडकविण्यासाठी, केर काढण्यासाठी, अगदीच नवीन जोडपे असेल तर पाय चेपून देण्यासाठी नन्तर बहुतेक नवऱ्यांना वाटते कि हिचे आधी पाय चेपावेत नंतर गळा देखील दाबून द्यावा, अशा एक ना अनेक कामांसाठी नवऱ्याचा उपयोग करून घेणारी एकही स्त्री तुम्ही भारताबाहेर बघितलेली नसेल. माझ्या मित्राला त्याची बायको म्हणाली, शेजारी राहायला आलेले ते नवपरिणीत जोडपे बघा, तो तिचे इनर कपडे देखील स्वच्छ धुवून देतो, हा म्हणाला, त्यात काय, उद्या ती मला ते कपडे धुवायला देणार असेल तर मी देखील, अर्थात नंतर संशय कल्लोळ नाटक त्यांच्या घरी म्हणे दिवसभर सुरु होते. असो, जी विवाहितही असेल आणि पुणेकरही असेल तिच्या नवऱ्याचे काय हो होत असेल…?
तूर्त एवढेच : हेमंत जोशी