तावडे सर्वांना आवडे 4 : पत्रकार हेमंत जोशी


एखादी व्यक्ती उगाच मोठी होत नाही, त्यामागे त्यांची मेहनत परिश्रम 
जिद्द महत्वाकांक्षी स्वभाव खडतर प्रवास मानापमान संकटे चिकाटी 
इत्यादी अनेक गुण अंतर्भूत असतात. इतर विषयांतर मी अधून मधून 
लिहीत असलो तरी राज्याचे राजकारण समाजकारण आणि भ्रष्टाचार 
हे तीन माझे आवडते अभ्यासाचे विषय. एखादा पुरुष कसा सिनेमाला 
बायकोबरोबर रस्त्याने अगदी बिनधास्त जातो आणि सिनेमागृहात देखील 
बिनधास्त तिच्या गळ्यात हात घालून बसतो पण तेच विवाहित पुरुषसंगे 
बायकोऐवजी मैत्रीण किंवा प्रेयसी असेल तर मात्र रस्त्याने ती मागे आणि 
तो खूप पुढे असतो, तोंड लपवत लगबगीने जातो आणि सिनेमागृहात देखील 
मध्यंतर किंवा शेवट व्हायच्या आत बाहेर पडतो, माझे हे असेच मी राजकारणावर 
एकदम बिनधास्त आत्मविश्वासाने लिहितो पण इतर विषय हाताळतांना जरा 
सावध असतो, कुठे अज्ञान तर प्रकट होणार नाही, इतर विषय लिहितांना तशी 
भीती मनात असते. टीका करणे तर आमच्या पाचवीला पुजलेले पण अधून मधून 
आभाळाला हात लावून आलेल्या लोकांची तारीफ स्तुती देखील व्हायला हवी, 
माझा त्यावर कटाक्ष असतो, तारीफ केली कि टीकाकार म्हणतात सुपारी घेतली, 
पण कोण काय म्हणते पेक्षा आपल्या मनाला पटते ते लिहून मोकळे व्हावे असे 
मला कायम वाटत आले आहे आणि तेच मी करतो….
फडणवीस यांचे मंत्रिमंडळ सत्तेत येऊन हा अंक हाती पडेपर्यंत दोन वर्षे पूर्ण झाली 
असतील त्यानिमीत्ते फडणवीस मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या चांगल्या कामांवर 
प्रकाशझोत टाकावासा वाटलं, सुरुवात मंत्री विनोद तावडे यांच्यापासून केली. तावडे 
यांनी त्यांच्या 152-बोरिवली मतदारसंघात त्यांना स्वतःला जे जे आवडते किंवा जे जे 
त्यांना त्यांच्या आयुष्यत आवडले ते ते करायला हाती घेतले आहे त्यात मराठी आणि 
गुजराथी मतदारांचे प्राबल्य असलेल्या या विधान सभा परिघात त्यांनी सांस्कृतिक 
चळवळ ज्या झपाट्याने उभी केली त्यावर करावे तेवढे कौतुक कमी, कारण हेच कि 
तावडे हे कायम तरुण विद्यार्थ्यांचे नेते म्हणून ओळखल्या जातात, विद्यार्थी नेता वरून 
सांस्कृतिक आणि शिक्षण खात्याची जबाबदारी, तावडे वेगळी कामगिरी करून 
दाखवतील नाहीतर काय…? 
इडली मेदुवडा डोसा करण्यात दाक्षिणात्य स्त्रीमध्ये जो सहजपणा असतो तो मराठी 
स्त्रीमध्ये अभावाने आढळतो. आमच्या मराठीच्या घरी जसे साखरेचा डबा, चहाचा 
डबा, तुरीची डाळ असे लिहिलेले असते, माझा आग्रह असतो कि त्यांनी केलेल्या 
पदार्थांवर देखील लिहावे, इडली, वडा, सांबार, पनीर माखनी, छोले, ढोकळा, इत्यादी 
म्हणजे खाणाऱ्यांना अमुक एक पदार्थ आपण खातोय, लक्षात घेता येते नाहीतर अंदाज 
बांधावा लागतो. पण तावडेंच्या बाबतीत हा अंदाज त्यांनी खोटा ठरवलाय म्हणजे तावडे 
यांनी मराठी असूनही किंवा त्यांच्या मराठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने नाटक सिनेमा 
कलेची आवड असणाऱ्या गुजराथ्यांसाठी ‘ भवाई ‘ हि सांस्कृतिक चळवळ सुरु केली 
आणि ती या समाजाने पुढे डोक्यावर घेतली, खुश आहेत सारे गुजराथी, ज्यांच्या अत्यंत 
आवडीचे काम विनोद तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखविले. विशेष म्हणजे 
सांस्कृतिक चळवळ तर आम्हा मराठीचा त्या बंगाल्यांप्रमाणे आत्मा, जीव कि प्राण, तावडे 
तेथेही कमी नाहीत, त्यासाठी ‘ सृजन ‘ हि सांस्कृतिक चळवळ तुम्हा आम्हा सर्वांना विशेषतः
बोरिवली कांदिवली परिसरातील आबाल वृद्धांना तोंडात कौतुकाने आश्चर्याने बोटे घालायला 
लावणारी. दरवर्षी या चळवळीतून विविध स्पर्धेचे आयोजन केल्या जाते आणि किमान दहा 
हजार युवा युवती तेथे झुंबड करून भाग घेतात. यापुढे बोरिवली कांदिवली परिसर त्या पुण्या
सारखा राज्यात देशात सांस्कृतिक चळवळीचा हुकमी एक्का म्हणून ओळखल्या गेल्यास फारसे 
आश्चर्य वाटून घेऊ नका. आम्ही मुंबईकर सतत धावपळीतून तणावाखाली, तावडे यांनी जे मन 
डाइव्हर्ट करण्याचे मिशन हाती घेतले, त्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुकही….
सृजन ने अलीकडे घडवून आणलेली चित्रस्पर्धा, वाचकहो, वय वर्षे सहा ते वय वर्षे 80, साऱ्याच 
वयाच्या स्पर्धकांनी जो अति उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतला, बोरिवलीकर मंडळींच्या डोळ्यात 
हे सांस्कृतिक वैभव बघून आनंदाश्रू तरळले. जे आमदार आपला मतदारसंघ ह्या अशा वेगळ्या 
पद्धतीने विकसित करतात, नवचैतन्य त्यांच्या निवडून येण्याने निर्माण होते, असे आमदार आणि 
त्यांचा मतदारसंघ त्यावर लिहायला मला नेहमी आवडत आले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 
यांचा नागपुरातील मतदार संघ त्यांच्या आधीच्या आमदारांनी गचाळ करून ठेवलेला, बावनकुळे 
यांनी त्याठिकाणी केलेले परिवर्तन, त्यावर मी नक्कीच लिहिणार आहे. आता गणेश नाईक 
पराभूत झाले त्यांच्या सभोवताली त्यांनी जी नालायक पिल्लावळ जमा केली होती त्यामुळे पण 
नवी मुंबई परिसर अप्रतिम करण्यात सिंहाचा वाटत फक्त आणि फक्त गणेश नाईक यांचा, 
त्यावरही मी अनेकदा लिहिले आहेच. आमदार आणि नामदार मंडळी जर नालायक मंडळींना 
जवळ घेऊन वाटचाल करू लागली कि नेत्याचा सुरेशदादा जैन, गणेश नाईक होतो….
तावडे यांच्या सांस्कृतिक चळवळीवर अख्खा अंक काढता येईल, सृजन या सांस्कृतिक 
चळवळीवर कादंबरी निघेल, पुढे काही वर्षांनी त्यावर ग्रंथ देखील लिहायला घेता येईल, एवढी 
हि चळवळ त्यांनी व्यापक करून ठेवली आहे, बोरिवली, कांदिवली च्या रहिवाशांना त्यांनी 
अप्रत्यक्ष तणावातून हलके करण्याचे जणू मोठे कमी केले आहे. पावसाळा संपताच त्यांनी 
सुरु केलेला ‘ इक्वल स्ट्रीट ‘ प्रकार सुरु होईल, या प्रकाराला मुंबईकर उडया मारतात. दर
रविवारी बोरिवलीच्या मुख्य रस्त्यावर बोरिवलीकर सहकुटुंब सकाळी 7 ते 11 उतरतात, 
त्याला जत्रेचे स्वरूप येते, साऱ्याच वयाची माणसे त्यावेळेत देहभान विसरून रस्त्यावर 
अक्षरश: धुमाकूळ घालतात, जीवनाचा आनंद लुटतात. अलीकडे चला हवा येऊ द्या या 
नावाजलेल्या कार्यक्रमात जे ढोलताशा पथक सहभागी झाले होते ते सृजन चळवळीतूनच 
उभे राहिलेले, किंवा अलीकडे सृजनची व्यावसायिक नाट्य स्पर्धा अशीच धुमाकूळ घालणारी, 
नवख्याना नाट्यक्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारी. अनेक माणसे खिशात पैसे आहेत म्हणून 
खाद्यपदार्थांचे हॉटेल्स सुरु करतात पण स्वतःला जे आवडते ते ग्राहकाला आवडेलच असे नसते 
त्यामुळे हौशे गवशे नवशे हमखास तोट्यात जातात, दरदिवशी अनेक हॉटेल्स बंद पडतांना 
दिसतात. माझ्या ओळखीच्या एक प्रख्यात स्त्रीरोग तद्न्य आहेत, त्यांनी चांगली चाललेली 
प्रॅक्टिस बाजूला ठेवून त्यांना जे आवडते त्या पदार्थांचे प्रचंड पैसे ओतून मुंबईत मोक्याच्या 
ठिकाणी हॉटेल सुरु केले, लवकरच हॉटेलही बोम्बलले आणि त्यांची छान चाललेली प्रॅक्टिस
देखील, तुम्ही केलेल्या पदार्थाना घरातले घाबरून ‘ चविष्ट किंवा छान ‘ म्हणतात, ग्राहकांनी 
का म्हणून घाबरावे. लीला आणि ओबेरॉय हे दोन मुंबईतले पंचतारांकित हॉटेल्स, दोन्ही 
हॉटेलात जे कॉफी शॉप्स आहेत, त्यात विविध देशातल्या महागड्या बीन्स वापरून कॉफी 
तयार केली जाते, ओबेरॉय मध्ये कॉफी तयार करणारा स्टाफ निष्णात आहे, तेथली कॉफी 
अतिउत्तम, तेच लीला मध्ये नाही त्यामुळे कॉफी घेतोय कि औषध, असे ग्राहकाला होऊन 
जाते. थोडक्यात, तावडे यांना जे आवडते ते त्यांनी सुरु केलेल्या सांस्कृतिक चळवळीत 
सुरु केलेच असेल असे नाही तर लोकांना नेमके जे हवे ते त्यांनी सुरु केले म्हणून त्यांची 
सृजन चळवळ यशस्वी ठरली….
आणखी एक महत्वाचे सांगतो, बोरिवली लागत असलेले जंगल असो कि समुद्र किनारा, 
कोकण मुंबईत अवतरले कि काय, जाणीव करून देणारा हा परिसर. गोराई आणि मानोरी 
समुद्रकिनाऱ्यालगत या परिसरात, पर्यटकांना समुद्र सफारीचा आनंद घेता येईल, अशा सोयी 
तेथे नाहीत त्यामुळे केवळ चद्दर बदलू हॉटेल्सच्या भरवशावर तेथे वाईट धंद्यांना ऊत आलेला, 
विनोद तावडे यांनी हा पर्यटन परिसर विकसित करण्यावर आता भर दिलाय, दोन जेट्टी तेथे 
उभ्या राहताहेत, मुंबईतल्या पर्यटनाचे आकर्षण म्हणजे त्यांचा मतदारसंघ, त्यांना घडवून 
आणायचा आहे, तावडे हि किमया घडवून आणतील, गेटवे ऐवजी पर्यटक उलट्या बाजूने 
एक दिवस नक्कीच धाव घेतील आणि व्यावसायिक दळणवळण वाढेल ते वेगळेच….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *