राजकीय दिवाळी कि दिवाळे 3 : पत्रकार हेमंत जोशी

जे मी तुम्हाला अलीकडे अनेकदा सांगितले तेच भाजपातले ज्येष्ठ श्रेष्ठ नेते जेव्हा केव्हा मला भेटतात किंवा भेटायचे त्यांनी देखील माझे तेच सांगणे असायचे कीं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखी शक्तिमान,मॉब खेचू शकेल, गर्दी जमा करू शकेल अशी मराठा लीडरशिप तुमच्याकडे नाही, अन्यथा मराठ्यांच्या मोर्चाचे नेमके तुम्ही सत्तेत आल्यानंतर एवढे लोण पसरले नसते. विनोद तावडेंसारखे एक दोन अपवाद अपवाद सोडल्यास शक्तिमान मराठा नेता निर्माण करावा असे ना कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्यानात आले ना कधी भाजपच्या, त्याचा मोठा फटका यावेळी भाजपाला बसला कारण तावडे भाजपातले तसे एकमेव शक्तिमान बुद्धिमान ताकदवान नेते पण मंत्री झाल्या झाल्या केलेल्या काही चुका त्यांना बऱ्यापैकी भोवल्या, त्यामुळे दोन तीन वर्षे ते काहीसे बॅक फूटवर आले किंवा आल्यासारखे वाटले, आता आणखी काही काळ त्यांना नेतृत्वाच्या बाबतीत पूर्वपदावर यायला लागणार आहे, आणि ते पुढे येतीलही पण मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली आहे, एवढेच सांगतो…

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा म्हणजे त्यांचा तसा काही फारसा उपयोग नाही, ते जालना जिल्ह्यातून निवडून येतात एवढीच काय ती त्यांची जमेची बाजू. तिकडे मराठवाड्यातले भाजपमधले इतर मंत्री बबन लोणीकर यांच्यासारखे ताकदवान नेते आणि दानवे इत्यांदींमध्ये फारसे जमत नाही किंबहुना विस्तव देखील जात नाही आणि तसेही दानवे म्हणजे मुंडे महाजन गडकरी फडणवीस नव्हेत कि त्यांच्या सोलो सभांना गर्दी झाली आणि त्यांनी मते खेचून आणली, थोडक्यात भीड खेचू शकेल, मते खेचून आणू शकेल, वातावरण निर्मिती करू शकेल असा शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या निदान खालोखाल तोडीस तोड ठरू शकेल असा सोलो मराठा हिरो भाजपाची गरज होती आणि त्यांनी असे चेहरे आधी शोधायला सुरुवात केली नंतर लगेच भाजप मध्ये त्यांना आणून रीतसर पदे देऊन त्यांचा मानसन्मान करायला सुरुवात केली, त्यांनी सुरुवात केली, कोल्हापूरचे गायकवाड त्यांच्या नजरेस पडले, थोडक्यात थेट या राज्यातले मराठ्यांमधले जानमान्य लोकमान्य कोल्हापूरचे राजघराणे त्यांनी पक्षात आणले गायकवाडांना पद देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला, मराठा समाजाला नक्कीच त्यातून गुदगुदल्या झाल्या, फील गुड म्हणतात ते तसे त्यांना वाटले. गायकवाडांना लगेच पुढे केले आता थेट भाजपातल्या मान्यवर नेत्यांनी शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमान उदयसिंह महाराज भोसले यांना योग्य तो मानसन्मान देऊन भाजपमध्ये आणण्याचे निश्चित केले आहे, राजे भाजपमध्ये मनाने आले आहेत, शरीराने येणे तेवढे बाकी आहे, रीतसर जाहीर करणे तेवढे बाकी आहे….

या राज्यातल्या अत्यंत महत्वाच्या राजकीय इतिहासाचा विचार करायचा झाल्यास, श्रीमान उदयनराजे यांचा पिंड तसाही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात रमण्याचा नाही, आधीही ते भाजप मध्ये होते आणि गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत लाडके होते. अलीकडे दिवंगत अभयसिंह राजे भोसले आणि उदयनराजे भोसले कुटुंबात पुन्हा एकदा बरे संबंध जुळलेले असले तरी त्या दोघात खूप वर्षे विस्तव देखील जात नव्हता, महत्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीपासून अभयसिंहराजे यांचे कुटुंब शरद पवार यांना अधिक जवळचे त्यामुळे पवारांना एका म्यानात या दोन तलवारी ठेवणे अजिबात शक्य नव्हते, अलीकडे काही वर्षे या दोन तलवारी एका म्यानात राहिल्या कारण शरद पवार यांना हे असे करणे सहज जमते म्हणून, इतर कुठल्याही राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांना ते ना जमले असते ना जमेल. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे उदयनराजे यांच्या मातोश्री सुमित्राराजे आणि दिवंगत अभयसिंह राजे यांच्यात अक्षरश: विळ्या भोपळ्याचे सूत होते पण या दोघांच्या पश्चात हि किमया केवळ शरद पवार यांनीच मध्यस्थीने घडवून आणली, दोन्ही कडल्या राजपुत्रांना पवारांनीच सारे विसरायला लावून एकत्र आणले. महाराज उदयनराजे भोसले हे नेता म्हणून स्वतःच एक अनभिषिक्त सम्राट आहेत त्यामुळे सातारा सांगली भागात राजकीय परिघात वावरतांना त्यांच्या दृष्टीने अगदीच लल्लूपंजू असलेले अजित पवार, पतंगराव कदम, जयंत पाटील इत्यादी नेत्यांना त्यांनी सलाम ठोकणे ना त्यांना कधी जमले असते ना कधी जमेल, म्हणून भाजपा आणि उदयनराजे हे समीकरण छान आहे आणि पुन्हा हे समीकरण एकदा जुळून आले आहे, जमवून आणल्या गेले आहे….

भाजपा मध्ये वाजवीपेक्षा अधिक संघ मुख्यालयाचे तोंड घालणे, संघ नेत्यांची ढवळाढवळ हि बाब तशीही आता फारशी लपून राहिलेली नाही, एक नरेंद्र मोदी सोडले इतर साऱ्याच नेत्यांची हि धारणा आहे कि संघाला सलाम ठोकल्याशिवाय आपले काही खरे नाही, आणि संघ परिवाराला अगदी सुरुवातीपासून म्हणजे थेट गोळवलकर गुरुजींपासून राज घराण्यांचे मोठे आकर्षण आहे, संघ आणि भाजपा मध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत देशातल्या राज घराण्यांना नेहमीच मोठे मनाचे स्थान दिल्या गेले आहे त्यामुळे उदयनराजे 

हे भाजपा मध्ये येताहेत, कानी घातल्यानंतर भागवतांनी अजिबात नाक न मुरडता या प्रवेशाला आनंदाने परवानगी दिली….

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *