आम्ही मुंबईकर : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे नागपुरात पुण्यातले चितळे भेटले त्यांना म्हणालो जगात सर्वाधिक विनोद पुणेकर आणि पुण्यातल्या चितळ्यांवर केले जातात, ते म्हणाले खरे आहे पण आम्हाला त्याचा राग येत नाही, निगेटिव्ह पब्लिसिटी अधिक फायद्याची ठरते असेही ते पुढे म्हणाले. अर्थात पुणेकरांवर जशा अनेक आख्यायिका आहेत तसे मुंबईकर देखील इतरांपेक्षा नक्की वेगळे आहेत म्हणजे जेथे असखल्लीत इंग्रजी बोलणारे नसतील तेथे आम्ही मुंबईकर इम्प्रेस करण्यासाठी मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलतो आणि समोरचा पट्टीचा इंग्रजी बोलणारा असला कि आमचे मराठी किंवा चुकीच्या हिंदीतून बोलणे सुरु होते जसे, आपके यहा पाटा वरवंटा है क्या पद्धतीचे ते हिंदी असते. आम्ही मुंबईकर दहा बाय दहाच्या खोलीत पडद्यापलीकडे आई वडील बहीण आणि भाऊ झोपले असताना नव्याने लग्न झाल्यानंतर मधुचंद्र साजरा करून मोकळे होतो दरवर्षी बायकोला हू का चू न करता गाम्हण ठेवून मिशीवर ताव देतो. आम्ही प्रवासात किंवा लोकल मध्ये सगळे पैसे एका जागी कधीही ठेवणार नाही, थोडे पाकिटात, थोडे या खिशात थोडे त्या खिशात आणि उरलेले बॅग मध्ये ठेवून मोकळे होतो…
पावसाळ्यात छत्री, दररोजचा टिफिन, घरी येताना चार आण्याचे तीन, आम्ही कधीही विसरत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आदराचे स्थान असते भलेही मतदान दुसऱ्यांना करीत असू. गणपतीच्या दिवसात मंडळातले सदस्य त्या दहा दिवसात वर्गणीच्या भरवशावर काय काय करता येईल त्यावर हमखास विचार करतो आणि आवडत्या मुलीने बघितले कि अधिक त्वेषाने मिरवणुकीत नाचायला सुरुवात करतो. थंडगार पाणी पिणे हा मुंबईकरांचा वीक पॉईंट, साधे पाणी ते एरंडेल तेल प्यायल्यासारखे चेहरा करीत ज्यांनी पाजले त्यांच्याकडे तुच्छतेने बघून पितात. भरपूर वेळ हातात असला तरी समोर असलेली ट्रेन बस जाऊ देणार नाही, सुटत असेल तर धावत जाऊन पकडतील आणि लोम्बकळत नेमके ठिकाण गाठतील. नोकरी गेली किंवा प्रेयसीने सोडले तरी चालते पण गणपतीला आणि मे महिन्यात कोकणातल्या गावी जायचे म्हणजे जायचे, तेथे कोणतेही कॉम्प्रमाइज नाही….
महनीय व्यक्तींनाही एकेरी नावाने उल्लेखतील जसे सचिनला सच्च्या किंवा तेंडल्या म्हणतील. प्रत्येक पोलीस त्यांचा मामा असतो. बाहेर पडल्यानंतर मुंबईकर नेमका धारावीत राहतो कि जुहूला इतरांना ओळखणे कठीण असते कारण त्याचे राहणे बोलणे वागणे असे असते कि तो मुंबईत कायम पंचतारांकित हॉटेल मध्ये पडलेला असतो आणि त्याचे सारे मित्र फिल्मस्टार आहेत. मुख्य म्हणजे घरच्या धकाधकीतून विश्रांती मिळण्याचे त्याचे हमखास ठिकाण ऑफिस हेच असते त्यामुळे निदान आराम करण्यासाठी तरी मुंबईकर शक्यतो ऑफिसला दांडी मारत नाही. कुणाशीही बोलतांना कानाखालचा आहे असे त्याला वाटले रे वाटले कि हमखास इंग्रजी किंवा हिंदीतून बोलायला सुरुवात करेल. बसचे तिकीट लांब घडी करून घड्याळाच्या पट्ट्यात खोवून ठेवेल. तिकीट विचारले कि मनगट तिरपे करून तेही वर्तमानपात्र बाजूला न करता, चेकरला दाखवेल. मुंबईकर थकला भागला आहे असे कधीही दिसणार नाही सदैव उत्साही असतो. तिरळ्या डोळ्यांच्या बायकोतही सुलोचना बघणारा तोमुंबईकर. पुढले तुम्ही सांगा…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी