पवारांचा नेम आणि गेम : पत्रकार हेमंत जोशी
मुलींनो तुम्ही बोट पुढे करायचा अवकाश आम्ही पुरुष हात धरून मोकळे होतो, परपुरुषांकडे तुम्हा मुलींनी पाहून हसू देखील नव्हे, हसी वो फसी, असे आम्हा पुरुषांचे म्हणणे असते त्यामुळे तुम्ही सावध असावे. शरद पवारांचे देखील हे असेच वागणे ते नेम धरतात आणि गेम करतात. यावेळी त्यांनी एकाचवेळी तिघांवर नेम धरला आणि तिघांचाही गेम केला, पवारांनी लागोपाठ शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाचा गेम केला, आता पवार गालातल्या गालात हसताहेत आणि हे तिघेही आतल्या आत मनातल्या मनात धाय मोकलून रडताहेत. पवार अतिशय थंड माथ्याने शांत डोक्याने एखाद्याचा राजकीय खात्मा करतात, यावेळी तर त्यांनी स्वतःचेच मागले रेकॉर्ड मोडले, त्यांनी एकाचवेळी अनेक गेम केले. तिन्ही पक्षातील नेत्यांना अद्याप हे लक्षात येत नाही, हे असे अचानक कसे घडले का घडले…
तिघांनीही पवारांना संधी आपणहून उपलब्ध करून दिली पवारांनी मग संधीचे सोने केले. जेव्हा जिंकूनही भाजपचा पराभव झाला आणि पवारांच्या साथीने मदतीने सल्ल्याने जेव्हा शिवसेना व काँग्रेस सत्तेत आली तेव्हा या दोघांनाही वाटले आता आपली चंगळ आहे पण त्यांना कुठे हे माहित होते कि शरद पवार हे एखाद्या मुलीच्या पत्रिकेतल्या मंगळासारखे या दोघांनाही पुढे अडसर ठरणार आहेत, पवार सावध होते आणि शिवसेना व काँग्रेस बेसावध होती वरून भाजपा सत्तेपासून दूरवर फेकल्या गेली होती, या साऱ्या परिस्थितीचा पवारांनी नेमका फायदा घेतला. मान सन्मान सत्ता पैसा दबदबा मिळणारे महत्वाचे सारे आपल्याकडे राष्ट्रवादीने खुबीने मागवून घेतले आणि ठेवले, सेना आणि काँग्रेसला लिमलेटच्या गोळ्या तेवढ्या चोखायला दिल्या ज्या सुरुवातीला चघळतांना छान वाटल्या पण विरघळल्यानंतर त्या दोघांच्याही लक्षात आले अरे या लिमलेटच्या गोळ्यांनी तोंडाला तेवढ्यापुरती चव येते नंतर परिणाम शून्य म्हणजे ना त्याने पॉट भरते ना समाधान मिळते….
www.vikrantjoshi.com
शिवसेनेला भाजपासंगे गेल्यानंतर जे समाधान मिळाले असते ते येथे त्यांना मुख्यमंत्री पद मिळून देखील मिळणार नाही मिळाले नाही कारण महत्वाची सारी खाती पवारांनी मोठ्या खुबीने सेना आणि काँग्रेस कडून हिसकावून घेतलेली आहेत त्यामुळे खाते वाटप करतांना घोळ झाला उशीर झाला आणि मनाविरुद्ध लग्न झाल्यानंतर एखादी तरुणी जशी मधुचंद्राच्या रात्री देखील उत्साही नसते नाराज असते हिरमुसली होते अस्वस्थ होते दुःखी होते ते तसे आज शिवसेना आणि काँग्रेस चे झालेले आहे. मला तर असे वाटते कि अजूनही वेळ गेलेली नाही, काँग्रेस आणि शिवसेना प्रमुखांनी पवारांना सांगावे हट्ट धरावा कि खात्यांची अदलाबदली व्हावी करावी अन्यथा आपण उल्लू बनलो आहोत हे जे त्यांच्या लक्षात आले आहे त्यातून पुढे महाआघाडीच्या संसार सुरळीत चालणे अवघड ठरणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊनही असूनही जर त्यांचा दबदबा राज्यात विविध शासकीय खात्यांमध्ये निर्माण होणे अशक्य आहे असंभव आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊनही त्यांची हवी तशी हवा निर्माण होत नाही त्याचे प्रमुख कारण म्हणजे शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ते केव्हाच लक्षात आले आहे कि त्यांचे काम यापुढे शरद पवारांशी पडणार आहे उद्धवजींशी नाही…
मित्रहो, महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात उद्धवजींचा मुलगा, बाळासाहेबांचा मुलगा, पवारांचा पुतण्या, विलासरावांचा मुलगा, तटकरेंची मुलगी, पतंगरावांचा मुलगा, गायकवाडांची मुलगी, राजाराम बापूंचा मुलगा, शंकररावांचा मुलगा, थोरातांचा भाचा सारे खुबीने घुसले म्हणजे साऱ्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय कुटुंबांचा विस्तार करवून घेतला तरीही आनंदाला उधाण आलेले नाही, जो तो प्रत्येकाकडे संशयाने बघतो आहे, त्यावर लगेच तोडगा निघणे अत्यावश्यक आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी