राहुल प्रणिती मंगल परिणय,
कि भाजपचे चुकणारे निर्णय :
जेव्हा प्रणिती दोन महिन्यांची झाली तेव्हा 11-12 वर्षांचा राहुल आपल्या आईबरोबर बाळ बाळंतिणीला बघायला गेला, आपल्याच डोळ्याच्या या बाळाला त्याने आवडीनेमांडीवर बसवून तो तिचे लाड जेव्हा करायला लागला तेव्हा एरवी हे रडके बाळ राहुलकडे बघून खुदुखुदू हसायला लागलेले बघून, उज्वला वाहिनी म्हणाल्या, राहुल तुझ्याकडे बाळ बघ, किती छान राहते ते, तू आमच्याकडे बाळाला खेळवायला वरचेवर येत जा, मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, त्यातला हा प्रकार होता का, तेच गुपीत मला येथे नेमके उघड करायचे आहे. आधी जरा त्या भाजपाकडे वळूया !! मला वाटते मेलेल्या मुडद्यांना जिवंत करणे भाजपाला मनापासून आवडते. मेलेला मुडदा जिवंत होतो तेव्हा तो मानव नसतो भूत असतो आणि असे मुडदे भाजपाने जिवंत केले कि ते भाजपाच्याच मानगुटीवर बसून मोकळे होतात. एक शरद पवार जिवंत असतांना, भाजपाच्या मानगुटीवर बसलेले असतांना याच भाजपाला दुसरे शरद पवार जन्माला घालण्याची तशी कोणतिही अजिबात गरज नव्हती कारण शरद पवारांना पार पुरून उरणारा नेता या राज्यात त्यांच्याकडे तयार झाला होता, फडणवीसांच्या रूपाने तो जन्माला आला होता, कंस आणि कृष्ण पद्धतीने पवार आणि फडणवीस सामना ऐन रंगात आलेला असतांना हमखास राजकीय विजय कृष्णरूपी फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचा, हे दृश्य निर्माण झालेले असतांना तिकडे दिल्लीत भाजपा श्रेष्ठींना नको ती अवदसा आठवली आणि त्यांनी आपणहून एक शरद पवार डोकेदुखी ठरलेला असतांना दुसरा शरद पवार जन्माला घातला, कोण होते हे नव्याने जन्माला आलेले शरद पवार ? भाजपाला जे सुरुवातीला सिनेमातले एक्स्ट्रॉ नट वाटले तो चक्क पुढे राजकारणातला सुपर स्टार म्हणुन फेमस झाला आणि आज तर राजकारणात थेट शरद पवारांच्या दोन पावले पुढे, म्हणण्याची वेळ आली आहे आणि हा नेता दुसरा तिसरा कोणीही नसून जो भविष्यात केव्हाही राज्यातल्या भाजपाला गुंडाळून ठेवेल असे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, केवळ उत्तम तयार झालेल्या देवेंद्र फडणवीसांना मागे खेचण्यासाठी हि चाल खेळल्या गेली आणि नेहमीच्या सवयीने भाजपा श्रेष्ठींनी आपल्या पायावर कायमचा धोंडा पडून घेतला…
www.vikrantjoshi.com
तोच प्रकार राहुल गांधीबाबत, ज्या गांधी घराण्याविषयी भारतीयांच्या मनात कडवट भूमिका होती ज्या भारतीयांच्या मनात गांधी घराण्याविषयी सख्त नफरत निर्माण झालेली होती, ज्यांना राहुल म्हणजे राजकारणातला जोकर असे राहून राहून वाटत होते त्यानंतर याच राहुल गांधींबाबत विशेषतः सोशल मीडियावर किंवा भाजपा नेत्यांच्या भाषणातून बोलण्यातून जसे पूर्वी सरदारजींवर चुटके सांगितल्या जायचे त्यापद्धतीने राहुल गांधींवर सतत चौफेर यापद्धतीने वात्रटिका किंवा चुटके सांगून पसरवून त्यांना सतत कायम प्रकाशझोतात ठेवण्याची काहीही आवश्यकता नव्हती पण पुन्हा तेच, संपलेल्या राहुल यांचे महत्व त्यांच्या पक्षाने किंवा काँग्रेस नेत्यांना वाढविण्याची गरजच पडली नाही, राहुलविषयीची अँटी पब्लिसिटी आज भाजपच्या पूर्णतः अंगलट आलेली आहे, राज्यात जसे उद्याचे शरद पवार एकनाथ शिंदे यांना फार मोठे करण्याचे पाप हे भाजपा श्रेष्ठींचे त्यांच्या मान्यवर नेत्यांचे आहे तेच नेमके राहुल गांधीबाबत घडले आहे, आजच्या तारखेला राहुल यांना थेट मोदी यांच्या पारड्यात तोलण्याची मोठ्या खुबीने जाहिरात भाजपा विरोधकांकडून जगभर केल्या जाऊ लागलेली आहे. भाजपाच्या अपरिपकव राजकारणाची केवळ हि दोन नव्हे तर कितीतरी उदाहरणे मला सांगता येतील. जे संपलेले असतात त्यांना कधीही डोक्यावर घ्यायचे नसते किंवा अमुक एखाद्याचा कावेबाज चेहरा लक्षात न घेता त्याला डोक्यावर घ्यायचे नसते, ज्या माणसाला रिक्षाचालकापासून तर मंत्री करण्यापर्यंत मातोश्रीचा हात होता त्यांनाच ज्याने लाथाडले तो कसा भाजपाचा होऊ शकतो, आपल्याशी लॉयल असणाऱ्यांना दूर सारून शेजारणीला कधीही पलंगावर घेऊन लोळवायचे नसते. आता या क्षणी शिंदे किंवा राहुल या केसेस भाजपच्या पूर्णतः हाताबाहेर गेलेल्या आहेत….
आता अत्यंत महत्वाचा मुद्दा राहुल आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाविषयी पसरणाऱ्या बातम्यांचा. राहुल यांना उगाचच बदनाम करण्यासाठी कुठल्यातरी विरोधकाने पसरविलेलीहि तद्दन खोटी बातमी. मला 24 तास राजकारणाला वाहून घ्यायचे असल्याने याआधी किंवा यानंतर माझ्या डोक्यात लग्नाचा विषय कधीच येणार नाही हे राहुल गांधी यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू सॅम पित्रोडा यांना स्पष्ट सांगितलेले आहे आणी तसेही प्रणिती व राहुल दोघात जवळपास 11-12 वर्षांचे फार मोठे अंतर आहे. फार पूर्वी बुलढाण्याचे माजी आमदार बाबुराव पाटील यांनी आपल्या वयापेक्षा जवळपास 25 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी यासाठी लग्न केले होते कारण इंदिरा गांधी यांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता आणि इंदिराजींची घोषणा होती, कुटुंब लहान तर सुख महान, राहुल यांना मात्र आपल्या आजीच्या घोषणेवर पाऊल ठेवायचे नाही त्यांना प्रणिती शिंदे शिंदे किंवा इतर कोणाशीही लग्न करायचे नाही, त्या भानगडीत पडायचे नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जेव्हा राहुल आणि प्रणितीच्या लग्नाची तारीख देखील सांगितल्या जाते, सुशीलकुमार शिंदे लेकीच्या या बदनामीवर नक्कीच अस्वस्थ होतात, काँग्रेस विरोधकांनी राहुल यांची अँटी पब्लिसिटी करून स्वतःच्या पायावर विनाकारण धोंडा पडून घेऊ नये…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी